MPSC conduct these exams |
करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देण्याची मानसिकता मराठी पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. ही चांगली बाब आहे. पण स्पर्धा परीक्षांकडे वळण्यामागे केवळ शासकीय नोकरी, सरकारी बंगला, लाल दिव्याची गाडी, सामाजिक प्रतिष्ठा यांचेच नुसते आकर्षण असून चालणार नाही तर नेमके काय साध्य करायचे आहे याविषयी स्पष्टता असणे फार आवश्यक आहे. कारण आजही असे अनेक उमेदवार भेटतात ज्यांना आयएएस-आयपीएस व्हायचे असते, त्यासाठी यूपीएससीचे प्रयत्नसुद्धा सुरू असतात; पण एमपीएससीच्या विविध परीक्षांबाबत त्यांच्यात पूर्ण निरुत्साह दिसून येतो. बऱ्याचदा या परीक्षांबाबत त्यांना नीटशी माहितीसुद्धा नसते, असे निदर्शनास येते. पीएसआय/ एसटीआयसारख्या परीक्षांमध्ये आम्हाला स्वारस्य नाही, मी फक्त यूपीएससी करतो अशा ताठय़ामध्ये वावरणारा एक वर्ग आहे. तर एमपीएससीच्या
परीक्षेतून एखादे छोटे-मोठे पद मिळाले की पुरे झाले! यूपीएससीचे नंतर बघता येईल किंवा 'माझं ध्येय फौजदार होणे, इतर परीक्षांमध्ये मला स्वारस्य नाही,' असे म्हणणारे उमेदवारही आहेत. महत्त्वाकांक्षा असणे वा ध्येयवादी असणे गर नाही, पण करिअरच्या वाटेवर नेमके काय साध्य करायचे आहे या विषयीची स्पष्टता व ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची साथ असणे आवश्यक आहे.
एक आणि एकाच परीक्षेत अडकून पडल्यास उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता असते. दोन/ तीन प्रयत्न संपले तरी तीन-चार वर्षांचा अवधी हातातून निसटलेला असतो. अशा वेळी येणारे वैफल्य व बिथरलेली तरुणाई हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल. म्हणून केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांची नीट माहिती घेऊन उमेदवारांनी आपली योजना आखायला हवी. सर्वप्रथम, तयारी सुरू करताना नागरी सेवा परीक्षा, आयएएसचे ध्येय ठेवून अभ्यास सुरू केला पाहिजे. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास विस्तृत व व्यापक आहे. नागरी सेवा परीक्षा ही इतर सर्व परीक्षांमध्ये प्रमुख आणि काठिण्यपातळीत सर्वाधिक वरची मानली जाते. इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम यूपीएससीच्या जवळपास जाणारा असतो. हा अभ्यास चांगला झाला की इतर परीक्षांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता. यूपीएससीची तयारी करताना सामान्य अध्ययनाचा पायाभूत अभ्यास चांगला झाल्यामुळे इतर परीक्षांना सामोरे जाण्यात विशेष अडचण येत नाही आणि नव्याने अभ्यासही करावा लागत नाही. इतर परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षापद्धती, पॅटर्न यामध्ये काही अंशी फरक असतो, पण त्यासाठी तुम्हाला फार वेगळे आणि मोठे श्रम घ्यावे लागत नाहीत.
या एका परीक्षेच्या अभ्यासामुळे एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, पोस्ट, संरक्षण दल, एलआयसी अशा विविध परीक्षांना बसणे सोपे जाते. एकदा घेतलेल्या परिश्रमाचा सर्वत्र फायदा होताना दिसेल. एका परीक्षेच्या मेहनतीचा 'पॉपकॉर्न इफेक्ट' घडताना नक्कीच दिसेल. यासाठी थोडा कालावधी जरूर द्यावा लागेल, पण एका परीक्षेतील यश तुमच्या करिअरला स्थर्य देण्यात व तुमचे मनोबल उंचावण्यास कारणीभूत ठरू शकते. ध्येय जरूर आयएएसचे असावे, पण पीएसआय/ एसटीआय/ तलाठीसारख्या परीक्षासुद्धा देण्याची मानसिकता उमेदवारांनी बाळगली पाहिजे. आपली निवड काय किंवा कोणत्या पदावर काम करायची इच्छा आहे हा व्यक्तिगत इच्छेचा/ भावनेचा प्रश्न झाला. स्पध्रेत स्वत:ला 'चार्ज ' ठेवण्यासाठी आणि करिअर सुरक्षित करण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जाण्याची रणनीती व्यवहार्य आहे.
नागरी सेवा परीक्षा व राज्यसेवा परीक्षांचा अभ्यासक्रम किमान पूर्व परीक्षेच्या स्तरावर समान पातळीवर आला आहे. याचे अनेक गुणात्मक परिणाम गेल्या तीन वर्षांत आपण पाहिले आहेत. समान अभ्यासक्रमामुळे यूपीएससीची तयारी करणारे बहुतांश उमेदवार आता एमपीएससीच्या विविध परीक्षांना बसण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे एकापेक्षा अनेक परीक्षांचे पर्याय उमेदवारांसमोर उपलब्ध झाले, पण दुसरीकडे स्पध्रेची तीव्रता मात्र वाढली. एमपीएससीच्या सर्व परीक्षांचे स्वरूप, प्रश्नांची पद्धत, दृष्टिकोन बदलला आहे. पीएसआय/ एसटीआयसारख्या परीक्षांनंतरसुद्धा 'पेपर यूपीएससी पॅटर्नचा होता' अशी प्रतिक्रिया उमेदवारांची असते. एकूणच स्पर्धा वाढली आहे आणि उमेदवारांचा कस लागत आहे, हे गेल्या तीन वर्षांतील एमपीएससीच्या विविध परीक्षांचे कटऑफ आणि निकालावरून सिद्ध झाले आहे.
स्पर्धा परीक्षात झालेले व भविष्यात होत राहणारे बदल, बदलते प्राधान्यक्रम यांच्याशी जुळते घेण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन उमेदवारांनी अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळेच स्पर्धेत टिकणे शक्य होईल. म्हणूनच ध्येय यूपीएससी असेल किंवा एमपीएससी, इतर विविध स्पर्धा परीक्षांची माहिती
घेऊन अभ्यासाची योजना आखायला हवी.
राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात. सोबत दिलेल्या चौकटीत या परीक्षांची यादी दिलेली आहे. या सर्वच परीक्षा 'एमपीएससीची परीक्षा' याच नावाने ओळखल्या जातात. या विविध परीक्षांविषयी थोडक्यात माहिती पुढच्या भागापासून करून घेऊयात-
- राज्य सेवा परीक्षा (State Services Examination)
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Services Examination)
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-B Examination)
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. Civil Judge (Jr. Div.) Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam
- सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Examination)
- सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब (Assistant Engineer (Electrical) Grade-2, Maha. Electrical Eng. Services, B)
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा (Sales Tax Inspector Competitive Examintion)
- कर सहायक गट-क परीक्षा (Tax Assistant Examination)
- सहायक परीक्षा (Assistant Examination)
- लिपिक-टंकलेखक परीक्षा (Clerk typist Examination)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा