राज्यव्यवस्थेवर दरवर्षी साधारणत: ८ ते १० गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. वस्तुत: हा घटक राज्यसेवेची परीक्षा पात्र होऊन शासकीय अधिकारी बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिचयाचा असतो. कारण राज्यघटना व राज्यव्यवस्थेसंबंधी कुतूहल असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे आकर्षति होतो.स्वाभाविकच विद्यार्थी भारतीय राज्यव्यवस्थेचा पाया असलेली राज्यघटना नेमकी कशा स्वरूपाची आहे? राज्यघटनेत नेमके काय अंतर्भूत आहे? घटनेत सार्वजनिक प्रशासनासंबंधी नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत? यापासून ते राज्यघटनेचा प्रत्यक्ष व्यवहार कसा झाला? त्या व्यवहाराची सद्य:स्थिती काय आहे? आणि भवितव्य काय? अशा आव्हानात्मक प्रश्नांची उत्तरे शोधू लागतो. त्यातूनच विद्यार्थ्यांचे या घटकाचे अकलन वाढते. एकाअर्थी स्पर्धा परीक्षार्थीसाठी हा घटक जिव्हाळय़ाचा ठरतो. परिणामी पकीच्या पकी गुण प्राप्त करून देणारा घटक म्हणून याचा विचार करता येतो. किंबहुना प्रत्येक परीक्षार्थीने यादृष्टीनेच याचा विचार करावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यघटना व राज्यव्यवस्था या घटकाचा अभ्यासक्रम सविस्तरपणे नमूद केला आहे. यात भारतीय राज्यघटनेचा उगम, निर्मिती, स्वरूप व वैशिष्टय़े; मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये; केंद्रीय कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ; राज्य कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ; न्यायव्यवस्था; महत्त्वाची घटनात्मक पदे आणि निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष व दबावगट या प्रमुख
प्रकरणांचा समावेश होतो. तसेच या प्रत्येक प्रकरणात अंतर्भूत होणारे उपघटकही नमूद केले आहेत. यासंदर्भात लक्षात ठेवायची एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ होय. म्हणजे भारतीय पातळीबरोबरच महाराष्ट्र राज्याच्या स्तरावरील घटनात्मक तरतुदी व यंत्रणांचा समांतरपणे अभ्यास करणे अत्यावश्यक ठरते. प्रस्तुत अभ्यासक्रमाची बारकाईने पाहणी करून अभ्यासाची व्याप्ती ठरवता येते. कारण पुढे या घटकासाठी वाचावयाचे संदर्भ, त्यातील प्रकरणांचे वाचन व नोट्सची तयारी आणि त्यावरील वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नांची तयारी करण्यासाठी या घटकाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती लक्षात घेणे ही प्राथमिक बाब ठरते.प्रामुख्याने घटनात्मक इतिहास, त्यासंबंधी विविध घटना, घटनात्मक तरतुदी, काही घटनात्मक पदासंबंधी माहिती (पात्रता, नियुक्ती, अधिकार, कार्य व जबाबदारी, बढतर्फीची पद्धत), घटनादुरुस्ती, न्यायालयाचे निवाडे, निवडणुकांसंबंधी माहिती या प्रकरणांविषयीचे प्रश्न विचारल्याचे दिसून येते. प्रस्तुत अभ्यासघटकांची तयारी करताना घटनात्मक तरतुदी, त्यातील दुरुस्त्या आणि न्यायालयाचे त्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण निवाडे असे कोष्टक बनवावे.
महत्त्वाचे म्हणजे यातील प्रकरणासंबंधी कोणत्याही स्वरूपाची चालू घडामोड घडल्यास त्यासंबंधी माहिती संकलित करावी. उदा., गेल्या वर्षभर आणि या वर्षीही लोकपाल विधेयकासंबंधी बरीच चर्चा सुरू आहे. लोकपाल म्हणजे काय? या संस्थेचा उगम कुठे झाला? भारतात ही संकल्पना सर्वप्रथम केव्हा उदयास आली? टीम अण्णांनी मांडलेली जनलोकपालाची संकल्पना व तिची वैशिष्टय़े आणि शासनाने डिसेंबर २०११ मध्ये मांडलेल्या विधेयकाची वैशिष्टय़े व त्यातील लोकायुक्तासंबंधी तरतुदींची माहिती संकलित करावी. सध्या किती राज्यांत लोकायुक्ताचा कायदा आहे? चच्रेतील लोकायुक्त व घटकराज्ये, त्याची कारणे, अशा महत्त्वपूर्ण आयामाविषयी नेमकी व अद्ययावत माहिती असणे अत्यावश्यक ठरते.अशारीतीने अभ्यासक्रम आणि गेल्या १० वर्षांतील या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करून अभ्यासाची व्याप्ती व पद्धती ठरवावी.
घटनेचा उगम व निर्मिती हे पहिले प्रकरण ते निवडणुकांची प्रक्रिया या प्रकरणापर्यंत सर्वसमावेशक अशी चौकट तयार करून त्याआधारे प्रकरणनिहाय नोट्स तयार कराव्यात. तांत्रिक माहितीची कोष्टके बनवावीत. स्वयं तयार केलेल्या नोट्सची सातत्याने उजळणी करावी. त्याआधारे बरीच माहिती व घटना कायमस्वरूपी स्मरणात ठेवता येतील. विस्मरणात जाणारा भाग कोणता याचे अधोरेखन करता येईल. अशा बाबींचे सतत वाचन करण्यावर भर द्यावा. प्रस्तुत घटकाच्या तयारीतील आणखी एक निर्णायक बाब म्हणजे संदर्भग्रंथाची निवड होय. प्रारंभी नागरिकशास्त्राचे पायाभूत पुस्तक वाचून राज्यघटनेसंबंधी प्राथमिक स्वरूपाची माहिती प्राप्त करावी. त्यानंतर सखोल तयारीसाठी ‘भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड-१’ हे पुस्तक, महाराष्ट्र वार्षकिी’ (यातील महाराष्ट्राचे शासन व राजकारण हे प्रकरण) या संदर्भाचा वापर करावा.
या घटकासंबंधी चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी वर्तमानपत्रे व नियतकालिकांचा नियोजित वापर करावा. या विषयाची तयारी करताना वाचनात वारंवार काही संकल्पनांचा संदर्भ उदा., राज्य, राष्ट्र-राज्य, संघराज्य, अर्धसंघराज्य, एकात्म पद्धती, धर्मनिरपेक्षता, संसदीय व अध्यक्षीय पद्धती, गणराज्य, लोकशाही, संसदीय कामकाजातील विविध संकल्पना इ. या संकल्पनांचे अचूक व नेमके आकलन बऱ्याच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अत्यावश्यक ठरते.शेवटी राज्यघटना व राज्यव्यवस्थेच्या घटकांवरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा नियमित व भरपूर सराव करावा. एकंदर पाहता अभ्यासक्रमाचे सखोल आकलन, प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म विश्लेषण, योग्य, अद्ययावत संदर्भाचा वापर, सर्वसमावेशक अभ्यास आणि प्रश्नांचा भरपूर सराव याद्वारे या घटकांत पकीच्या पकी गुण मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल यात शंका नाही.राज्यघटना व राज्यव्यवस्थेच्या घटकाची नेमकी तयारी करता यावी यादृष्टीने मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. त्यादृष्टीने पुढील तक्त्यात दिलेली २००७ ते २०११ या पाच वर्षांतील या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची संख्या मार्गदर्शक ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा