Post views: counter

निबंध लेखन एक दुर्लक्षित टप्पा

essay-writing-a-neglected-stage
                            डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेतील निबंधाच्या अनिवार्य प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने २५० गुणांसाठी दोन निबंध लिहिणे अनिवार्य केले. त्या अंतर्गत एक निबंध अमूर्त तत्त्वविचारावर आणि दुसरा वर्तमान घडामोडींवर बेतलेला आहे. या दोन्ही निबंधाला प्रत्येकी चार पर्याय दिलेले असल्याने निवडीला अधिक वाव आहे. प्रत्येक निबंध विषयास किमान शब्दमर्यादा एक हजार असून ही प्रश्नपत्रिका लेखी चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण बनली आहे.
                           निबंधाच्या प्रश्नपत्रिकेमधून विद्यार्थ्यांची ताíकक विचारक्षमता आणि विश्लेषणात्मक ताकद जोखणे हा आयोगाचा उद्देश आहे. अभ्यासाद्वारे तर्क आणि विश्लेषण यावर आधारित स्वत:ची विचारप्रक्रिया जागी करून निबंध लेखनामध्ये ती रूपांतरीत करणे गरजेचे आहे. निबंधातून विद्यार्थ्यांच्या विचाराची समग्रता, ताíककता, विश्लेषणक्षमता आणि मुद्देसूद लेखन कौशल्य जाणवायला हवे.

                          पहिल्या प्रकारच्या निबंधातून विद्यार्थी एखाद्या तत्त्वविचाराचा अमूर्त (abstract) पातळीवर कसा विचार करतो तसेच संबंधित तत्त्वविचार समाजजीवनाच्या विभिन्न क्षेत्रांशी कसा जोडतो याची चाचपणी केली जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारव्यूहाची मांडणी मोजली जाते. तद्वतच संबंधित तात्त्विक विधानाचे राजकीय, सामाजिक, आíथक आणि भौगोलिक संदर्भ दाखवता येणे अपेक्षित आहे. तत्त्वविचारांवर आधारलेल्या निबंधाचा लाभ सामान्य अध्ययनाच्या पेपर ४ मधील नीती, सचोटी, तत्त्वज्ञान आणि अभिवृत्ती या अभ्यास घटकांना होतो.
दुसऱ्या कोटिक्रमातील निबंधाद्वारे विद्यार्थ्यांचे समकालीन घडामोडीचे आकलन, बहुपदरी आणि खोलवर आहे का, याची चाचणी केली जाते. निबंध लेखनात वर्तमान घडामोडींवर प्रक्रिया करून तिचे विभिन्न आयाम उलगडून दाखविण्याची क्षमता विकसित करावी लागते. सर्वसाधारणत सामान्य अध्ययन १ ते ३ या पेपरमध्ये घटक उपघटकांचे वर्तमान उपयोजन अपेक्षित असते. आपसूकपणे या तिन्ही पेपरचा निबंधाच्या तयारीला थेट फायदा होतो.     
                          निबंध लेखन करताना भावनिक होऊन लेखन करू नये. लिखाणात पोकळ आदर्शवाद मांडू नये. संदर्भाशिवाय विधान करू नये. अवाजवी कल्पना करणे टाळावे. विद्वानांची ढोबळ मते उद्धृत करू नयेत. सुविचार किंवा सुभाषिते वारंवार लिहू नयेत. गुंतागुंतीची वाक्यरचना करू नये. भाषेच्या चुका टाळाव्यात. निबंध लेखनातून आपल्याला संपूर्ण सत्य समजले आहे, अशा आग्रहाचे लेखन करू नये. निबंध हा भाषणप्रकार नसून तो विषयाचे पृथक्करण आणि विश्लेषण करणारा असतो.
                          निबंध लिहिताना विद्यार्थ्यांच्या हातून कळत-नकळत वेगवेगळ्या स्वरूपाच्या चुका होत असतात. निबंध बहुतांश वेळा भरकटलेला असतो. निबंधाचे शीर्षक लेखनात अनेकवार उद्धृत केले जाते. एखादा मुद्दा स्पष्ट करताना तो मधेच अर्धवट सोडून दुसरा मुद्दा त्यात घुसडला जातो. त्यातील मुद्दय़ांचे सुसूत्रीकरण साधलेले नसते. निबंधात एकसंधपणा दिसून येत नाही. बऱ्याचदा निबंधाच्या मांडणीमध्ये एकसुरीपणा आढळतो.
                         लेखी चाचणीमध्ये निबंध लेखनास तीन तास नेमून दिलेले असतात. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पर्यायातील एक-एक अशा दोन निबंधांची निवड करून त्याचा आराखडा बांधण्यास सुरुवात करावी. सर्वसाधारणपणे एका निबंधाला दीड तास वेळ उपलब्ध होतो. त्यापकी प्रत्येकी एका निबंधाला २० मिनिटे राखीव ठेवून त्याचा कच्चा मसुदा तयार करावा. काढलेल्या मुद्दय़ांची नीट रचना आखावी. त्याला समान लय प्रदान करावी. अशा प्रकारच्या नियोजनातून दिलेल्या वेळेत निबंध लेखनाला यथोचित न्याय देता येतो.
खरे तर निबंध लेखनातून उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व उलगडले जाते. वास्तविक पाहता निबंधाची तयारी शैक्षणिक वाटचालीसोबत समांतरपणे घडून येत असते. तुमचा वैचारिक विकासच त्यात दडलेला असतो. तो घडवून आणण्यासाठी प्रमाणित संदर्भ साहित्याचे वाचन आणि त्या अनुषंगाने लेखन करण्याची सवय सुरुवातीपासून करायला हवी.
                       निबंध लेखन ही एक प्रकारची कला असल्याने यासाठी लेखनतंत्रे विकसित करावी लागतात. सर्वप्रथम संदर्भ ग्रंथामधील एखादे प्रकरण किंवा वर्तमानपत्रातील एखादा लेख वाचताना त्यातील काही मुद्दे स्वतंत्रपणे लिहून काढावेत. त्यानंतर काढलेल्या मुद्दय़ांचा आपल्या भाषेत विस्तार करावा किंवा त्या मुद्दय़ांच्या आधारे २००-३०० शब्दांमध्ये सारांश लिहून काढावा. ही लेखन प्रक्रिया सातत्यपूर्ण असायला हवी. (याचा फायदा 'सीसॅट'मधील 'उताऱ्याचे आकलन' या उपघटकाला होतो.) अभ्यासातून पुढे आत्मविश्वास वाढीला लागला की, ठरावीक विषयावरील दोन-तीन लेखांचा आधार घेऊन वरचेवर आपल्या लिखाणातील शब्दसंख्या वाढवत न्यावी. निबंध लेखन एक हजार शब्दसंख्येपर्यंत वाढवत नेण्यासाठी असे तंत्र अवलंबणे कधीही फायदेशीर ठरते. निबंध लेखनात तुलना, विश्लेषण, समीक्षा तसेच संदर्भासह स्पष्टीकरण यायला हवे. स्थानिक विषयावर लेखन करताना वैश्विक उदाहरणे आणि वैश्विक संदर्भात लेखन करताना स्थानिक उदाहरणे देणे अधिक महत्त्वपूर्ण ठरते.
                     निबंध लेखनाची प्रस्तावना विषयाला सुसंगत आणि समर्पक असावी लागते. त्यातून आपली वैचारिक प्रगल्भता स्पष्ट होते. २००९ साली संपूर्ण भारतात ३७ गुणानुक्रमे यशस्वी झालेल्या शीतल उगले यांनी 'विशेष आíथक क्षेत्र' या निबंधाची सुरुवात पुढीलप्रमाणे केली होती-'स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांपुढे एक पेच कायम होता, तो म्हणजे विकास साधायचा तर सामाजिक न्यायाचे काय करायचे आणि सामाजिक न्याय संपादित करायचा तर विकासाचे काय करायचे?' त्यांना निबंधाच्या पेपरला २०० पकी १३६ गुण मिळाले. असे समीकरणात्मक विधान करण्याची ताकद विश्लेषणात्मक आणि समीक्षात्मक संदर्भ ग्रंथ आणि वृत्तपत्रांतील लेखांच्या वाचनातून येते. त्यातून स्वत:चा दृष्टिकोन विकसित होण्याबरोबर विश्लेषणक्षमता वाढीस लागते. चौफेर वाचन, संशोधनात्मक दृष्टी असल्याशिवाय अशी सुरुवात करता येत नाही.
                   सामान्य अध्ययनाच्या तयारीचे स्वरूप कसे आहे यावर निबंधाचे यश अवलंबून आहे. आपली तयारी गाइडस्मधून होत असेल तर निबंधामध्ये अधिक गुण प्राप्त करण्याचे उद्दिष्ट तर बाजूला पडतेच, किंबहुना आपली लेखनकला वृिद्धगत होण्याऐवजी आक्रसली जाते. म्हणून विविध विषयांवर चौफेर वाचन, त्याविषयी चिंतन आणि प्रत्यक्ष लेखन याद्वारे निबंध लेखनाचा पेपर प्रभावी करण्यावर भर देणे केव्हाही श्रेयस्कर!

Source : Loksatta.com

३ टिप्पण्या:

  1. निबंध लेखन उस गद्य रचना को कहते हैं जिसमें एक सीमित आकार के भीतर किसी एक विषय का वर्णन या प्रतिपादन एक विशेष निजीपन, स्वच्छन्दता, सजीवता, संगति एवं सुसम्बद्धता के साथ किया जाता है।

    उत्तर द्याहटवा
  2. निबंध लेखन पर आपका यह विचार काफी सराहनीय एवम लोगो के मन को एक नया दृष्टिकोण देने के लिए पर्याप्त है| निबंध लेखन में अलंकारित भाषा जैसे की संस्कृत में सभी चीज एक अलंकारित लगती है|

    उत्तर द्याहटवा