Post views: counter

CSAT : उता-याचे आकलन आणि त्यावरील प्रश्न

मागील लेखात आपण यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील सीसॅटच्या पेपरचे बदललेले स्वरूप व त्याचे परिणाम लक्षात घेतले. या आणि पुढील काही लेखांमधून आपण सीसॅटच्या संदर्भातील विविध विषयांच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील सीसॅटच्या घटकामध्ये उताऱ्यावर आधारित प्रश्नांची संख्या बरीच मोठी आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांतील विविध घडामोडींमुळे उताऱ्यांची व त्यावरील प्रश्नांची संख्या सुरुवातीच्या वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. एकूण ८० प्रश्न असणाऱ्या या परीक्षेत साधारणत: ३ प्रश्न हे उताऱ्याच्या आकलनावर आधारित असतात. बदललेल्या स्वरूपानुसार, उतारे व उताऱ्यावर आधारित प्रश्न इंग्रजी आणि िहदी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत. केवळ इंग्रजी भाषेतील उताऱ्यांवर आधारित प्रश्नांचा घटक नवीन संरचनेतून बाद केला गेला आहे.

                            ३० प्रश्नांसाठी साधारणत: सहा ते नऊ उतारे विचारले जाऊ शकतात. उताऱ्यांची संख्या जितकी जास्त, तितके प्रत्येक उताऱ्यावर आधारित प्रश्न कमी. म्हणूनच उताऱ्यांची संख्या वाढल्यास थोडेच प्रश्न सोडविण्यासाठी बराच मजकूर वाचावा लागतो. याउलट उताऱ्यांची संख्या कमी ठेवून प्रत्येक उताऱ्यावर जास्त प्रश्न विचारले गेल्यास अशा उताऱ्यांवरील अवलंबित्व वाढते. दोन्हींपकी कोणत्याही परिस्थितीत उताऱ्याची भाषा व मजकूर समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मागील चार वर्षांतील सीसॅटच्या पेपरमधील उताऱ्यांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, उताऱ्यांचे विषय हे ठरावीकच असतात. बहुतेक उताऱ्यांचे विषय हे नागरी सेवांशी निगडित असतात. यामध्ये अर्थशास्त्र, लोकशाही, घटना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हवामानशास्त्र, पर्यावरण, सामाजिक प्रश्न अशा विषयांचा अंतर्भाव होतो. तसेच अनेक वेळा असे दिसून आले आहे की, ठरावीक लेखकांनी लिहिलेले लिखाण उताऱ्यांच्या स्वरूपात हमखास विचारले जाते. यामध्ये पंडित नेहरू, अमर्त्य सेन, महात्मा गांधी यांच्या लिखाणाबरोबरच देशाच्या आíथक पाहणीतून घेतलेले लिखाण उताऱ्यांच्या स्वरूपात वाचायला मिळते. याचबरोबर मनोरंजन मोहंती, कृष्णकुमार, माधव मेहरा, स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या लिखाणाचादेखील उताऱ्यांच्या स्वरूपात समावेश असतो. जागतिक बँकेच्या विविध अहवालांमधूनही उताऱ्यांचा मजकूर घेतलेला पाहायला मिळतो.
  • उताऱ्याविषयी..
                           उताऱ्याचे आकलन व त्यावर आधारित प्रश्न या घटकाचा विचार करत असताना दोन उपघटकांचा निश्चितच विचार करावा लागतो. एक म्हणजे उतारा व दुसरे म्हणजे प्रश्न. उतारे हे सामान्यत: दोन प्रकारचे असू शकतात. काही उताऱ्यांमधील मजकूर किंवा विषय तुलनेने सोपा असतो, मात्र वापरलेली भाषा अवघड असू शकते. अशा उताऱ्यांचा मुख्य हेतू उमेदवाराचे भाषा कौशल्य व त्या अनुषंगाने आकलन तपासणे असा असतो, याउलट काही उताऱ्यांचा मजकूर हा तुलनेने सोप्या भाषेत मांडलेला असतो, मात्र उताऱ्याचा विषय हा कमालीचा क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा असतो. अशा वेळेस प्रश्नदेखील उताऱ्यास अनुसरून असतात. भाषेच्या ज्ञानावर आधारित प्रश्नांचा रोख नसून, किचकट/ गुंतागुंतीच्या लिखाणातून उमेदवाराला योग्य उत्तर शोधता येते का, हे तपासून पाहण्याकडे प्रश्नांचा कल असतो. या बाबी लक्षात ठेवल्यास उतारा वाचत असताना त्यातील मजकूर आणि भाषा याकडे बारकाईने पाहता येणे शक्य होते तसेच आपण वाचत असलेल्या लिखाणावर, भाषिक आकलनावर आधारित प्रश्न असणार आहेत की मजकुराच्या क्लिष्टतेवर याचाही अंदाज लावणे शक्य होते.
  •  प्रश्नांविषयी..
                           उताऱ्यावर आधारित प्रश्नांचा विचार आणि निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, प्रश्न अनेक प्रकारचे असतात. उदा. अनुमान काढणे, लेखकाचा दृष्टिकोन ओळखणे, शीर्षक देणे, मध्यवर्ती संकल्पना ओळखणे, ठरावीक मुद्दय़ांबद्दल लेखकाची सहमती/ असहमती दर्शवणे इ. उताऱ्यावर येणारे प्रश्न दोन प्रकारचे असतात -
(अ) सर्वसमावेशक स्वरूपाचे प्रश्न (Generic Questions)
यामध्ये उतारा संपूर्ण वाचल्यानंतर व त्याचा एक परिपूर्ण लिखित नमुना अशा संदर्भात विचार केल्यानंतर सोडवता येणारे प्रश्न! हे प्रश्न अशा प्रकारचे असतात-
  1. उतारा लिहिण्यामागचा लेखकाचा मूळ हेतू कोणता?
  2. उताऱ्याचे योग्य शीर्षक कोणते असावे?
  3. उताऱ्यातील मध्यवर्ती संकल्पना कोणती?
  4. हा उतारा कोणत्या विषयाच्या मोठय़ा लिखाणाचा भाग होऊ शकतो?
वरील प्रश्न सोडविण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे, उताऱ्याकडे एक स्वतंत्र लिखाणाचा नमुना म्हणून पाहणे आवश्यक ठरते. उताऱ्यामधील काही भाग (एकदा किंवा पुन:पुन्हा) वाचून हे प्रश्न सोडवता येत नाहीत. मात्र, असे प्रश्न संपूर्ण उतारा एकदा वाचल्यानंतर सोडवता येतात. कारण या प्रश्नांची उत्तरे, वाचणाऱ्याच्या उताऱ्याविषयीच्या एकंदरीत आकलनात दडलेली असतात. उतारा संपूर्ण वाचल्यानंतर वाचकाच्या आकलनावरून आणि उताऱ्याविषयी तयार झालेल्या मतांमधून हे प्रश्न सोडवता येतात. अशाप्रकारचे भरपूर प्रश्न व उताऱ्यांचा सराव करणे आवश्यक आहे.
  • ठरावीक माहितीवर आधारित प्रश्न  (Specific Questions)
                      हे प्रश्न सोडविण्याकरता उताऱ्यामधील काही भागांमधील माहिती पुरेशी ठरते. हे प्रश्न उताऱ्यामध्ये दिलेल्या एखाद्या विशिष्ट घटनेच्या अथवा एखाद्या ठरावीक मुद्दय़ाशी संबंधित असतात. जसे की,
  1. ही चळवळ किती वष्रे अस्तित्वात होती?
  2. केंद्र सरकारच्या या योजनेनुसार खालीलपकी कोणते घटक सवलतीस पात्र आहेत?
  3. उताऱ्यात उपस्थित असणारे खालीलपकी कोणते मुद्दे सील माशांच्या ऱ्हासासाठी कारणीभूत आहेत?
  4. खालीलपकी कोणत्या कारणांमुळे क्षयरोगाची बाधा होऊ शकते?
                        सर्वसमावेशक स्वरूपाच्या आणि ठरावीक माहितीवर आधारित असणाऱ्या प्रश्नांमधील मूलभूत फरक समजून घेणे, त्या प्रश्नांसाठी योग्य उत्तराची निवड करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
आपण हे पाहिलेच आहे की, सर्वसमावेशक स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे एका वाचनात देता येऊ शकतात. ठरावीक माहितीवर आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मात्र उताऱ्याचा
पुन्हा एकदा आधार घ्यावा लागतो. तसेच उताऱ्यामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले असतात. आपल्याला उत्तर देण्यासाठी आवश्यक असलेली माहिती, उताऱ्यात नेमकी कुठे दिलेली आहे, हे समजण्याकरता उताऱ्याचे संपूर्ण वाचन गरजेचे ठरते.
                        उत्तम शब्दसंग्रह असणे हे या प्रश्न प्रकारासाठी खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर वाचनाचा वेगही चांगला असायला हवा. वाचनाचा वेग आणि वाचनाशी निगडित सवयी या गोष्टी सुधारता येतात. त्यासाठी काही नियोजनबद्ध तयारी करण्याची व कष्ट घेण्याची गरज आहे. जर उताऱ्यावरील प्रश्न हा संपूर्ण CSAT च्या पेपरमधील एक मुख्य घटक असेल, म्हणजे जवळपास ३० प्रश्न हे जर का उताऱ्यांवर आधारित असतील तर त्या अनुषंगाने दिलेल्या १२० मिनिटांमध्ये खूप सारा मजकूर वाचावा लागणार हे ओघाने आलेच. त्यामुळे वाचनाचा वेग उत्तम असणे आवश्यक असते. एकंदरीत सीसॅटमधील सर्वच घटकांसाठी भरपूर सराव हा
महत्त्वाचा मुद्दा आहे. उताऱ्याचे आकलन व त्यावरील प्रश्नांबाबतची प्राथमिक माहिती समजून घेऊन आगामी काळात दर्जेदार अभ्यास साहित्यातून भरपूर सराव करणे उमेदवारांसाठी अपरिहार्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा