Post views: counter

UPSC परीक्षेची तोंडओळख

                केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचे नेमके स्वरूप कसे असते, याची ओळख करून देणारा लेख-

                     केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय महसूल सेवा (आयआरएस) या व इतर अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. सर्व पदांची यादी आयोगाच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध असते.
                      या परीक्षेचे तीन टप्पे असतात- पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी). पूर्वपरीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न या स्वरूपाची असून यामध्ये दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी या घटकांचा अंतर्भाव होतो. दुसऱ्या पेपरमध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, निर्णयक्षमता, तर्क, बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक चुकीच्या उत्तराला एकतृतीयांश गुण वजा होतात. पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा समजली जाते.
मुख्य परीक्षेमध्ये ९ पेपर असतात. सामान्य अध्ययन पेपर- १ ते ४, वैकल्पिक विषय पेपर- १ व २, निबंध या सात पेपरमधील गुण यशस्वी उमेदवारांची यादी ठरवण्यासाठी गृहीत धरले जातात. इंग्रजी व एक प्रादेशिक भाषा या विषयांचे पेपर केवळ पात्रता (Qualifying) स्वरूपाचे असतात. मात्र, या भाषाविषयांच्या पेपरमध्ये किमान गुण प्राप्त झाल्यासच इतर पेपर तपासले जातात.

                     सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये इतिहास, समाजशास्त्र व भूगोल या घटकांचा समावेश होतो. इतिहास या घटकामध्ये भारतीय संस्कृती (प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक), आधुनिक भारताचा इतिहास, भारताचे स्वातंत्र्योत्तर दृढीकरण, आधुनिक जगाचा इतिहास यांचा अंतर्भाव होतो. समाजशास्त्र या घटकामध्ये भारतीय समाज व विविधता, स्त्री समस्या व उपाययोजना, भारतीय समाजावरील जागतिकीकरणाचे परिणाम, सामाजिक सक्षमीकरण, जमातवाद, प्रदेशवाद व धर्मनिरपेक्षता यांचा अंतर्भाव होतो. भूगोल या घटकांमध्ये जगाचा प्राकृतिक भूगोल, जगातील नसíगक साधनसंपत्तीचे व उद्योगधंद्यांचे वितरण, महत्त्वाच्या भौगोलिक घटना (भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी इत्यादी), भौगोलिक वैशिष्टय़े व बदल, या बदलांचे परिणाम यांचा अंतर्भाव होतो.
                     सामान्य अध्ययन पेपर- २ मध्ये संविधान, शासन, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध यांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय संबंध या घटकामध्ये भारताशी निगडित संबंधांचा अभ्यास आवश्यक असतो.
                   सामान्य अध्ययन पेपर-३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था, आíथक विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन या घटकांचा अंतर्भाव होतो.
                   सामान्य अध्ययन पेपर - ४ मध्ये नतिकता व मानवी वर्तन, दृष्टिकोन, नागरी सेवेसाठी आवश्यक मूलभूत मूल्ये, मानवी मूल्ये, नतिक विचारवंतांचे व तत्त्वज्ञांचे योगदान, शासन, प्रशासन व नतिकता तसेच या घटकांवर आधारित केस स्टडीज यांचा अंतर्भाव होतो.
                   या परीक्षेसाठी आयोगाच्या जाहिराती (Notification) मध्ये असलेल्या विषयांच्या यादीमधून एका वैकल्पिक विषयाची निवड करावी लागते. मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक विषयाचे दोन पेपर असतात. वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम जाहिरातीमध्ये दिलेला असतो व तो सामान्यपणे त्या विषयातील पदवीच्या पातळीचा असतो. निबंधाच्या पेपरमध्ये या वर्षांपर्यंत तीन तासांत एका निबंधाची अपेक्षा होती. या वर्षी मुख्य परीक्षेत निबंधाचा पेपर दोन भागांत विभागला होता. त्यामध्ये दोन निबंध लिहिणे अपेक्षित होते.
                  सामान्यपणे भाषा विषयांच्या पेपरमध्ये उताऱ्यांद्वारे भाषेचे आकलन, निबंध, पत्रलेखन किंवा सारांशलेखन, व्याकरणावरील प्रश्न यांचा अंतर्भाव असतो. आयोगाच्या जाहिरातीनुसार या विषयांची अपेक्षा दहावीच्या स्तराची असते. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळते.
मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी नवी दिल्लीला बोलावले जाते. मुलाखतीचे स्वरूप 'व्यक्तिमत्त्वाची चाचणी' असे असते. मुख्य परीक्षेतील सात पेपर व मुलाखत यांच्या एकत्रित गुणांवर आधारित निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक वर्षांचा
कालावधी लागतो.
                    वयाची २१ वष्रे पूर्ण व पदवीची किमान शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ही परीक्षा देण्यास पात्र ठरतात. यासाठी केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या कायद्यांतर्गत किंवा यूजीसी कायद्यांतर्गत विद्यापीठाची (मुक्त विद्यापीठदेखील) पदवी (नियमित किंवा बहिस्थ:) किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असते. पदवीच्या शेवटच्या वर्षांत असणाऱ्या २१ वष्रे पूर्ण झालेल्या उमेदवारांना या परीक्षेस बसता येते; परंतु पदवीची शेवटची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मुख्य परीक्षेआधी आयोगास सादर करणे आवश्यक ठरते. खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी ३२ वष्रे, इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) ३५, तर अनुसूचित जाती-जमाती (एससी, एसटी)   साठी ३७ वष्रे कमाल वयोमर्यादेची अट असते. तसेच खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांसाठी ६, ओबीसीसाठी ९ प्रयत्नांची मर्यादा असते. एससी, एसटी उमेदवारांसाठी अशी मर्यादा नाही.
या लेखात यूपीएससी परीक्षेसाठी आवश्यक मूलभूत बाबींचा ऊहापोह केला आहे.

Source : Loksatta.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा