Post views: counter

Current Affairs Sept 2015 Part - 3
 • फोर्ब्ज मासिकाच्या दानशूर व्यक्तींच्यायादीत सात भारतीय

फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतीलदानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे. उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन १३ देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिकदानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला ५२ लाख डॉलरची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.


 • भारतीय वंशाच्या मुलाने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली


भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकली.या स्पर्धेचे बक्षीस ५० हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही १० हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेल्या अनिरुद्धची स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, तो दररोज सरासरी दहा नवीन इंग्रजी शब्द आत्मसात करतो. इटलीच्या फ्लाव्हिया पेन्नेट्टाने आपल्याच देशाच्या रॉबर्टा व्हिंचीचा पराभव करून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. पेन्नेटाचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.


 • सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला टेनिस स्पर्धेतील विजेतेपद :


सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने कट्टर प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याच्यावर पुन्हा एकदा मात करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले. जोकोविचच्या टेनिस कारकिर्दीतील हे 10 वे आणि या वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम विजतेपद आहे. अग्रमानांकन असलेल्या जोकोविचने फेडररचा 6-4, 5-7, 6-4, 6-4 असा पराभव केला. जोकोविचने यंदा ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर त्याचे या वर्षातील हे तिसरे विजेतेपद आहे.
नोव्हाक जोकोविचची कारकीर्त :

काउंटडाऊन - फेडरर वि. जोकोविच

 1.  फेडडर आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत 42 सामने. जोकोविच 22, तर फेडरर 20 वेळा विजयी
 2.  ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील यापूर्वीच्या सामन्यात जोकोविच विजयी. विंबल्डनच्या अंतिम सामन्यात जोकोविचची सरशी
 3.  जोकोविचचे कारकिर्दीतील 10 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद
 4.  टूरवरील यापूर्वीच्या सामन्यात फेडररची सरशी. ऑगस्टमध्ये सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फेडररचा विजय
 5.  फेडररची पुरुष एकेरीत सर्वाधिक 17 विक्रमी विजेतीपदे
 6.  फेडररचे यापूर्वीचे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद 2012 मध्ये. तेव्हा तो विंबल्डनमध्ये विजेता
 7.  फेडरर अमेरिकन स्पर्धेत सलग पाच वेळा विजेता. 2004 ते 2008 मध्ये ही कामगिरी. 2009 मध्ये फेडररला उपविजेतेपद


 • मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा 130 फूट जाडीचा थर सापडला :


मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा 130 फूट जाडीचा थर सापडला असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हा थराचा तुकडा कॅलिफोर्निया व टेक्सास यांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढा आहे. लाखो वर्षांपूर्वी मंगळावर बर्फवृष्टी झाली होती त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर म्हणजेच एमआरओ या अवकाशयानावरील दोन उपकरणांनी हे संशोधन केले आहे.
 मंगळावर एक विवर भांडय़ासारखे गोलाकार नाही बाकीची सगळी विवरे भांडय़ासारखी खोलगट व गोलाकार आहेत. मंगळावरील अर्काडिया प्लॅनशिया भागात अशी विवरे आहेत, ती वेगवेगळ्या काळात तयार झालेली असून तेथे कशाचा तरी वर्षांव झाल्याच्या खुणा आहेत. एमआरओच्या जास्त विवर्तन असलेल्या प्रतिमा विज्ञान प्रयोगात (हायराइज) संशोधकांनी या विवराचे त्रिमिती प्रारूप तयार केले त्यामुळे त्यांना त्यांची खोली समजू शकली.

 • जर्मनीच्या महापौरपदी अशोक श्रीधरन यांची नियुक्ती :


जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविणारे भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांना बॉनच्या महापौरपदासाठी निवडणूकपूर्व मतदानोत्तर चाचणीमध्ये सर्वाधिक पसंती असल्याचे समोर येत आहे. मात्र अद्याप या तिघांपैकी कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे याबद्दलचा निर्णय जवळपास 26 टक्के म्हणजेच 2.45 लाख मतदारांनी घेतला नसल्याने खरा निकाल यानंतर लागणार आहे.


 • पत्रकारांसाठी फेसबुकचे मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध :


पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध करून दिले. अ‍ॅप व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांची माहिती दिली आहे. पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध करून दिले असून त्याच्या माध्यमातून पत्रकारांना त्यांच्या अनुसारकांशी संवाद साधता येईल. शिवाय त्यांचे लेखनही पोहोचवता येईल. पत्रकार या माध्यमातून जास्त माहिती वाचक व अनुसारकांपर्यंत पोहोचवू शकतील. या अ‍ॅपचे उत्पादन व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांनी सांगितले की, पत्रकारच नव्हे तर इतरांनाही ही सुविधा उपलब्ध राहील. फेसबुकने जुलै 2014 मध्ये मेन्शन्स अ‍ॅप सुरू केले होते पण ते वलयांकित म्हणजे सेलिब्रिटी व्यक्तींसाठी होते. जर फेसबुक वापरकर्त्यांने द रॉक असे स्टेटस अपडेट केले तर तो वापरकर्ता त्याची नवीन माहिती मेन्शन्स अ‍ॅपमध्ये टाकू शकेल व त्यावर प्रतिसादही मिळू शकेल.

मेन्शन्स अ‍ॅप :
तुमचे फेसबुक खाते असेल तर एक ऑनलाईन फॉर्म भरून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल त्यासाठी तुमचे फेसबुक खाते खरे असले पाहिजे लाइव्ह माहिती, छायाचित्रे, प्रश्नोत्तरे या सुविधा पत्रकारांसाठी माहिती देवाणघेवाणीचे एक साधन अर्थात यात कुणीही खोटी माहिती देणे दिशाभूल करणारे ठरू शकते. वृत्तपत्र व पत्रकाराला समाजाचा प्रतिसाद समजेल


 • दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय :

फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे. उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन 13 देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला 52 लाख डॉलरची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे. त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.


 • जे. मंजुळा यांची डीआरडीओच्या महासंचालकपदी नियुक्ती :


संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी 'इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर' या विभागाची सूत्रे स्वीकारली. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला. या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील 'डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर'मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला. हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात 26 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत. मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व 2011 मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे.


 • प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी यदु श्रीराम जोशी यांची निवड :

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी 'लोकमत'चे विशेष प्रतिनिधी यदु श्रीराम जोशी यांची सोमवारी बहुमताने निवड झाली. अधिस्वीकृती समितीच्या सर्व 27 सदस्यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदान केले. त्यामध्ये जोशी यांना 18 तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांना 9 मते मिळाली. निवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी आर.एन. गरुड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.


 • होरमुसजी एन.कामा यांची पीटीआय अध्यक्षपदी निवड :


'बॉम्बे समाचार'चे संचालक होरमुसजी एन. कामा यांची सोमवारी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (पीटीआय) अध्यक्ष आणि 'मल्याळम मनोरमा'चे संचालक रियाद मॅथ्यू यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जागरणप्रकाशनचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक महेंद्र मोहन गुप्ता हे आधिचे अध्यक्ष होते. कंपनीच्या 67 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कामा आणि मॅथ्यू यांनी निवड करण्यात आली. कामा हे भारतात 1855 पासून सतत प्रकाशित होत असलेल्या 'बॉम्बे समाचार' या सर्वांत जुन्या दैनिकाचे संचालक असून ते दोन वेळा इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष होते. सध्या ते रीडरशीप स्टडीज कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत.

 • राज्यातील पाच संस्थांचा राजभाषा पुरस्कार सन्मान :

                        केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राज्यातील पाच संस्थांचा राजभाषा पुरस्काराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला. गृहमंत्री राजनाथसिंह, राज्यमंत्री किरण रिज्जू व हरिभाई चौधरी आदी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त संस्थांमध्ये महाराष्ट्रातील कोकण रेल्वे महामंडळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट, राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, नगर राजभाषा कार्यान्वय समिती आणि माझगाव डॉक लिमिटेडचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे विज्ञान भवनात आयोजित हिंदी दिवस कार्यक्रमात केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग व संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते 2014-15च्या राजभाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातून कोकण रेल्वे महामंडळाला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंडळ, स्वायत्त संस्थांच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या राजभाषा विभागाचे सहायक व्यवस्थापक संतोष कुमार पाठक यांनी, तर दुसरा पुरस्कार मुंबईच्याच राष्ट्रीय आद्यौगिक अभियांत्रिकी संस्थेचे अध्यक्ष अशोक कुंडीर यांनी स्वीकारला. राजभाषा कार्यान्वय समिती श्रेणीत नाशिकच्या नगर राजभाषा कार्यन्वयन समितीला मिळालेला तृतीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष व महाव्यवस्थापक सुरेश प्रजापती यांनी स्वीकारला.


 • सुलभ व्यापार करण्यासाठी भारतात गुजरात पहिल्या क्रमांकावर :

सुलभ व्यापार करण्यासाठी भारतात गुजरात पहिल्या क्रमांकावर असल्याचा निर्वाळा देणाऱ्या जागतिक बँकेच्या अहवालात महाराष्ट्राचा मात्र आठवा क्रमांक लागला आहे. भारतातील कोणती राज्ये उद्योगांसाठी चांगली आहेत याबाबतचा अहवाल जागतिक बँकेने सोमवारी सादर केला. बँकेने दिलेल्या मानांकनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दशकाहून अधिक काळ नेतृत्व केलेला गुजरात पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांकावर फेकला गेला असून अरुणाचल प्रदेश यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. या राज्यांना लालफीतशाहीचा अडथळा दूर करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यांची क्रमवारी ठरवली जाते. जगातील देशांची क्रमवारी लावणारा जागतिक बँकेचा तो अहवाल पुढील महिन्यात जाहीर होणे अपेक्षित आहे.

 • देशातील 393 जिल्ह्यांमध्ये ईएसआयसी सुविधांचा विस्तार :

देशातील 393 जिल्ह्यांमध्ये ईएसआयसी सुविधांचा विस्तार केला जाणार असून, ऑगस्ट 2015 पासून देशातील इमारत बांधकामगारांना ही सुविधा लागू करण्यात आली आहे. याचा लाभ देशातील 7 कोटी 40 लाख इमारत बांधकामगारांना होईल. येत्या काळात ऑटोचालक, हातगाडीचालक, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, शेजमजूर यांना ईएसआयसीची सुविधा दिली जाईल. तसेच या सुविधेसाठी 15 हजारांवरून 25 हजार रुपये पगाराची मर्यादा करण्यावर विचार केला जाणार आहे.

 • इंदिरा गांधी, राजीव गांधी त्यांची टपाल तिकिटे बंद करण्याचा निर्णय :

माजी पंतप्रधानद्वय इंदिरा गांधी, राजीव गांधी त्यांची टपाल तिकिटे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत (आरटीआय) दाखल अर्जामुळे हा खुलासा झाला. डिसेंबर 2008 मध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार या मालिकेअंतर्गत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्मृतीत टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली होती. आरटीआयला मिळालेल्या उत्तरानुसार आता दीनदयाल उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राममनोहर लोहिया यांच्या स्मृतीत टपाल तिकिटे काढण्याची योजना आहे. यामध्ये इंदिरा व राजीव गांधी यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यजित रे, होमी जहांगीर भाभा, जेआरडी टाटा आणि मदर तेरेसा यांची टपाल तिकिटे जारी करण्यात आली होती.


 • 'नाम' फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना :


दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने 'नाम' फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना केली आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला आणखी व्यापक दिशा देण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठी नाना आणि मकरंद यांनी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली होती. या संस्थेत जमा होणाऱ्या निधीमधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 15 हजारांची मदत करण्यात येईल. 2013, 14 आणि 15 या तीन वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येईल. त्याचबरोबर दुष्काळी भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे, पारंपरिक ऊर्जास्रोत शोधून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. निधी जमा करण्यासाठी 'नाम' फाउंडेशनच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते उघडण्यात आले आहे. इच्छुकांनी खाते क्रमांक 35226127148 वर (आयएफसी एसबीआयएन 0006319) धनादेश जमा करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन नानांनी केले.

 • "पेंटॅगॉन"मध्ये भारतविषयक विशेष विभागाची स्थापना :

भारताबरोबरील संरक्षणविषयक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अमेरिकेने वेगाने प्रयत्न सुरू केले असून, त्याचाच भाग म्हणून "पेंटॅगॉन"मध्ये भारतविषयक विशेष विभागाची स्थापना करण्यात आली आहे. पेंटॅगॉनमधील अशा स्वरूपाचा हा पहिलाच विभाग आहे. भारताबरोबर उच्च तंत्रज्ञानावर आधारित लष्करी साहित्याचा विकास आणि उत्पादन करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. केथ वेब्स्टर हे या "इंडिया रॅपिड रिऍक्‍शन सेल"चे प्रमुख आहेत. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयामधील विविध विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात अधिकाऱ्यांचा समावेश या सेलमध्ये करण्यात आला आहे.

 • मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याचा निर्णय :

प्रलंबित राहिलेला मच्छीमारांचा मुद्दा, तामिळींना न्याय, परस्परांशी व्यापारवृद्धी, संरक्षण सहकार्य आदी मुद्दय़ांबरोबरच दहशतवादाचा नि:पात करण्यासंबंधी भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी एकमत झाले. श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी भेट घेऊन विविध मुद्दय़ांवर विचारविनिमय केला.

 • माजी बँकर माल्कम टर्नबुल यांचा ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान म्हणून शपथविधी :

माजी बँकर माल्कम टर्नबुल यांचा ऑस्ट्रेलियाचे दोन वर्षांतील चौथे पंतप्रधान म्हणून मंगळवारी शपथविधी झाला.पक्षांतर्गत मतभेदांमुळे पक्षनेतेपदासाठी मतदान घेण्यात आले त्यात टर्नबुल यांनी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांचा पराभव केला होता. टर्नबुल यांनी गतिशील अर्थव्यवस्था तसेच प्रशासनाचे खुले, सहभागात्मक प्रारूप राबवण्याचे आश्वासन दिले आहे. टर्नबुल यांना गव्हर्नर जनरल पीटर कॉसग्रोव यांनी शपथ दिली. टर्नबुल हे 60 वर्षांचे असून ते ऑस्ट्रेलियाला सल्लागार स्वरूपाचे नेतृत्व देणार आहेत.


 • चोक्करलिंगम आयोग:

राज्यात पिकांची पैसेवारी काढण्याची पद्धत 125 वर्षे जुनी असून हवामानात झालेला बदल, कृषी उत्पन्नात झालेली वाढ या गोष्टी विचारात घेऊन पैसेवारी काढण्याच्या सध्याच्या पद्धतीत सुसंगत बदल करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली समिती .

चोक्कपलिंगम समितीच्या शिफारशी:-

 1. पीकपैसेवारी जाहीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
 2. पैसेवारी जाहीर करण्याच्या तारखा ः पश्चि्म महाराष्ट्रात सध्या 15 सप्टेंबर रोजी नजर पैसेवारी आणि 30 डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. आता 15 ऑक्टोसबरलाच अंतिम पैसेवारी जाहीर करावी. विदर्भ, मराठवाड्यात 15 ऑक्टो रबरला नजर, तर 30 जानेवारी रोजी अंतिम आणेवारी जाहीर करण्यात येते. आता 15 सप्टेंबरला नजर, तर 15 ऑक्टोलबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर करावी.
 3. जून ते सप्टेंबरदरम्यान 50 टक्यांम पेक्षा कमी पाऊस पडल्यास दुष्काळ जाहीर करावा, तर 75 टक्यांन पर्यंत पाऊस पडल्यास टंचाई जाहीर करावी.
 4. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मागील 5 वर्षांचे सरासरी उत्पन्न विचारात घेऊन त्याचे मूल्यांकन 100 पैसे समजण्यात यावे,
 5. प्रमुख पीक निश्चिसत करताना लागवडीखालील क्षेत्र 80 ऐवजी 70 टक्के गृहीत धरावे.
 6. केंद्राच्या धोरणाची सांगड घालण्यासाठी टंचाईऐवजी दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांचा विचार व्हावा. • दोन हजार वर्षे जुन्या स्तूपाचा जीर्णोद्धार :

सम्राट अशोक याने चीनला भगवान बुद्धाची आठवण म्हणून पाठविलेल्या व दोन हजार वर्षे जुन्या स्तूपाचा जीर्णोद्धार करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. तिबेटच्या जवळ असलेल्या चीनच्या क्विंगहाई प्रांतात या स्तूपाची प्रतिष्ठापना झाली आहे. भगवान बुद्धाचे अवशेष असलेल्या 19 स्तूपांपैकी हा एक आहे. या स्तूपाची प्रतिष्ठापना भारतीय भिक्खूने धार्मिक विधींनी केली. हा स्तूप बुद्ध धर्म भारतातून चीनमध्ये आल्याचे प्रतीक समजला जातो. या स्तूपाला अशोक खांब असून त्यात भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती आहे.  लडाखमधील द्रूकप् वंशाचे आध्यात्मिक नेते ग्लॅयवँग द्रूकप् यांनी मूर्तीला अभिषेक करून तिची मंगळवारी प्रतिष्ठापना केली. आख्यायिकेनुसार अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धाला दहन करण्यात आल्यानंतर त्याच्या अनुयायांना कवटीचे एक हाड, दोन खांद्याची हाडे, चार दात आणि 84 हजार मोत्यासारखे अवशेष मिळाले. बुद्ध धर्माच्या नोंदीनुसार सम्राट अशोकाने शाक्यमुनींचे शरीर गोळा करून जगात ते विविध ठिकाणी पाठवायच्या आधी पॅगोडासारख्या पवित्र ठिकाणी ठेवले होते. चीनला त्यापैकी 19 मिळाल्याचे समजले जाते व नांगचेंग येथील स्तूप हा त्यापैकी एक आहे.

 • मदर तेरेसा यांचे छायाचित्र अमेरिकेच्या दहा डॉलरच्या नोटेवर :

नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांचे छायाचित्र अमेरिकेच्या नव्याने तयार केलेल्या दहा डॉलरच्या नोटेवर छापावे, अशी मागणी अमेरिकेतील ओहियो राज्याचे राज्यपाल जॉन कॅसिश यांनी केली आहे. कॅसिश हे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उत्सुक आहेत.


 • चर्चित गावांमधील महत्वाचे उपक्रम :


माळेगाव (ता. सिन्नर) :
मासिक धर्माच्या काळात महिलांना लागणारे सॅनिटरी नॅपकीन सहजगत्या आणी स्वस्तदरात उपलब्ध व्हावे यासाठी माळेगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला बंगळूरू येथील खासगी कंपनीच्या सहकार्यातून गावात दोन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनसाठी एटीम सुविधा उपलब्ध करून दिली आहे अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे

इस्लामपूर :
फोर जी वायफाय सेवा देणारी ‘इस्लामपूर’ ही देशातील पहिली नगरपालिका झाली सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे दीड लाख लोकवस्तीचे शहर. या शहराला नवी ओळख मिळालीय. इस्लामपूर हे देशातलं पहिलं 4 जी वायफाय शहर बनंलयं. रिलायन्स जिओच्या मदतीनं इस्लामपूर नगरपालिकेने नागरिकांसाठी फोर जी वायफाय सुविधा उपलब्ध केली

व्हिलर द्विप :
जनतेचे राष्ट्रपती असलेल्या अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे. बीजू पटनाईक यांनी 1993 मध्ये कलाम यांच्या सांगण्यावरून व्हिलर द्विप संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात दिला होता. व्हिलर बेट ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर चांदीपूरच्या दक्षिणेला सुमारे 70 किमी अंतरावर स्थित आहे. या बेटाचा वापर भारताच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी केला जातो.


 • सार्वभौम सुवर्ण हमी रोखे :

सोने खरेदीतील गुंतवणूक चलनात यावी, यासाठी सरकारने "सॉव्हरीन गोल्ड बॉंड‘ (सार्वभौम सुवर्ण हमी रोखे) आणण्याचा निर्णय घेतला यातून सोन्याची बिस्किटे आणि नाणी खरेदी पोटी दरवर्षी 300 टन सोन्याची मागणी नियंत्रित करता येईल, असा सरकारचा अंदाज केंद्र सरकारतर्फे रिझर्व्ह बॅंक हे "सार्वभौम सुवर्ण हमी रोखे‘ बाजारात आणेल. यामुळे गुंतवणूकदारांना सोन्याऐवजी दोन ग्रॅम, पाच ग्रॅम, दहा ग्रॅम, 100 ग्रॅम नाण्यांच्या किमतीच्या प्रमाणातील सुवर्ण रोखे खरेदी करता येतील. वर्षभरात प्रतिव्यक्ती 500 ग्रॅमपर्यंतचेच सुवर्ण रोखे घेता येतील. शिवाय या रोख्यांवर व्याज मिळेल. पाच ते सात वर्षे मुदत असेल आणि मुदतीनंतर बॅंकांमध्ये या रोख्यांवर सोन्याच्या बाजारभावाएवढी रक्कम परतावा म्हणून मिळेल. डीमॅट आणि पेपर अशा दोन्ही स्वरूपात हे रोखे मिळतील. बॅंका, बॅंकेतर वित्तीय संस्था, टपाल कार्यालये, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र प्रतिनिधींमार्फत रोख्यांची खरेदी आणि विक्री करता येईल. शिवाय हे रोखे कर्जासाठी तारण म्हणूनही मानले जातील.


थोडक्यात महत्वाचे : 
१) सिंचन विहीर' यशस्वितेसाठी महाराष्ट्रात मध्य प्रदेश पॅटर्न राबवला जात आहे.
२) कॅपजेमिनी आणि आरबीसी वेल्थ मॅनेजमेंटने जाहीर केलेल्या ‘वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट 2015‘ नुसार सर्वाधिक कोट्यधीश लोकांची संख्या असणारा भारत जगातील अकराव्या क्रमांकाचा देश ठरला .
३) देशाच्या बँकिंग प्रणालीत लघु-वित्त बँकांचा प्रवेश खुला करताना, रिझव्र्ह बँकेने १० कंपन्यांना प्राथमिक मंजुरी दिली.
४) मिक्ता 2016‘चा पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलिया देशात 26 ते 31 जानेवारीदरम्यान होणार आहे.
५) राज्यात पिकांची पैसेवारी काढण्याची पद्धत 125 वर्षे जुनी असून हवामानात झालेला बदल, कृषी उत्पन्नात झालेली वाढ या गोष्टी विचारात घेऊन पैसेवारी काढण्याच्या सध्याच्या पद्धतीत सुसंगत बदल करण्यासाठी राज्य सरकारने चोक्‍कलिंगम समिती नेमली होती .
६) दरवर्षी राज्यात १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो.
७) रेल्वेच्या गोळाफेक प्रकारातील खेळाडू मनप्रीत कौर हिने रिओ ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध केली. कोलकत्ता येथे सुरू असलेल्या ५५ व्या राष्ट्रीय खुल्या अथलेटिक्‍स स्पर्धेत तिने १८ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत ही कामगिरी केली.

८) हॅंगझू (चीन) या शहरात २०२२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
(पुढील आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये इंडोनेशिया येथे होणार आहेत.)

९) श्रीलंकेचे माजी कसोटीपटू रोशन महानामा  यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सामनाधिकारी म्हणून ‘एलिट पॅनेल’मधून वर्षाअखेर निवृत्तीचा निर्णय घेतला .

१०) अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मॅन बुकर पुरस्कारासाठी सहा लेखकांच्या नावांच्या नामांकनांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक संजीव साहोटा यांचा समावेश करण्यात आला आहे.