Post views: counter

MPSC (पूर्वपरीक्षा) सीसॅटची (पेपर-२) तयारी


                    राज्यसेवा परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेण्यात येते. यापकी पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असून पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते. पूर्वपरीक्षा ही एकूण ४०० गुणांची असून त्यात दोन पेपर असतात- यापकी पेपर १ (किंवा सीसॅट- १) हा सामान्य अध्ययनाचा पेपर असून यात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भारतीय संविधान, विज्ञान तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडी यांसंबधी १०० प्रश्न असलेला २०० गुणांचा पेपर असतो. तर दुसरा (सीसॅट- २) हा पेपर २०० गुणांचा असून यात ४० प्रश्न असतात. यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच असतो.
गेल्या वर्षी, यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या सीसॅटच्या पेपरात काही मूलभूत बदल करण्यात आले. या बदलाअंतर्गत, इंग्रजी भाषा, आकलन क्षमता या उपघटकासंबंधित

उतारे प्रश्नपत्रिकेतून वगळले. एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेतून हे उतारे वगळले जाण्याची शक्यता नाही किंवा आयोगाने तसे जाहीर केलेले नाही. म्हणूनच या उताऱ्यांवरील प्रश्नांचा पेपरात समावेश असेल हे लक्षात घेऊन परीक्षेची तयारी करायला हवी.
  • सीसॅट- २ या पेपरचे महत्त्व
एमपीएससी पूर्वपरीक्षा तसेच यूपीएससी  पूर्वपरीक्षा उत्तीर्ण व्हायची असेल तर या प्रश्नपत्रिकेचा गांभीर्याने अभ्यास करायला हवा. याचे कारण सीसॅट पेपर-१च्या (सामान्य अध्ययनाशी संबंधित पेपर)  गेल्या दोन वर्षांतील प्रश्नांचे स्वरूप पाहता या उपघटकावर विशिष्ट गुणांहून अधिक गुण मिळवणे अवघड जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सीसॅट पेपर-२ मध्ये गती असते, त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे सोपे जाते. थोडक्यात, परीक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अभियांत्रिकी, विज्ञान आणि गणिताची पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सीसॅट पेपर-२ चा अभ्यास  काही प्रमाणात नक्कीच सोपा जातो.  पण  पेपर तयार करताना कुणा एका गटाला याचा फायदा होऊ नये, याची काळजी घेतली जाते. या पेपरमध्ये सुमारे ४० ते ४५ टक्के प्रश्न हे आकलन या घटकावर विचारले जातात.  वाचनवेग चांगला असलेल्या,  घटनेचे आकलन करण्याची क्षमता चांगली असलेल्यांना या घटकावरील  प्रश्न सोडवणे सोपे जाते. हा घटक कला शाखेच्या तसेच अभियांत्रिकी अथवा विज्ञानाची पाश्र्वभूमी असणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर आणून ठेवतो. गणित व बुद्धिमत्ता या घटकावरील प्रश्नही अत्यंत मूलभूत असतात. साधारणत: त्यांचा दर्जा दहावी स्तरावरील परीक्षांचा असतो. त्यामुळे कला शाखेतील विद्यार्थी जेवढा जास्त सराव करतील, तितके अधिक गुण त्यांना या प्रश्नपत्रिकेत मिळवता येतील.
जर गेल्या तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा बारकाईने अभ्यास केला, तर असे लक्षात येईल की कोणत्याही एका वर्गासाठी हा पेपर अधिक फायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही.
सीसॅट पेपर दोनच्या तयारीसाठी सराव महत्त्वाचा ठरतो.  तरच पेपर सोडवताना वेळेचे व्यवस्थापन करणे शक्य होते.
राज्यसेवा सीसॅटचे स्वरूप या प्रश्नपत्रिकेमध्ये खालील उपघटक समाविष्ट केलेले आहेत-
आकलन, आंतरवैयक्तिक संवाद आणि संभाषणकौशल्ये, ताíकक विचार व विश्लेषणात्मक क्षमता, निर्णयप्रक्रिया व समस्यांची सोडवणूक, सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण, इंग्रजी भाषेचे  आकलनकौशल्य.
एमपीएससीने अंकगणितीय कौशल्ये आणि इंग्रजी भाषेचे आकलन या विषयाचे दहावीच्या स्तरावरील मानक निर्धारित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी याचे भय बाळगण्याचे कारण नाही.
  • आकलनाची तयारी
आकलन म्हणजे समजून घेणे. यात उताऱ्यावरील प्रश्नांच्या आधारे उमेदवारांची आकलनक्षमता तपासली जाते. सीसॅट पेपर-२ सोडवताना मराठी आकलन  क्षमता या विभागाला कमाल ५५-६० मिनिटेच देता येतात आणि या ठरावीक वेळेत सुमारे १०-११ उतारे आणि त्यांवरील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. या सर्व बाबींचा विचार केला तर एक उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडविण्यास जास्तीतजास्त सहा-सात मिनिटे वेळ मिळतो. सामान्य आकलनात दिलेल्या उताऱ्याचे बारकाईने वाचन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे उताऱ्यातील एखाद्या विषयात लेखनकर्त्यांला कोणता मुद्दा, मत मांडायचे आहे? उताऱ्याची रचना कशी  आहे?  आपल्या मताच्या समर्थनार्थ कोणती उदाहरणे वा संदर्भ दिलेले आहेत, या महत्त्वपूर्ण गोष्टींचा शोध घेणे गरजेचे ठरते. उताऱ्यावरील प्रश्नांची तयारी करताना काही मूलभूत प्रश्न मनात ठेवून त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, उताऱ्यात लेखक/लेखिकेने कोणता विषय मांडला आहे? संबंधित विषयाबाबत कोणती भूमिका अथवा मत मांडले आहे? उतारा लिहिण्यामागे त्याचा हेतू कोणता? उताऱ्यावरील मध्यवर्ती संकल्पना कोणती? आणि उताऱ्याला कोणते शीर्षक समर्पक ठरेल या प्रश्नांचा प्रामुख्याने विचार करावा. प्रश्न वाचण्यात घाई केल्यास अथवा चुकीच्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केल्यास एकतर आपण चुकीचे उत्तर शोधू अथवा पर्याय वाचून मनात गोंधळ होऊन आपला वेळ  खर्ची पडेल.
परीक्षेमध्ये आकलनविषयक उतारे सोडविताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत-
  1. सर्वप्रथम उताऱ्यांची संख्या किती आहे, लहान उतारे किती व मोठे उतारे किती आहेत, इंग्रजी उतारे किती आहेत हे पाहून वेळेचे नियोजन करावे.
  2. उतारा एकाग्रतेने वाचावा.  
  3. उतारा वाचताना महत्त्वपूर्ण वाक्य पेन किंवा पेन्सिलने अधोरेखित करून ठेवावे. उताऱ्यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे.
सर्वसाधारपणे उताऱ्यावरील प्रश्न हे खालील प्रकारचे असतात-   उताऱ्याला योग्य शीर्षक द्या, उताऱ्याचा मुख्य आशय स्पष्ट करा, उताऱ्यामध्ये दिलेली वस्तुनिष्ठ माहिती शोधा, लेखकाचा दृष्टिकोन स्पष्ट करा,  उताऱ्यावरून योग्य तो निष्कर्ष काढा.
                           सर्वप्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवावेत की प्रश्न वाचून उतारा सोडवावा, याबाबत मतेमतांतरे आहेत. आपला ज्या पद्धतीने सराव असेल व ज्या पद्धतीने वेळ वाचत असेल ती पद्धत स्वीकारावी, मात्र प्रश्न वाचून उतारा सोडविल्यास आपल्याला काय माहिती उताऱ्यातून जाणून घ्यायची आहे हे समजते आणि आपला वेळ वाचतो.इंग्रजी भाषेच्या आकलन आकलन कौशल्याच्या चाचणीसाठी देण्यात येणाऱ्या इंग्रजीतील उताऱ्याचा स्तर दहावी-बारावीचा असतो. हे उतारे सरळ व सोपे असतात.  इंग्रजी आकलनाच्या तयारीसाठी इंग्रजी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे नियमित वाचन  उपयुक्त ठरते. वर्तमानपत्रांत विविध विषयांवर लेखन असल्यामुळे त्या त्या क्षेत्राशी  संबंधित  शब्द व परिभाषा ओळखीची होते. तसेच एखाद्या इंग्रजी दूरचित्रवाणी वाहिनीचे दिवसातील एखादेतरी बातमीपत्र नियमितपणे ऐकावे. त्यातून नव्या शब्दांची तोंडओळखहोते आणि विविध क्षेत्रांतील चालू घडामोडींची माहिती कळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा