Post views: counter

PSI पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी ?नमस्कार मित्रहो,

गेली 2 वर्षे चातकाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) पदाच्या जाहिरातीची वाट बघणाऱ्या विध्यार्थ्यांना आयोगाने PSI ची जाहिरात काढून दिलासा दिला आहे, तरी आपण सर्वजण हि मिळालेली संधी न दवडता वेळेचे उपयुक्त नियोजन करून या संधीचे सोने कराल अशी अपेक्षा करतो, यश मिळो न मिळो हा पुढचा भाग आहे पण आपल्याकडून 110% प्रयत्न करणे हे आपले काम आहे.
-------------------------------------------------
-------------------------------------------------
आपल्या या यशस्वी वाटचालीत आम्हालाही सामील व्हायला आवडेल , या वाटेवर आम्ही आपणास अगदी शेवटपर्यंत साथ देऊ, आणि याचाच एक भाग म्हणून हा आमचा अल्पसा प्रयत्न....PSI एक्साम साठी कोणत्या बुक्स मधून अभ्यास करावा याची पुस्तक सूची पूर्वी आम्ही प्रसारित केली आहे. जवळपास सर्व अधिप्रमाणित पुस्तके देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र कोणतेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रथम त्याचे योग्य नियोजन आणि त्याची अचूक कार्यवाही होणे गरजेचे असते, म्हणून उर्वरित दिवसात कोणत्या प्रकारे अभ्यास करावा कसे नियोजन करावे याचा आम्ही एक अंदाजित आराखडा बनवला आहे , आम्ही नाही म्हणणार कि हाच वापरा / हाच आदर्श आहे , पण त्याच्या जवळपास मात्र नक्कीच आहे.

तुम्हाला उपलब्ध वेळेनुसार तुम्ही या नियोजनामध्ये योग्य बदल करू शकता.

मित्रहो आम्ही पुरवलेल्या पुस्तक सूची पेक्षा वेगळी पुस्तके आपण वाचत असाल तर हरकत नाही , पण शेवटी प्रश्न हे अधिप्रमाणित (Authentic) पुस्तकातूनच येतात ज्यांच्या आधारावर आपण एखाद्या प्रश्नाला आवाहन देऊ शकतो. तेंव्हा पुस्तके वाचताना जाणीवपूर्वक अधिप्रमाणित पुस्तकेच वाचनासाठी / अभ्यासासाठी निवडा.प्रथमतः शिल्लक दिवस आणि अभ्यासावयाचे विषय यांचा आढावा घेणे आवश्यक आहे, आपण जर 10 डिसेंबर या तारखेपासून अभ्यासाचे नियोजन करायचे ठरवले तर साधारणतः 90 पेक्षा अधिक दिवस आपणास अभ्यासासाठी उपलब्ध आहेत, आणि अभ्यासावयाचे विषय हे साधारणतः 7 आहेत ( इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , विज्ञान , बुद्धिमत्ता व गणित आणि चालू घडामोडी ) . तर साधारणतः आपल्या लक्षात येईल की प्रत्येक विषयासाठी आपल्याजवळ 13 दिवस उपलब्ध आहेत. मात्र , अभ्यास करताना आपणास सर्व विषय सारखेच सोपे किंवा अवघड नसतात. अशावेळी आपणास सोप्या विषयाचा वेळ आपण तुलनेने आपणास अवघड विषयासाठी देऊ शकतो. म्हणून आपन नियोजनात 2 विषयांचा समांतर अभ्यास करणार आहोत. म्हणजे एका दिवशी एकच विषय न वाचता 2 विषय घेणार आहोत. त्यामुळे अभ्यासात एकाच विषयाचा कंटाळा येणार नाही.

या 2 विषयाच्या जोड्या करताना एक करा की, एक सोपा व एक तुलनेने तुमच्यासाठी अवघड / कठीण विषय निवडा.

आता चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता व गणित हे विषय असे आहेत की ते रोजच्या रोज केले पाहिजेत. चालू घडामोडी रोज वाचल्या तर फायदेशीर असतात , तर गणित व बुद्धिमत्ता या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी रोजचा सराव हा केलाच पाहिजे , तेंव्हा या विषयासही  रोज वेळ देणे क्रमप्राप्त आहे.

आता अभ्यासाची वेळ:

सकाळ 8 ते 12 - एक विषय
दुपार 2 ते 6 - दुसरा विषय
रात्री 8 ते 10 - गणित व बुद्धिमत्ता/रोजचे रिव्हिजन

असे अभ्यासाचे विश्रांतीसह नियोजन करा , यामध्ये तुमच्या गरजेनुसार बदल करू शकता.


परीक्षेसाठी उरलेल्या 90 दिवसांचेही आपण 20 + 20 + 20 + 30 असे 4 भागात विभागणी केली आहे. यामध्ये आपला परिपूर्ण अभ्यास म्हणजे वाचन , उजळणी व प्रश्नपत्रिका सोडवणे याचा समावेश आहे.

आता 5 विषयांपैकी ( इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , विज्ञान ) 2 विषय ( एक सोपा व एक अवघड ) आपण पहिल्या 20 दिवसांत अभ्यासणार आहोत. ( समजा आपण पहिल्या 20 दिवसांसाठी इतिहास व भूगोल निवडले. )

पुढच्या 20 दिवसांत राहिलेल्या 3 पैकी 2 विषय अभ्यासासाठी घेणार आहोत.( समजा या 20 दिवसांत आपण राज्यशास्त्र व अर्थशास्त्र घेऊ. )

त्यानंतर पुढील 20 दिवसांत राहिलेला विषय आणि आधी केलेल्या 4 विषयांची उजळणी करणार आहोत. ( या 20 दिवसांत विज्ञान व इतर 4 विषयांची उजळणी करू .)

तर शेवटच्या 30 दिवसांत चालू घडामोडींवर एक नजर , सर्व विषयांची उजळणी (प्रत्येक विषयाला 2ते3 दिवस द्या.)आणि महत्वाचा भाग म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवणे या गोष्टी करणार आहोत. प्रश्नपत्रिका पूर्णपणे वेळेचे काटेकोर पालन करून सोडवण्याचा सराव करावा.

प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 11 ते 12 हाच वेळ द्या , जेणेकरून परीक्षेची वेळ व आपल्या सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याची वेळ सारखीच राहील.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे , तुम्ही ज्या पुस्तकातून वाचन केले आहे त्याच पुस्तकातून उजळणी करा, तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील तर उजळणी साठी त्याहून उत्तम दुसरे काही नाही , तेंव्हा उजळणीला खूप महत्व आहे.PSI पूर्व परीक्षेला सामोरे जाताना :
 • सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन अभ्यास चालू ठेवा जागा कमी कि जास्त? , किती मुले एक्साम ला बसले असतील?, कट ऑफ कमी कि जास्त? , पेपर अवघड कि सोपा? , माझं सिलेक्शन होईल की नाही ? अशा कोणत्याही विचारांच्या अधीन राहून अभ्यास करू नका . कोणत्याही दडपणाविना अभ्यास करा.
 • PSI च्या मागील प्रश्नपत्रिकांच्या बरोबर STI व ASO च्या मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की प्रत्येक विषयावर साधारणतः 12-15 प्रश्न विचारले गेले आहेत, तेंव्हा प्रत्येक विषयाला समान महत्व देऊन त्याचा सर्वांगीण अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यास हा पूर्णतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षार्थी म्हणूनच करा. एखादा विषय मागे / अवघड वाटत असल्यास त्यावर जास्त कष्ट घ्या.
 • अभ्यासक्रमाधारीत अभ्यासाला प्राधान्य द्या, जेणेकरून तुमची शक्ती नको त्या घटकावर वाया जाणार नाही.
 • चालू घडामोडींची जून 2016 पासूनची मासिके वाचून काढा , याआधीच्या परीक्षेमध्ये चालू घडामोदींवरील प्रश्न हे अगदी एक्साम पूर्वीच्या 15 दिवसांवरही विचारले गेले आहेत. त्यामुळे साधारण पेपर वाचन सुरु ठेवा , पण त्यातच जास्त वेळ गुंतून बसू नका.
 • चालू घडामोडीसाठी आपल्या ब्लॉगवरील चालू घडामोडी असतील किंवा आमच्या @ChaluGhadamod या टेलिग्राम चॅनेल वरील चालू घडामोडीही वाचू शकता. ब्लॉग वर अगदी जानेवारी 2016 पासूनच्या चालू घडामोडी वाचनासाठी उपलब्ध आहेत. शेवटच्या काळामध्ये आपण एक नजर या सर्व चालू घडामोडींवर टाकू शकता.
 • आम्ही सुचवलेल्या पुस्तकातून जर तुम्ही अभ्यास केला नसेल / वाचले नसेल तर गोंधळून जाऊ नका , जे पुस्तक आधी वाचले आहे त्यातूनच आणखी अभ्यास करा , उजळणी करा. ऐन परीक्षेच्या तोंडावर नवीन पुस्तक वाचायला घेणे धोकादायक ठरू शकते. 
 • उजळणी हा अभ्यासाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे , तेंव्हा प्रत्येक विषयाची किमान 2 वेळा उजळणी होईल अशा प्रकारे वेळापत्रकात बदल करू शकता . उजळणी तुम्ही काढलेल्या नोट्स / वाचलेल्या पुस्तकातूनच करा.
 • सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवणेचा भाग. शेवटच्या 30 दिवसात दररोज एक याप्रमाणे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून झाल्या पाहिजेत . याहून जास्त होत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. यासाठी आपण बाजारातील उपलब्ध प्रश्नपत्रिका संच किंवा एखाद्या चांगल्या क्लासच्या टेस्ट सोडवू शकता. ( आम्ही आमच्या eMPSCkatta  टेलिग्राम चॅनेल वर शेवटच्या महिन्यात सरावासाठी प्रश्नपत्रिका पुरवणार आहोत तेंव्हा आपण आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करायला विसरू नका .)
 • प्रश्नपत्रिका सोडवून झाल्या नंतर जर तुम्हाला कमी मार्क्स मिळत असतील तर घाबरण्याचे कारण नाही, किंवा जास्त पडले तर हुरळून जाण्याची गरज नाही. तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरे जा यश जास्त दूर नाही. 
 • स्पर्धेच्या युगात ज्ञानार्थी होण्याबरोबरच परीक्षार्थी होणे तितकेच आवश्यक आहे , तेंव्हा पूर्ण पणे ध्येयाधिष्टीत अभ्यास करा. 
आपल्या काही अडचणी / शंका असतील तर त्या आम्हाला येथे पाठवू शकता :
  तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा.