Post views: counter

Current Affairs Feb 2016 part- 2

 

 
 • उद्योजकांसाठी 'स्टार्ट अप्स महाराष्ट्र' ही योजना :
रोजगारनिर्मिती करून अर्थव्यवस्था बळकट करणाऱ्या नव्या उद्योजकांसाठी राज्य सरकारने 'स्टार्ट अप्स महाराष्ट्र' ही योजना आखली आहे.
 तसेच या योजनेमुळे उद्योग उभारणीची प्रक्रिया सुलभ होणार असून, तिचे स्वतंत्र धोरण ठरविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या उद्योग खात्याचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी दिली.
 राज्यातील 'स्टार्ट अप्स'निर्मितीची गरज ओळखून त्यांना नेमक्‍या सवलती देण्याचा योजनेचा उद्देश आहे.
 देशात प्रथमच राज्याच्या पातळीवर अशा प्रकारची स्वतंत्र योजना राबविली जाणार आहे.
 'नव्या उद्योगाच्या उभारणीच्या प्रक्रियेत प्रशासकीय हस्तक्षेप होणार नाही,' याची काळजी नव्या धोरणात घेतली जाणार आहे.
 उद्योजकांशी संवाद साधूनच हे धोरण ठरविण्यात येत असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 • विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन :
न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात उत्तर सादर करण्यापूर्वी विशेष सर्वसाधारण
सभेचे आयोजन करण्याचा (दि.7) निर्णय घेतला.
 व्यवसायाने वकील असलेले बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आपल्या विधी समितीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
 बीसीसीआयच्या नियमानुसार एजीएमच्या आयोजनासाठी 21 दिवसांपूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे, पण विशेष अधिकाराचावापर करीत अध्यक्ष सचिवांना कमी वेळेच्या नोटीसवर एजीएमचे आयोजन करण्याची सूचना करू शकतात.
 तसेच अशा परिस्थितीत किमान 10 दिवसांपूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे.
 सर्वोच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारी रोजी स्पष्ट केले होते की, ‘समितीच्या शिफारशी साध्या सरळ, तर्कसंगत, समजण्यायोग्य आणि आदर करण्यासारख्या आहे.
 • दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णमय कामगिरी कायम :
यजमान भारताने 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही सुवर्णमय कामगिरी कायम राखली.
 भारताने जलतरण, कुस्ती आणि भारोत्तोलन या क्रीडाप्रकारांमध्ये वर्चस्व कायम राखताना जास्तीत जास्त सुवर्णपदकांवर नाव कोरले.
 भारताने 28 सुवर्ण, 12 रौप्य आणि 3 कांस्यपदकांसह एकूण 43 पदकांची कमाई करताना अव्वल स्थान कायम राखले.
 श्रीलंका 8 सुवर्ण, 17 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
 भारताने(दि.7) सर्वाधिक पदकांची कमाई जलतरणामध्ये केली, भारताने जलतरणामध्ये 10 पदके पटकावली, त्यात चार सुवर्ण, पाच रौप्य व एक कांस्यपदकांचा समावेश आहे.
 जलतरणामध्ये (दि.7) सात स्पर्धा झाल्या, त्यात पाच नवे विक्रम नोंदवले गेले.
 भारताच्या संदीप सेजवालने नवा विक्रम नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 • अमेरिकेतील निवडणुकीविषयी :
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, नोव्हेंबर 2016 मध्ये होणाऱ्या या निवडणुकीची जगभर चर्चा होताना दिसत आहे.
 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीविषयी खास ‘ईसकाळ‘साठी कनेक्टिकट राज्यातील स्टॅमफोर्ड शहरात राहणारे वाचक प्रदीप जाधव वार्तांकन करणार आहेत.
 जगभरातील ईसकाळच्या वाचकांना प्रदीप जाधव सहजसोप्या भाषेतून निवडणुकीविषयी इत्यंभूत माहिती पुरविणार आहेत.
 प्रदीप जाधव हे मुळचे पुण्याचे रहिवाशी असून, ते 1977 पासून अमेरिकेत स्थायिक आहेत.
 आतापर्यंत अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुका जवळून पाहिलेले प्रदीप जाधव यंदाची निवडणूक आपल्यापर्यंत पोचविणार आहेत.
 अमेरिकन घटनेने लेजिस्लेटिव्ह ब्रँचला काही मुख्य व महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत
 आर्थिक (फायनान्स), अर्थसंकल्प (बजेट) व कर (टॅक्सेशन) संदर्भात अधिकार
 कर जमा करुन मिळविलेल्या उत्पन्नातून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत व कल्याणकारी प्रकल्पांकरिता आर्थिक तजवीज करणे.
 पेटंट्स (वस्तु हक्क) व कॉपी राईट्स (मालकी हक्क) मंजूर करणे व मान्यता देणे.
 अमेरिकेच्या टपाल खात्याची जबाबदारी देखील या खात्यावर आहे.
 युद्ध घोषित करण्याचे अधिकार या ब्रँचला देण्यात आले आहेत. तो अधिकार अध्यक्षांना नाही.
 सिनेटर्स व काँग्रेसमन्सच्या परवानगीशिवाय अमेरिका युद्ध करू शकत नाही.
 समतोलता आणि संतुलन राखण्याच्या तरतुदीनुसार ‘एक्झेक्युटिव्ह‘ ब्रँचवर देखरेख ठेवणे व कारभाराची चौकशी करणे.
 • उत्तर कोरियाकडून उपग्रह प्रक्षेपण :
उत्तर कोरियाने अग्निबाणाच्या मदतीने पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला.
 जगातील अनेक देशांनी ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीच छुपी चाचणी होती असे सांगून निषेध केला आहे.
 तसेच या घटनेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन झाले असून उत्तर कोरियाने अलीकडेच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती.
 आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाला शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक र्निबध आधीच लादले आहेत, त्यात आता भर पडणार आहे.
 अग्निबाणाने कक्षेचा अंतिम टप्पा यशस्वीरीत्या गाठला की नाही हे खात्रीलायकरीत्या समजलेले नाही पण अमेरिकी संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अग्निबाण अवकाशात यशस्वीरीत्या उडाला.
 • 'यिन' मंत्रिमंडळाची स्थापना :
नव्या दमाचे, नव्या उमेदीचे व युवा नेतृत्वाच्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या पहिल्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली असून, 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'ने (यिन) या अभिनव उपक्रमाचा (दि.7) यशस्वी शुभारंभ केला.
 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 'यिन'च्या राज्यव्यापी नवनियुक्‍त महाविद्यालयीन प्रतिधिनींचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळाला माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी राष्ट्रहिताची व सामाजिक कर्तव्याची शपथ दिली.
 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रांत निकोप व सक्षम नेतृत्व उभारण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात 'यिन'ची बांधणी करण्यात आली आहे.
 राज्यातील तीन हजार महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान करत आपले प्रतिनिधी निवडले आहेत.
 तसेच या प्रतिनिधींच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात दोन या प्रमाणे 72 जिल्हा विद्यार्थी प्रतिनिधींची मतदानातूनच निवड करण्यात आली आहे.
 प्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सरकारच्या यंत्रणेप्रमाणेच खातेनिहाय मंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
 • नेट निरपेक्षता कायम राखण्याचा निर्णय :
इंटरनेट वापराच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याच्या प्रयत्नांना टेलिकॉम ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) दणका दिला असून नेट निरपेक्षता (नेट न्यूट्रॅलिटी) कायम राखण्याचा निर्णय दिला आहे.
 तसेच वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वापरण्यासाठी मोबाईल ऑपरेटर कंपन्यांनी देऊ केलेल्या प्रस्तावांवर 'ट्राय'ने बंदी घातली आहे.
 आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना दररोज 50 हजार रुपये असा दंड आकारला जाईल.
 इंटरनेट सेवेसाठीच्या भेदभावपूर्ण दरआकारणीवर प्रतिबंध घालणारा 'प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेटरी टेरिफ फॉर डेटा सर्व्हिसेज रेग्युलेशन, 2016' आदेश 'ट्राय'ने जारी केला.
 'ट्राय'चे अध्यक्ष आर. एस. शर्मा हे आहेत.
 आणीबाणीच्या काळात इंटरनेट सेवा पुरवठाधारक 'टेरिफ प्लॅन' कमी करू शकतात.
 • ज्येष्ठ उर्दू साहित्यिक निदा फाजली यांचे निधन :
ज्येष्ठ उर्दू साहित्यिक व शायर निदा फाजली यांचे (दि.8) वर्सोवा येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, ते 78 वर्षांचे होते.
 फाजली यांची ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता, कभी जमीं तो कभी आसमां नही मिलता’, ‘होशवालो को खबर क्या..’, ‘तू इस तरह मेरी जिंदगी मे शामिल है’, ‘दुनिया जिसे कहते है’ आदी गझलांनी खूप वर्चस्व केले.
 मुक्तिदा हसन निदा फाजली असे त्यांचे पूर्ण नाव होते.
 दिल्ली येथे एका काश्मिरी कुटुंबात 12 ऑक्टोबर 1938 मध्ये त्यांचा जन्म झाला.
 • भारतीय संघाचे निर्विवाद वर्चस्व :
भारतीय खेळाडूंनी कुस्ती, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, वुशू, सायकलिंग क्रीडाप्रकारांमध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
 कुस्ती प्रकारात भारतीय मल्लांनी एकूण 14 सुवर्ण व 2 रौप्यपदके जिंकली.
 वेटलिफ्टिंगमध्ये चार, जलतरणमध्ये तीन, तिरंदाजीमध्ये दोन, स्क्वॅशमध्ये एक, सायकलिंगमध्ये दोन आणि वुशूमध्ये एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले.
 भारतीय संघाने (दि.8) पर्यंत 53 सुवर्ण, 20 रौप्य व 6 कांस्यपदके जिंकली आहेत.
 वुशू : भारताला 1 सुवर्ण, 1 रौप्य
 सायकलिंग : पुरुष व महिला संघांना सुवर्ण
 स्क्वॉश : ज्योत्स्ना चिन्नप्पाला सुवर्ण
 बॅडमिंटन : सांघिक स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण
 तिरंदाजी : भारताला दोन सुवर्ण
 भारोत्तोलन : कबितादेवी आणि विकास ठाकूर यांना सुवर्ण
 भारतीय मल्लांना : 16 पैकी 14 सुवर्ण
 • आयकर विभागाकडून आर्थिक वर्षात रिफंड :
आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे.
 केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ही माहिती दिली.
 तसेच अधिया यांनी म्हटले की, 2015-16 या आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत 1.75 कोटी करदात्यांना 1 लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे.
 करदात्यांना रिफंड लवकरात लवकर मिळावा यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) गेल्या वर्षी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या.
 50 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे रिफंड लवकरात लवकर अदा करण्यात येतील.
 • विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट’ निवृत्त :
भारतीय नौदलाच्या सेवेत एकूण 29 वर्ष राहिलेली आणि जगातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल 57 वर्षे कार्यरत राहिलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट’ येत्या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहे.
 ‘आयएनएस विक्रांत’ या भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती इंग्लंडतर्फे 1945 साली करण्यात आली,तिचे सुरुवातीचे नाव ‘एचएमएस हक्र्युलस’ होते.
 4 मार्च 1961 रोजी ती भारतीय नौदलात दाखल झाली. त्यानंतर ‘एचएमएस हर्मिस’ भारताने ब्रिटनकडून विकत घेतली.
 12 मे 1987 रोजी ती भारतीय नौदलात रीतसर दाखल झाली, त्यानंतर 1997 सालपर्यंत या दोन्ही विमानवाहू युद्धनौकांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.
 ‘आयएनएस विक्रांत’च्या नावावर तर 1971 च्या युद्धातील गौरवास्पद कामगिरीही नोंदलेली होती.
 • ब्रेंडन मॅकल्‌मला विजयी निरोप :
न्यूझीलंड क्रिकेट संघाने (दि.8) माजी कर्णधार ब्रेंडन मॅकल्‌म याला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून विजयी निरोप दिला. तसेच तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने 55 धावांनी विजय मिळविला.
 मॅकल्‌मचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. या मालिकेनंतर निवृत्त होणार आहे.
 • अग्निशामक दलातही महिला ब्रिगेड :
अग्निशामक दलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही आता महिलांना चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
 राज्य सरकारने 'फायर अकादमी'साठी पुढाकार घेतल्याने महिलांनाही या क्षेत्रात कामगिरीची संधी मिळणार आहे. ही अकादमी पालघर येथे होणार आहे. तसेच या आधी नवी मुंबई आणि भिवंडीत हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार होता; पण पालघरमध्ये नवनवीन आस्थापनांचे जाळे तयार होत असल्याने फायर अकादमी तिथेच सुरू करण्याचे ठरले आहे. आपत्कालीन स्थितीत अद्ययावत संभाषण यंत्रणेसाठी महिलांची मदत होऊ शकेल. तसेच यंत्रणेशी संबंधित कामासाठी महिलांची मदत उपयुक्त ठरेल, असे राज्य सरकारचे अग्निशामक सल्लागार मिलिंद देशमुख यांनी संगितले.
 • महाराष्ट्र इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरणाला मान्यता :
आगामी पाच वर्षांत जागतिक पातळीवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स हब म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा निर्मिती करण्याचे सामर्थ्य असलेल्या महाराष्ट्र इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरणाला (दि.9) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
 तसेच या धोरणाच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीत राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 1200 कोटी डॉलर्सच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, एक लाख अतिरिक्त रोजगाराची निर्मिती अपेक्षित आहे.
 गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण करून इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचे उत्पादन करण्यास चालना देणे. राज्यातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स व अभियांत्रिकी क्षेत्रात नावीन्यपूर्ण बदल करण्यासह राज्यात संशोधन व विकास प्रणाली निर्माण करून या क्षेत्राचा शाश्वत विकास करणे.
 इलेक्‍ट्रॉनिक्‍स रचना प्रणाली व उत्पादक उद्योग या क्षेत्राशी संबंधित कौशल्यवृद्धी व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणे.
 इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादक उद्योग घटक स्थापन करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करणे आदींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
 • 11 मार्च रोजी महाजेल भरो आंदोलन :
गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर राज्य सरकारने चालढकल धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे कामगार वर्गात सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे.याविरुद्ध गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने 11 मार्च रोजी महाजेल भरो आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महाजेल भरो आंदोलना’साठी कामगार संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत गिरणगावात सर्वत्र सभा पार पडत आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत या सभा शहर-उपनगरातील विविध ठिकाणी होणार आहेत.
 • भारत प्रथम क्रमांकावर :
भारतीय खेळाडूंनी जलतरण, तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, भारोत्तोलन, सायकलिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदकांची लयलूट करून 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी आपला दबदबा कायम राखला.
 भारत (दि.9) पर्यंत एकूण 76 सुवर्ण, 36 रौप्य व 10 कांस्य (एकूण 122) जिंकून प्रथम क्रमांकावर आहे.
 श्रीलंका संघ 17 सुवर्ण, 36 रौप्य व 31 कांस्य पदके (एकूण 84) जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 मैदानी स्पर्धेत (दि.9) भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्रद्धा घुलेला लांब उडीत तृतीय तर 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत स्वाती गाढवेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
 • देशभरात एकच वैद्यकीय सीईटी :
देशभर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सरकारी आणि खासगी महाविद्यालयांत एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे.
 लवकरच या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार आहे.
 तसेच यासाठी 1956 च्या इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे.
 देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
 • भारतीय युवा क्रिकेट संघ अंतिम फेरीत :
विश्‍वकरंडक युवक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, यामुळे भारतीय युवा संघही यंदा विश्वकरंडक उंचावण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
 श्रीलंकेच्या संघाला 170 धावांमध्ये तंबूत परत लावत सामना जिंकला. अनमोलप्रीत सिंग (72 धावा) आणि सर्फराज खान (59 धावा) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने श्रीलंकेपुढे विजयासाठी 268 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने या एकोणिस वर्षांखालील युवकांच्या स्पर्धेत आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही, तर श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर चांगलीच भरारी घेतली.
 • कोकण रेल्वे मार्गावर 11 नवीन स्थानकांचा समावेश :
कोकण रेल्वेवर कोलाड ते ठोकुर दरम्यान दुहेरीकरण करण्याबरोबरच या मार्गावर 11 नवीन स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर कोलाड ते ठोकुर या 741 किलोमीटरपर्र्यतचे टप्प्याटप्यात दुहेरीकरण केले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करताना प्रवाशांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार नव्या अकरा स्थानकांचा समावेशही करण्यात आला आहे. सध्या कोलाड ते ठोकुरपर्यंत 65 स्थानके असून आता ही संख्या 76 होणार आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनीही 11 नवीन स्थानकांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगितले.
 • पहिले ‘एव्हिएशन पार्क’ गुजरातमध्ये :
देशातील पहिले ‘एव्हिएशन पार्क’ गुजरातमध्ये साकारले जाणार आहे.
 राज्यातील हवाई उड्डयन क्षेत्र मजबूत करण्यासाठी गुजरात शासनाने हा निर्णय घेतला आहे.
 तसेच या पार्कमध्ये धावपट्टी, प्रशिक्षण केंद्र, हेलिपॅड, तसेच लघुनिर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात येतील.
 हवाई उड्डयन क्षेत्रातील क्षमतेबाबत विद्यार्थी, उद्योजक, धोरण निर्माते, तसेच व्यवसाय क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी या एकीकृत ‘पार्क’चे निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती ‘गुजसेल’च्या (गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लि.) अधिकाऱ्यांनी दिली.
 राज्य शासनाने या प्रकल्पाची जबाबदारी ‘गुजसेल’कडे दिली आहे.
 तसेच हे ‘पार्क’ तयार करण्यासाठी ‘गुजसेल’ने बागडोरा येथील 60 हेक्टर जमीन निर्धारित केली आहे.
 जगात अशा प्रकारचे केवळ 3 ते 4 ‘एव्हिएशन पार्क’ आहेत.
 • 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आघाडीवर :
भारताने 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही सुवर्णांची लयलूट सुरूच आहे.
 तसेच त्यात नेमबाज, वुशू, तसेच ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड प्रकाराचे मोलाचे योगदान राहिले.
 भारताने 117 सुवर्ण, 61 रौप्य आणि 16 कांस्यांसह आतापर्यंत 194 पदकांची कमाई केली आहे.
 पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या लंकेने 24 सुवर्ण, 46 रौप्य आणि 63 कांस्यपदकांसह 133 पदके जिंकली.
 अ‍ॅथलेटिक्सनी (दि.10) भारताच्या झोळीत आणखी सात सुवर्णांची भर घातली.
 पुरुष भालाफेकीत नीरज चोपडा, 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत आरोक्या राजीव, हातोडा फेकीत अर्जुन, 110 मीटर अडथळा शर्यतीत जे. सुरेंदर, महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत गायत्री, पुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्मा यांनी सुवर्णमय कामगिरी केली.
 तसेच त्याआधी जलतरणात भारताने अखेरच्या दिवशी पाच सुवर्णपदके जिंकली.
 वुशू स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदके पटकविली.
 • चीनच्या वैज्ञानिकांनी निर्माण केला तेजस्वी कृत्रिम तारा :
सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी (दि.8) साध्य केली.
 ‘इस्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आण्विक सम्मीलन तंत्राने (न्युक्लियर फ्जुजन) प्रायोगिक अणुभट्टीत 49.999 दशलक्ष सेल्सियस एवढ्या प्रचंड उष्णतेचे वस्तुमान तयार करण्यात यश मिळवले.
 सूर्यासारख्या ताऱ्यांच्या गर्भात अशीच आण्विक प्रक्रिया निरंतर होऊन उष्णतारूपी ऊर्जा उत्सर्जित होत असते.
 थोडक्यात, चिनी वैज्ञानिकांनी आपल्या सूर्याहून तिप्पट तेजस्वी असा कृत्रिम तारा प्रयोगशाळेत तयार केला.
 ऊर्जेचा हा स्रोत भूगर्भातील उष्णतेहून 8,600 पट अधिक तप्त होता.
 हा कृत्रिम तारा अस्थायी होता व अवघ्या 102 सेकंदांनंतर तो ‘विझून’ गेला.
 दुष्परिणाम न होणारा शाश्वत ऊर्जास्रोत म्हणून ‘न्युक्लिअर फ्जुजन’चे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरु आहेत.
 • प्राथमिक फेरीत बर्नी सॅंडर्स यांचा विजय :
अब्जाधीश डोनाल्ड ट्रंप यांनी न्यू हॅम्पशायरमध्ये अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीसाठी झालेली प्राथमिक फेरी जिंकली.
 डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने या प्राथमिक फेरीत बर्नी सॅंडर्स यांनी विजय मिळविला, तर हिलरी क्‍लिंटन यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 अयोवाच्या कॉकसमधील पराभवामुळे ट्रंप आणि सॅंडर्स या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
 अयोवामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने टेड क्रूज आणि डेमोक्रॅटिकच्या वतीने हिलरी यांनी विजय मिळविला होता.
 न्यू हॅम्पशायरमध्ये ट्रंप यांना 34 टक्के मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी; तसेच ओहियोचे गव्हर्नर जॉन केसिक हे 16 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले.
 • स्मार्ट सिटी प्रकल्पात होणार अमेरिकेचा समावेश :
भारतातील सर्व प्रस्तावित शंभर स्मार्ट सिटी प्रकल्पात भागीदार होण्याची अमेरिकेची इच्छा आहे.
 भारत सरकारने अलीकडेच पहिल्या टप्प्यात स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या दहा शहरांची यादी जारी केली आहे.
 स्मार्ट शहरांसाठी ठोस उपाय उपलब्ध करण्यात अमेरिका मौलिक भागीदार होऊ शकतो, असे अमेरिकेचे वाणिज्य उपमंत्री ब्रूस अ‍ॅण्ड्र्यू यांनी सांगितले.
 सध्या ते पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत, त्यांच्या सोबत अमेरिकेतील 18 कंपन्यांचे एक शिष्टमंडळही आहे, हे शिष्टमंडळ धोरणकर्ते आणि भारतीय कंपन्याच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.
 तसेच भारताच्या दृष्टीने उपयुक्त अशा महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरणही करणार आहे.
 टिकाऊ अर्थव्यवस्थेच्या विकासात भारताच्या मदतीच्या दृष्टीने अमेरिका उपयुक्त भागीदार होऊ शकते.
 भारतातील स्मार्ट शहर प्रकल्पात व्यवसायासाठी अमेरिकी कंपन्यांना खूप वाव आहे, असेही अ‍ॅण्ड्र्यू यांनी सांगितले.
 • केरळमधील के. जे. जोसेफ यांनी जागतिक विक्रम नोंदविला :
केरळमधील मुन्नार येथे के. जे. जोसेफ यांनी एका मिनिटांत 82 पुश अप्स मारून जागतिक विक्रम नोंदविला आहे.
 जोसेफ यांनी 82 पुश अप्स मारुन यापूर्वी अमेरिकेच्या रॉन कपूर यांच्या नावावर असलेल्या 79 पुश अप्सचा विक्रम मोडीत काढला.
 तसेच या विक्रमाची नोंद गिनिझ बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.
 जोसेफ यांनी प्रत्येक सेकंदाला सरासरी 1.35 पुश अप्स मारत हा विक्रम केला.
 जोसेफ यांनी यापूर्वी एका तासात 2092 पुश अप्स मारुन युनिव्हर्सल रेकॉर्डमध्ये नाव नोंदविलेले आहे.
 • अक्षरोत्सवात मराठी साहित्यिक-विचारवंतांचा लक्षणीय सहभाग :
साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य सन्मानांच्या निमित्ताने येत्या 15 ते 20 फेब्रुवारी या काळात होणाऱ्या अक्षरोत्सवात (फेस्टिव्हल ऑफ लेटर्स) यावर्षी मराठी साहित्यिक विचारवंतांचा लक्षणीय सहभाग राहणार आहे.
 न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी हे 17 फेब्रुवारीच्या प्रतिष्ठित संवत्सर व्याख्यानाचे यंदाचे वक्ते आहेत.
 'लेटस लूक ऍट अवरसेल्फ विथ अवर स्पेक्‍टॅकल्स रिमूव्हड' (चला, पुन्हा स्वतःकडे पाहूयात...चष्मे काढून) हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
 अकादमीने यंदा 'गांधी, आंबेडकर, नेहरू-सातत्य व धरसोडपणा' या विषयावर विशेष राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला आहे.अकादमीचा साहित्य सन्मान वितरण कार्यक्रम 16 फेब्रुवारीला (मंगळवारी) सायंकाळी साडेपाच वाजता मंडी हाउस भागातील पिक्की सभागृहात होणार आहे.
 यंदा सर्वश्री अरुण खोपकर (मराठी ) व उदय भेंब्रे (कोकणी) यांच्यासह 23 भाषांतील साहित्यिकांना अकादमीचे अध्यक्ष विश्‍वनाथ प्रसाद तिवारी यांच्या हस्ते व विख्यात साहित्यिक गोपीचंद नारंग तसेच अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांच्या मुख्य उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल.
 • मराठवाडा, विदर्भातील 48 प्रकल्पांची चौकशी :
राज्यभरातील प्रकल्पांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत, अखेर राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 तसेच त्यासंबंधीचे आदेश देताना या चारसदस्यीय समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
 मराठवाड्यातील 10, तर विदर्भातील 38 अशा एकूण 48 सिंचन प्रकल्पांची चौकशी होणार आहे.
 उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी 2014 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने डिसेंबर 2015 मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार शासनाने ही समिती स्थापन केली आहे.
 न्यायालयाच्या निर्देशास अनुसरून किकवी लघुप्रकल्प व कांचनपूर बृहत्‌ लघुप्रकल्पाच्या निविदा निश्‍चितीमध्ये काही अनियमितता झाली आहे का, याबाबत प्राथमिक चौकशी करून अहवाल अहवाल सादर करण्यासाठी तसेच बांधकामाधीन प्रकल्पाच्या पुनर्विलोकनासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
 • वर्षातून दोनदा मतदार नोंदणी :
युवा मतदारांना 18 वर्षांचे वय पूर्ण होताच वर्षातून दोनदा मतदारनोंदणीची संधी मिळणार आहे.
 कायदा मंत्रालयाने त्यासाठी विधेयकाचा मसुदा तयार केला आहे.
 सध्या निवडणूक होत असलेल्या विशिष्ट वर्षाच्या 1 जानेवारीला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाच मतदार नोंदणी करता येते.
 तसेच यापुढे 1 जुलै रोजी वयाची पूर्तता करणाऱ्यांनाही संधी दिली जाईल.
 निवडणूक आयोगाने ठेवलेल्या या प्रस्तावाला सरकारनेही सहमती दर्शविली आहे.
 1 जानेवारी रोजी मतदारयाद्यांची पुनर्रचना केली जात असल्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 च्या कलम 14 (ब) नुसार हीच तारीख योग्य मानण्यात आली होती.
 • भारतात ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रम बंद होणार :
प्रमुख सोशल नेटवर्क कंपनी फेसबुकने भारतातील आपला वादग्रस्त ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 ट्रायने सेवा देणाऱ्या कंपन्यांना कन्टेन्टस्वर आधारित इंटरनेटसाठी वेगवेगळे दर आकारण्यास मनाई केल्यानंतर फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
 फेसबुकच्या या निर्णयामुळे भारतात नेट न्यूट्रॅलिटीला प्रोत्साहन मिळणार आहे.
 दूरसंचार ऑपरेटर्सच्या भागीदारीने लोकांना बेसिक इंटरनेट सेवा पुरविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या ‘फ्री बेसिक्स’ कार्यक्रमामुळे फेसबुकवर चौफेर टीका केली जात होती.
 ‘फ्री बेसिक्स’मुळे काही निवडक वेबसाईटस्च बघण्याची अनुमती देण्यात आली होती.
 इंटरनेट सर्वांसाठी खुले असावे, असा युक्तिवाद करण्यात आला होता.
 • चीनमध्ये शुद्ध हवेची विक्री :
पराकोटीच्या प्रदूषणामुळे बीजिंगसह अनेक मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना मोकळ्या हवेत श्वास घेणेही दुरापास्त झालेल्या चीनमध्ये सातासमुद्रापलिकडची बाटलीबंद शुद्ध हवा विकण्याचा धंदा सध्या तेजीत आला आहे.
 चिनी नववर्षाच्या दीर्घकालीन सुट्या आणि त्यानिमित्त होणाऱ्या बाजारहाटाचे औचित्य साधून अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर फिरून अशी डबाबंद किंवा बाटलीबंद हवा विकणारे विक्रेते दिसत आहेत.
 इंग्लंड व कॅनडा यासारख्या देशांमधील शुद्ध हवा भरलेली एक बाटली येथे चक्क 115 ते 500 डॉलरना म्हणजे एक हजार ते 33 हजार रुपयांना विकली जात आहे.
 • लान्सनायक हनुमंतप्पांचे निधन :
सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे 45 तापमानात बर्फाखाली गाडले गेलेले लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांची गत दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर (दि.11) संपली, सकाळी 11.45 वाजता या लढवय्या जवानाने अखेरचा श्वास घेतला.
 3 फेबु्रवारीला 19,600 फूट उंचीवरील सियाचीनमध्ये हिमकडे कोसळल्यामुळे ‘19 मद्रास बटालियन’चे 10 जवान बर्फाखाली गाडले गेले होते.
 सियाचीनच्या बर्फाच्छादीत भागात बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेदरम्यान (दि.8) रात्री उशिरा हनुमंतअप्पा यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते.
 तसेच त्यानंतर लगेच त्यांना खास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
 कर्नाटकच्या धारवाडच्या बेटादूर गावात राहणारे हनुमंतअप्पा 13 वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते.
 लष्करातील आपल्या एकूण 13 वर्षांच्या सेवेपैकी सलग 10 वर्षे त्यांनी अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात कर्तव्य बजावले.
 जोखमीच्या मोहिमांसाठी सतत सज्ज असलेला आणि उच्च ध्येयाने भारावलेला जवान अशी हनुमंतअप्पांची ओळख होती.
 • जगातील सर्वांत अचूक घड्याळ :
जर्मनीमधील तज्ज्ञांनी जगातील आतापर्यंतचे सर्वांत अचूक घड्याळ तयार केले आहे.
 आतापर्यंत केवळ संकल्पनेतच असलेली अचूक वेळ या संशोधकांनी तयार केलेल्या नव्या अणुघड्याळाने (ऍटॉमिक क्‍लॉक) प्रत्यक्ष साधली आहे.
 जर्मनी येथील 'पीटीबी' या संस्थेतील भौतिकशास्त्रज्ञांनी या 'ऑप्टिकल सिंगल आयन' घड्याळाची निर्मिती केली आहे.
 हाय फ्रिक्वेन्सी ट्रॅपमध्ये भारित कणांच्या मदतीने असे अचूक घड्याळ तयार करता येईल, ही कल्पना 1981 मध्ये हान्स डेमेल्ट या संशोधकाने मांडली होती.
 तसेच या संशोधकाला नंतर नोबेल पारितोषिकही मिळाले.
 'पीटीबी'च्या संशोधकांनी एका भारित कणाचा वापर करून हे घड्याळ तयार करण्यात यश मिळविले आहे.
 • भव्य 'टायटॅनिक' पुन्हा समुद्रावर स्वार होणार :
जगभरात औत्सुक्‍याचा विषय ठरलेले मूळचे ‘टायटॅनिक‘ जहाज 106 वर्षांपूर्वीच बुडाले.
 तसे त्याची कथा मांडणारा ‘टायटॅनिक‘ या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर विक्रम रचले.
 मूळ जहाज बुडाले असले तरी त्याची प्रतिकृती दोन वर्षांत तयार होणार आहे.
 ‘टायटॅनिक‘ या अभूतपूर्व जहाजाची प्रतिकृती रॉयल मरीन सर्व्हिसेस ‘टायटॅनिक-2‘ या नावाने 2018 मध्ये प्रत्यक्षात येणार असून, हे जहाज सेवेतही दाखल करण्यात येणार आहे.
 ‘टायटॅनिक‘ उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले तेव्हा दीड हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.
 ‘टायटॅनिक‘च्या सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेऊन दोन वर्षांत हे परिपूर्ण जहाज बनविण्यात येणार आहे.
 मूळच्या जहाजापेक्षा ही प्रतिकृती चार मीटरने अधिक रुंद करण्यात येणार आहे.
 ‘टायटॅनिक-2‘ या जहाजाची कल्पना ऑस्ट्रेलियन उद्योजक क्‍लाईव्ह पामर यांच्या ब्लू स्टार कंपनीने मांडली आहे.
 • खासगी भूसंपादनावर टीडीआर दुप्पट :
शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या खासगी भूसंपादनावर टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
 भूसंपादन कायद्यात जमिनीचा मोबदला बाजार दरापेक्षा दुपटीने मिळू लागल्यानंतर टीडीआर घ्यायला कोणी समोर येत नसल्याचा अनुभव आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 तसेच या निर्णयामुळे गृहबांधणी क्षेत्राला चालना मिळणार आहे.
 राज्य शासन वा स्थानिक स्वराज्य संस्था वा प्राधिकरणाला सार्वजनिक उपयोगाची इमारत जसे शाळा, आरोग्य केंद्र, वाचनालय आदी एखाद्याने बांधून दिले तर त्याला त्या मोबदल्यात टीडीआर देण्याची तरतूदही नवीन धोरणात करण्यात आली आहे.
 टीडीआर म्हणजे 
 तुमची जमीन संपादित केल्यानंतर त्याचा पैशांच्या स्वरूपात मोबदला न देता चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास त्याला ‘विकास हक्क हस्तांतरण’ (टीडीआर) असे म्हणतात.
 मिळालेला एफएसआय तुम्हाला त्याच शहरात अन्यत्र वापरून जादाचे बांधकाम नियमानुसार करता येते. अतिरिक्त टीडीआर मिळाल्याने बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल, घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता असते.
 • गुरुत्वीय लहरींचा शोध लागला :
आईनस्टाईन यांचे भाकित खरे ठरले, 100 वर्षानंतर मिळाला थेट पुरावा.
 शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी 100 वर्षांपूर्वी भाकीत केलेल्या अवकाशकालातील (स्पेसटाईम) रचनेमधील गुरुत्वीय लहरी (गॅ्रव्हिटेशनल वेव्हज्) शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहेत.
 याची घोषणा (दि.11) होताच खगोलशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये अत्यानंद व्यक्त झाला.
 विश्वामध्ये प्रचंड टक्कर होऊन निर्माण झालेल्या या गुरुत्वीय लहरींनी खगोलशास्त्रज्ञांमध्ये एकदम उत्साह निर्माण केला.
 तसेच या लहरींमुळे अंतराळाकडे बघण्यासाठी नवी दारे उघडी होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा