Post views: counter

यशासारखे यश नाही






नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालाच्या काही पैलूंची चर्चा काल आपण केली. आज आपण त्या निकालातून कशाप्रकारे यशासाठी प्रेरणा घेता येईल ते पाहू. 
वाचक प्रश्न 
यूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी अनेक जण आधीच कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीत आहेत. विशेषत: असे दिसते की राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यशस्वी झालेले उमेदवार यंदाच्या यादीतही आहेत. काही उदाहरणेच बघायची तर धीरज सोनजे, मुकुल कुलकर्णी, सायली ढोले, सचिन घागरे या सर्वांची आधीच राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांनीच आता यूपीएससीत यश मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या रमेश घोलप याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. तो एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आला व त्याच वर्षी यूपीएससी परीक्षेत त्याची आयएएस पदावर निवड झाली. 

या सर्व चर्चेचा सारांश असा की यूपीएससी करायचे की एमपीएससी हा प्रश्न अनेक उमेदवारांना पडतो, पण त्या प्रश्नाने गोंधळून जायची गरज नाही. दोन्ही परीक्षा आता एकमेकांना समांतरच आहेत. एकाच वेळी दोन्ही देता येतात व दोन्हीमध्ये एकाचवेळी यश मिळवता येते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकते, असेही आपण यंदाच्या निकालाकडे बघून म्हणू शकतो. उदा. सायली ढोले हिने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा देऊन उपजिल्हाधिकारी पद मिळवले व आता यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात रँकही मिळवली आहे. स्पर्धा परीक्षांच्या मैदानात जे उमेदवार गंभीरपणे उतरतात, ते कुठले ना कुठले पद मिळवतातच, असे दिसून येते. दुसरीकडे कुठलेही मोठे पद मिळाल्यानंतरच पुढचे यश मिळते, असे नाही. अगदी छोट्या परीक्षाही (मंत्रालय सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक) दिल्या पाहिजेत. मुळात कोणत्याच परीक्षेला व पदाला कमी लेखू नये. एखादे जरी पद मिळाले की आत्मविश्वास वाढतो व त्यातून पुढचे यश मिळत जाते. यशासारखे यश नाही, असे म्हणतात ते यासाठीच! 

अल्पसंतुष्ट राहू नका 
कोणतेही पद मिळाल्यावर हा धोका असतो, की काही तरी मिळवून दाखवायची जिद्द कमी होऊ शकते. नाही म्हटले तरी अभिनंदन, सत्कार यात गुंतायला होते. त्यातून मग पुढचे यश निसटू शकते. पण आपण यंदाचा निकाल पाहिल्यास या समस्येवर मात करून यश काढणारे उमेदवार दिसतील. अबोली नरवणे हिने मागच्याच वर्षी १६३वी रँक काढली होती. पण पुन्हा परीक्षा द्यायचे तिने ठरवले. जेव्हा या पुढच्या प्रयत्नाच्या तयारीसाठी आमची भेट झाली, तेव्हा उत्सुकतेने मी तिला विचारले होते, की मागचाच जोश कायम आहे का? तेव्हा अबोली म्हणाली, की नाही म्हटले तरी शैथिल्य आले आहे. पूर्वी कोणी विचारले की 'कॉफी प्यायला जायचे का?' तर मी लगेच काटेकोर विचार करायचे की त्यात किती वेळ जाईल आणि मग नकारच द्यायचे. आता कोणी विचारले तर मी लगेच तयार होईन. थोडक्यात पुन्हा नव्या उत्साहाने त्याच परीक्षेची तयारी करणे सोपे नसते. पण अबोलीने आपली रँक सुधारून दाखवून दिले आहे, की इच्छाशक्ती प्रबळ असेल तर शैथिल्यावर मात करता येते. 

वरच्या रँकसाठीचे प्रयत्न 
अथक प्रयत्न करून वरची रँक आणणारे उमेदवारही आहेत. या वर्षीच्या यादीतील सचिन ओंबासे याचे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर असलेल्या सचिनने २००९मध्ये परीक्षा दिली, पण त्यात मुलाखतीपर्यंत पोहोचूनही यश आले नाही. त्यानंतर त्याने २०१०मध्ये २२८वी रँक मिळवली, २०११च्या परीक्षेत ४१०वी रँक, २०१३मध्ये २१५वी रँक आणि शेवटी २०१५मध्ये १६४वी रँक प्राप्त केली. भारतीय महसूल सेवा (आयआरएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) असे थांबे घेत त्याने यावेळी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) मिळवलीच. या जिद्दीला मानायला हवे. तुषार मोहिते, रत्नाकर शेळके हेही असे काही जिद्दी उमेदवार आहेत, ज्यांनी अल्प यशावर समाधान न मानता प्रत्येक वेळी जोरदार मुसंडी मारली. हा 'बचेंगे तो और भी लढेंगे'चा अनोखा मंत्र आहे. 'स्वप्न म्हणजे आपण जे झोपल्यावर बघतो, ते नव्हे, तर जागेपणी बघतो ते स्वप्न' असे डॉ. अब्दुल कलाम म्हणतात. असे जागेपणी स्वप्न पाहून, त्यासाठी जे प्रयत्न करतात, त्यांना विजयश्री यशोमाला घालते. 

यशाचे नवे मानदंड 
अनेकांनी नोकरी करून पद काढले आहे. त्यातून हे दाखवून दिले आहे, की पूर्णवेळ अभ्यास करूनच पदप्राप्ती करता येते असे काही नाही. एखादा उमेदवार पूर्णवेळ अभ्यास करतोय, की नोकरी करून परीक्षा देतोय हा प्रश्न कमी महत्त्वाचा असून उमेदवाराचा फोकस, सातत्य व यशप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करायची तयारी हे गुण निर्णायक ठरतात. मागे एका कार्यक्रमात अबोली म्हणाली होती, की यूपीएससी करताना तुम्ही त्यात पूर्ण बुडून जाता. दुसरे काहीही दिसत नाही की सुचत नाही. तुम्ही यूपीएससी खाता, यूपीएससी पिता, यूपीएससी जगता व त्याचाच श्वास घेता. ही अवस्था आपोआपच येते. याचा अर्थ हे सर्व यशस्वी विद्यार्थी फक्त पुस्तकी कीडा असतात, असे नाही. उलट त्यांच्यात कलागुणही असतात. स्वत: अबोली कथक नृत्यात प्रवीण आहे. तिने पूर्वी कथकचे जाहीर कार्यक्रमही केले आहेत. मागच्या वर्षी यशस्वी झालेली प्राजक्ता ठाकूर चांगली गायिका आहे. श्रीकांत येईलवाड या यशस्वी उमेदवाराला गिर्यारोहणाचा छंद आहे, तर धीरज सोनजे याला ब्लॉगिंग व ट्विटिंग करणे आवडते. योगेश भरसट याला फ्लूट वाजवायला आवडते, तर रोहन आगवणे याला टेनिस खेळण्याची आवड आहे. एकंदरीतच या सर्वांचा अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमधील सहभाग ठळक दिसून येतो. पण ध्येयप्राप्तीसाठी आपले छंद तात्पुरते बाजूला ठेवावे लागतात हेही तितकेच खरे.
- भूषण देशमुख 
लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा