Post views: counter

How To Read NCERT Books For Civil Servicess?

                         
ncert-books-base-for-upsc-examination


यूपीएससी अभ्यासाच्या आराखडय़ातील सर्वात महत्त्वाचा घटक किंवा साधन म्हणजे 'एनसीईआरटी'ची क्रमिक पुस्तके होत.
                         पदवीचे शेवटचे वर्ष संपल्यानंतर विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्षात अभ्यासाच्या तयारीचा संकल्प करतात, त्या वेळी अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, कोणती पुस्तके वाचावीत, असे अनेक प्रश्न समोर येतात. अशा परिस्थितीत सुरुवातीची दिशा महत्त्वाची असते. प्रारंभिक दिशाच चुकली तर पुढील प्रयत्न भरकटण्याची शक्यता अधिक असते. खरेतर या टप्प्यावर मार्गदर्शकाची निवड महत्त्वाची ठरते, जो आपल्याला एक आराखडा आणि मार्ग ठरवून देऊ शकतो. अशा निर्णायक प्रसंगी योग्य सुरुवात करण्यासाठी थोडा अधिक वेळ घेतला तरी चालू शकतो.

                        मागील लेखावरून आपल्याला असे जाणवेल की, नागरी सेवा परीक्षेतील महत्त्वाचा आणि मधला टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा होय. मुख्य परीक्षेत भाषा विषयाचे पेपर वगळता उरलेले जे पेपर आहेत, त्यांना गुणांचे स्थान असल्याने त्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता असते. त्यातील निबंधाचा पेपर, सामान्य अध्ययनाचे चार पेपर तसेच वैकल्पिक विषयाचे दोन पेपर आपल्या तयारीच्या केंद्रस्थानी ठेवावे लागतात. सामान्यत: एकाअर्थी निबंध आणि वैकल्पिक विषयाच्या पेपरचे भवितव्य हे सामान्य अध्ययनातील विषयावर अवलंबून असते, याचे भान सुरुवातीलाच ठेवणे आवश्यक असते.
                        त्यातून एक बाब स्पष्ट होते की, अभ्यासाची सुरुवात ही अनिवार्य विषय असलेल्या सामान्य अध्ययनापासूनच करायला हवी. मग त्या सामान्य अध्ययनाचा अभ्यासक्रम काय आहे, त्यात किती विषय किंवा अभ्यास घटक येतात, त्याची व्याप्ती किती आहे या बाबी आपण पाहायला लागतो. सामान्य अध्ययनाचा आवाका लक्षात आल्यानंतर त्याचा पाया कसा रचायचा आणि त्यासाठी कोणती साधने वापरावयाची याचा विचार आपण करू लागतो. या आराखडय़ातील सर्वात महत्त्वाचा घटक किंवा साधन म्हणजे 'एनसीईआरटी'ची क्रमिक पुस्तके होत. त्यांचे वाचन ही या परीक्षेच्या अभ्यासाची खरी सुरुवात आहे; किंबहुना नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासाची पूर्वअट म्हणूनही या क्रमिक पुस्तकांच्या वाचनाकडे पाहायला हवे.

  • 'एनसीईआरटी'ची पुस्तके का वाचावीत?
असे कोणते वेगळेपण या क्रमिक पुस्तकांमध्ये असते की ज्यांचे वाचन करण्याची आवश्यकता प्रत्येक जण व्यक्त करीत असतो! या प्रश्नवजा कुतूहलाचे उत्तर आपण जेव्हा शोधायला लागतो, त्या वेळी या क्रमिक पुस्तकांची गुणवत्ताप्रधान वैशिष्टय़े आपल्याला समजून येतात. वास्तविक पाहता 'राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान प्रशिक्षण परिषद' म्हणजे 'एनसीईआरटी'द्वारा केंद्रीय विद्यालयीन परीक्षा विभागासाठी या क्रमिक पुस्तकांची निर्मिती केली जाते. 'एनसीईआरटी' ही संस्था देशभरातील नामवंत विद्यापीठातील तसेच शैक्षणिक संशोधन संस्थांमधील काम करणाऱ्या त्या त्या विषयाच्या अधिकारयुक्त प्राध्यापकांना आणि संशोधकांना निमंत्रित करून त्यांच्याकडे या क्रमिक पुस्तकांच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी सोपवत असते. ही क्रमिक पुस्तके विषयतज्ज्ञ आणि विषयाचा दीर्घकालीन अनुभव असलेल्या अभ्यासकांनी लिहिलेली असल्याने त्यातील प्रकरणे, त्यातील संकल्पना, स्पष्टीकरणे, त्यासाठी वापरली गेलेली नित्य व्यवहारातील उदाहरणे - दाखले, अद्ययावतता यामुळे संबंधित विषयाचे मूलभूत आकलन विकसित होण्यात अत्यंत उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांना ती एका बाजूला विचारप्रवृत्त करतात आणि दुसऱ्या बाजूला विषयात त्याची गोडी निर्माण करतात. त्याप्रमाणे या पुस्तकांमधील इंग्रजी भाषा खूप रसाळ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपोआपच या पुस्तकांच्या वाचनाची गोडी निर्माण होते. अशा परिस्थितीत या क्रमिक पुस्तकांचा दर्जा काय असेल, हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही.
                               'एनसीईआरटी'च्या पुस्तकांमधून संकल्पनात्मक स्पष्टता येते आणि मग संकल्पना विस्तारही करणे जमू लागते. जोडीला या पुस्तकांतील सर्व प्रकरणांमध्ये व्यापक दृष्टिकोनही पसरलेला असतो. तद्वतच या पुस्तकांमधून तुम्हाला विषयाच्या गाभ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अभ्यासघटकांच्या कक्षा रुंदावलेल्या असतात. त्याद्वारे त्यातील अभ्यासघटकांची व्याप्तीही आपल्या लक्षात येते.
नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासप्रक्रियेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात विषयाची ओळख घडवून आणण्यात, अभ्यासक्रमाचे आकलन करून देण्यात ही पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याच बरोबरीने पुढच्या टप्प्यातील संदर्भग्रंथांचे वाचन सोपे जावे, त्यातील आशय नीट लक्षात यावा या हेतूसाठी या पुस्तकांचे वाचन अनिवार्य ठरते. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेतील आजपर्यंत विचारले गेलेले प्रश्न आपल्याला नीट समजून यावेत यासाठीही ही पुस्तके अनिवार्य आहेत. विषयाची तोंडओळख पुरेशी झाली नसेल तर पुढच्या टप्प्यातील प्रश्नांचे आकलन आणि प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण करणे ही प्रक्रिया अवघड होऊन बसते. वर्तमानपत्रातील समकालीन विषय समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली त्या-त्या विषयाच्या संकल्पनात्मक स्पष्टीकरणाची गरज ही क्रमिक पुस्तके पूर्ण करतात. शेवटी याचा फायदा आपोआप पूर्वपरीक्षेलाही होतो. कारण त्या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्नांचा पाया (बेस) हीच पुस्तके असतात. थोडक्यात, या पुस्तकांचा असलेला फायदा व्यापक दृष्टीने लक्षात घेता यांची उजळणी ही तेवढीच महत्त्वाची ठरते. याचाच अर्थ या पुस्तकांच्या पायाभूत अभ्यासावरच पुढील अभ्यासाचा डोलारा उभा केला पाहिजे.
अर्थात काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला ही पुस्तके वाचताना इंग्रजी शब्दांचा अडथळा येतो, त्या वेळी अपरिचित शब्द स्वतंत्र वहीत टिपून ठेवावेत. अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या वाचनातच संपूर्ण पुस्तक समजले पाहिजे, असा आग्रह धरणे योग्य नाही. दुसऱ्या वाचनात ही समस्या दूर होऊ शकते.
                               मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनातील पहिल्या पेपरमधील इतिहास या घटकासाठी 'द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन- भाग दुसरा' तसेच बिपीन चंद्र लिखित 'मॉडर्न इंडिया' या जुन्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. भारतीय समाज या घटकासाठी इयत्ता बारावीच्या 'अंडरस्टँिडग इंडियन सोसायटी' आणि 'सोशल चेंज इन इंडिया' तसेच भौगोलिक घटकाकरिता सातवी ते बारावी व पेपर-२ मधील राजकीय घटकासाठी नववी ते बारावीची पुस्तके वाचावीत. तसेच पेपर-३ मधील आíथक घटकासाठी अकरावी व बारावीची पुस्तके आणि विज्ञान-तंत्रज्ञान घटकांकरिता सहावी ते दहावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे किमान दोन वेळा वाचन करावे लागते.
मागील लेखांमध्ये म्हटल्याप्रमाणे नागरी सेवा परीक्षेचा एकच एक आकृतिबंध सर्वाना सारखा लागू होत नाही, याची कायम जाणीव ठेवणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. अभ्यासातील अनुकरण आपले वेगळेपण सिद्ध न करता आपल्याला गर्दीत विरघळून टाकत असते, याचे भान प्रत्येकाने ठेवलेले केव्हाही श्रेयस्कर!

Source : Loksatta.com

1 टिप्पणी: