how to Read news paper for civil Services |
ब्रिटिशकालीन भारतात वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी एका बाजूला ज्ञान, शिक्षण आणि प्रबोधन तर दुसऱ्या बाजूला लोकांना संघटितरीत्या कृतिसज्ज बनवून वसाहतिक शोषणयंत्रणेच्या विरुद्ध उभे करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी राज्यसत्तेच्या कारभार प्रक्रियेची समीक्षा करून राज्यसत्तेला लोकाभिमुख बनविण्याची भूमिका स्वीकारली. १९९० नंतर माहिती- तंत्रज्ञान क्रांतीच्या परिणामातून माहितीचे नवनवीन स्रोत समोर आले. अशा परिस्थितीत वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना नव्या परिस्थितीला अनुकूल असे स्वरूप आत्मसात करणे भाग पडले. त्यातून साहजिकच माहितीच्या आदानप्रदान प्रक्रियेच्या स्पध्रेचा आरंभ झाला.
वृत्तपत्रांमध्ये दररोज स्थानिक पातळीवर घडलेल्या घटनांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घडामोडींपर्यंत आढावा घेतला जातो. त्यामध्ये घडलेल्या घडामोडींसंदर्भातील तथ्य, आकडेवारी, वर्णन आणि विश्लेषण अंतर्भूत असते. शासन आणि लोक यांच्यात आदानप्रदान किंवा संसूचन साधण्याचे कार्य वृत्तपत्राद्वारे पार पडते. थोडक्यात, अद्ययावत माहिती, दृष्टिकोन आणि विश्लेषणाच्या चर्चाविश्वाचा महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून वृत्तपत्रांकडे आणि नियतकालिकांकडे पाहिले जाते.
नागरी सेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी वृत्तपत्रांचा अभ्यास अनिवार्य ठरतो. सर्वसाधारणपणे ३० ते ४० टक्के तर कधी कधी यापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न वर्तमान घडामोडींवर विचारले जातात. मुख्य परीक्षेतील इतिहास, कला व संस्कृती घटक वगळता सामान्य अध्ययनाच्या पहिल्या तिन्ही पेपरमधील सर्व घटकांवरील प्रश्न, तसेच १२५ गुणांचा एक निबंध वर्तमान घडामोडींवरच बेतलेला असतो. बहुतांश वेळा व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये वर्तमान घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. थोडक्यात नागरी सेवा परीक्षेच्या तिन्ही टप्प्यांवर वृत्तपत्रांचे वाचन अपरिहार्य बनते.
या परीक्षेत वर्तमान घडामोडींचे महत्त्व असाधारण असल्याचा सूर सुरुवातीलाच ऐकायला मिळतो. 'करंट इव्हेन्ट' या शब्दाला मराठीत 'चालू घडामोडी' अशी संज्ञा प्रदान केल्याने आकलनात गफलत होऊ शकते. या परीक्षेच्या संदर्भात चालू घडामोडींचा अभ्यास याचा अर्थ दिवसभरात कोणत्या घटना घडून गेल्या, त्यांची माहिती संकलित करणे नव्हे. एखाद्या घडामोडीचा व्यापक पट लक्षात घेऊन, त्याची उकल करून, घटक-उपघटकाशी संबंधित घडामोडींचे नाते प्रस्थापित करून आपली मते तयार करण्याला सर्वसाधारणपणे वर्तमान किंवा समकालीन घडामोडींची तयारी म्हणता येते. अर्थात अशी तयारी करण्यासाठी प्रमाणभूत वृतपत्रे आणि नियतकालिकांची निवड अनिवार्य बनते.
नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासाच्या सुरुवातीला समकालीन घटनांसाठी वृत्तपत्रे आणि नियतकालिके वाचण्याची घाई करू नये. कारण अभ्यासक्रमांतर्गत घटक-उपघटकातील संकल्पनात्मक स्पष्टीकरण पूर्ण झाल्याविना वृत्तपत्रांमधील समकालीन घडामोडींचे वाचन वरवरचे ठरते. वर्तमान घडामोडींची तयारी करण्यापूर्वी 'एनसीईआरटी'ची निवडक क्रमिक पुस्तके आणि प्रमाणित संदर्भग्रंथांचे किमान एकवेळ तरी वाचन अत्यावश्यक बनते. अन्यथा सुरुवातीला वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा अभ्यास सुरू करण्यातून संदर्भ पुस्तकांचे वाचन मागे पडत जाते. त्यामुळे अभ्यासाच्या प्रारंभी वर्तमानपत्रे किंवा नियतकालिकांना दोन तासांपेक्षा अधिक अवधी देणे उचित ठरणार नाही.
वर्तमान घडामोडींचे तयार संच न वापरता वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा आधार घेऊन स्वत:च्या हातांनी लिहिलेले वाचन साहित्य कधीही फायद्याचे ठरते. कारण ते स्वनिर्मित असल्याने आपल्या जाणीव-नेणिवेत रुतलेले असते. खऱ्या अर्थाने या परीक्षेला अनुसरून काढलेल्या वर्तमान घडामोडींच्या मार्गदíशकांपेक्षा वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून वाचलेल्या वर्तमान घडामोडी दीर्घकाळ स्मरणात राहतात.
सर्वप्रथम वृत्तपत्रातील अभ्यासक्रमाला पूरक ठरणारे लेख आणि संपादकीय बाबींचे प्रामुख्याने वाचन करावे. वृत्तपत्रातील लेख दृष्टिकोन पुरवणारे, विषयाचे विविध आयाम स्पष्ट करणारे असतात. प्रथम वाचनातच संबंधित लेखाचे आकलन व्हावे ही अपेक्षा चुकीची ठरते. सुरुवातीला १०-२० टक्क्यांवर समाधान मानायला हरकत नाही. सातत्याने वाचन करीत राहिल्यास पुढे काही कालावधीनंतर लेखांचे समग्र आकलन व्हायला वेळ लागणार नाही. लेख वाचून त्यातून महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढावेत आणि स्वतंत्र पानावर त्या त्या मुद्दय़ांचा आपल्या भाषेत विस्तार करावा किंवा सारांश लिहून काढावा. आपण लिहून काढलेले सारांश पुन्हा एकवार संपादित करून अधिक बंदिस्त आणि गोळीबंद करावेत. ही प्रक्रिया दैनंदिन स्वरूपाची आणि सातत्यपूर्ण असायला हवी. परिणामी, या प्रक्रियेद्वारे आकलनाच्या जोडीला लेखनकौशल्ये विकसित करण्याची संधीही प्राप्त होते.
मुख्य परीक्षेकरता वर्तमान घडामोडींच्या अभ्यासासाठी वृत्तपत्रातील संपादकीय पानाचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्यावर संपादकीय टिप्पणीसोबत स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय वर्तमान घडामोडींवर अभ्यासकांचे लेख अर्थात समीक्षात्मक भाष्य, विश्लेषणात्मक लेख अंतर्भूत असतात. संबंधित लेखांमध्ये विषयाची विविध अंगे, उपघटक दाखवून त्यांचे विश्लेषणही समाविष्ट केलेले असते. अभ्यासकाने त्यात केलेली विषयाची रचना, त्यातील विधाने आणि समीकरणे, भाषाशैली तसेच त्यातील नवे शब्द सातत्याने आत्मसात करावेत.
अभ्यासक्रमाचे सर्वसाधारण घटक पाडून त्यानुसार वर्तमान घडामोडींचे वर्गीकरण करावे. उदा. सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आíथक इत्यादी घटकांनुसार वृत्तपत्रातील कात्रणे दररोज काढावीत किंवा संबंधित घटना स्वतंत्रपणे टिपून ठेवाव्यात. पुढे महिन्याच्या शेवटी वर्तमान घडामोडींची घटकांनुसार स्वतंत्र संदर्भवही तयार होत राहते. अशी वर्तमान संदर्भवही तयार करण्यासाठी द िहदू, इंडियन एक्स्प्रेस, योजना, कुरुक्षेत्र, बुलेटिन, सायन्स रिपोर्टर इत्यादींचा वापर करण्यास हरकत नाही.
या परीक्षेतील प्रश्नांचा आवाका पाहता ही परीक्षा खऱ्या अर्थाने वर्तमान घडामोडींच्या अभ्यासातील आपली कामगिरी जोखणारी असते. वर्तमान घडामोडींच्या अभ्यासावर आपली छाप उमटवून त्या घडामोडींना आपले रूप देणारे विद्यार्थी यशाची पायरी गाठू शकतो. म्हणूनच वर्तमानपत्र आणि नियतकालिकांचा दैनंदिन आणि सातत्यपूर्ण अभ्यास अत्यावश्यक मानायला हवा.
Sir,interview chi tyari kshi krta yeil rojchy study tun?
उत्तर द्याहटवाSir,interview chi tyari kshi krta yeil rojchy study tun?
उत्तर द्याहटवा