Post views: counter

UPSC Guidance Center

पूर्ण वेळ मार्गदर्शक

एकेकाळी स्पर्धा परीक्षा देणारे पण काही कारणांनी (कदाचित योग्य मार्गदर्शनाचा अभाव) यश न मिळालेले अनेकजण आज पूर्णवेळ मार्गदर्शन करतात. ते अर्थात व्यावसायिक असतात व आपले ज्ञान व अनुभव यांचा फायदा उमेदवारांना करून देतात. त्यांच्याकडे त्या क्षेत्राची माहिती व ज्ञान दोन्ही असते. तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा, भविष्याकडे बघण्याच्या क्षमतेचा फायदा करून घ्यायला हवा. मात्र हे मार्गदर्शक सकारात्मक विचारांचे असावेत. ते व्यावसायिक हवेत, व्यापारी वृत्तीचे नको. त्यांनी सुरुवात ते शेवट अशी अखंड साथ द्यायला हवी.

क्लास लावायची गरज आहे का?

या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे 'हो'. आपण शाळा-कॉलेजात असताना मुख्य शिक्षण शाळेत होते व त्याव्यतिरिक्त क्लास लावला जातो. पण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे असे कुठले शाळा-कॉलेज नाही. त्यामुळे इथे क्लास हाच शाळा-कॉलेज ठरतो. कुठेतरी जोडलेले असाल तरच अभ्यासाला गती येते. जे वाचून समजत नाही ते ऐकून समजते. अभ्यासासाठी ग्रुप मिळतो. सगळीच पुस्तके स्वतः खरेदी करायला परवडत नाहीत. ती क्लासमधून वाचण्यासाठी नेता येतात. रोज अनेक पेपर वाचायला मिळतात. सराव चाचण्या होऊन त्यावर चर्चाही होते. क्लासेस/मार्गदर्शक संस्था उमेदवारांच्या हॉस्टेलची व वाचनालयाचीही सोय करतात. हे सर्व फायदे बघता क्लास लावणे फायद्याचे आहे. काही मार्गदर्शक वर्गांनी सातत्याने लेख लिहून व गावोगावी सेमिनार आयोजित करून स्पर्धा परीक्षांविषयी जागृती निर्माण केली आहे. त्यांनी कष्टपूर्वक अभ्याससाहित्य मराठीत प्रकाशित केले आहे. या संस्था चालू घडामोडींवर आधारित मासिके काढतात, ज्याचा फायदा उमेदवारांना होतो. यशस्वी उमेदवारांच्या व्याख्यानमाला आयोजित करून त्यांनी यशाचा मंत्र खेडोपाड्यात पोहोचवण्याचा प्रयास केला आहे.

क्लासच्या मार्गदर्शनाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सरकारने पुढाकार घेऊन चालवलेले वर्ग, जिथे उमेदवारांचा खर्च सरकार लोकांनी दिलेल्या करातून करते, व दुसरा प्रकार म्हणजे खासगी वर्ग, जिथे थेट उमेदवारांकडून फी घेतली जाते.

एखाद्या मोठ्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर आई-वडील, भावंडे, शेजारी, हितचिंतक व मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांचे टीमवर्क मागे उभे असावे लागते. कोणा एकाच्या आधारावर हा गोवर्धन पर्वत उचलता येत नाही. अशा वेळी मार्गदर्शन हा ही यशामध्ये एक (एकमेव नव्हे) मोलाचा घटक ठरतो, त्याची उपेक्षा करून चालणार नाही. पण कोणी म्हणेल की फीचे पैसे गरिबांनी कुठून आणायचे? यावर असे म्हणता येईल की सरकारने काही पावले उचलून प्रत्येकाला या परीक्षांचे शिवधनुष्य उचलण्यासाठी समान संधी उपलब्ध करून दिली आहे. नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात राज्य सरकारने तब्बल २० कोटी रुपयांची तरतूद स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे. राज्याने एकीकडे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त अधिकारी केंद्रीय सेवेत जातील अशी सोय लावून दिली आहे, दुसरीकडे यातून शिक्षण, प्रशिक्षणातून चांगले अधिकारी राज्यातही मिळावे यासाठी प्रयत्न केला आहे.

मार्गदर्शनाच्या सोयी
राज्यात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्य सरकारने अगदी सुरवातीला मुंबईत राज्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था स्थापन केली. (SIAC) ही संस्था १९७६ पासून आजपर्यंत म्हणजे सुमारे चाळीस वर्षे महाराष्ट्रातली एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून नावाजलेली आहे. SIACने जे मॉडेल उभे केले ते आजही आदर्श मानले जाते. ते मॉडेल म्हणजे प्रवेशासाठी परीक्षा घेणे, निवडलेल्या उमेदवारांना वर्षभर शिकवणी, हॉस्टेल, विद्यावेतन यांची सोय करून देणे. स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी सगळी पुस्तके उपलब्ध करून देणारे ग्रंथालय, २४ तास वातानुकुलीन वाचनालय, तत्पर सेवा व प्रत्येक उमेदवाराची घरातील सदस्य असल्याप्रमाणे काळजी घेणे. या सगळ्यांतून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी एकत्र आले व त्यांच्या धडपडीला आधार व दिशा मिळाली. महाराष्ट्रातील बहुतेक यशस्वी उमेदवार कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर SIAC मध्ये येऊन गेलेले असतात, यातच सगळे आले. आतमध्ये प्रवेश करताच SIAC चे माजी विद्यार्थी व कर्तव्यनिष्ठ अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा फोटो दिसतो व संस्थेच्या उज्ज्वल परंपरेची खात्री पटते. प्रवेश परीक्षेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.siac.net.in.

'खोली बंद करून दिवसरात्र अभ्यास केला व दार उघडले ते सरकारी अधिकारी झालो, घरच्यांनाही चकित केले, असे होत नाही.' स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांचा हातभार लागत असतो. त्यामुळे घराच्या बाहेर पडून मार्गदर्शन मिळवलेले चांगले.
.....

सरकारी प्रयत्न

 'एसआयएसी'मधील जे उमेदवार यशस्वी होऊन अधिकारी म्हणून निवडले गेले त्याचा राज्याला फायदा झालाच, शिवाय पुढच्यांनाही फायदा झाला. प्रत्यक्ष फायदा म्हणजे या अधिकाऱ्यांनी पायवाट तयार करून दिली. त्याचाच पुढे महामार्ग झाला व अप्रत्यक्ष फायदा म्हणजे प्रेरणा मिळाली. मुंबईच्या 'एसआयएसी'चे जे मॉडेल होते त्याचे प्रतिरूप निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याप्रमाणे औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर येथेही 'एसआयएसी' सुरू केल्या. तिथून पुढे जात आता अमरावती व नाशिक येथेही 'एसआयएसी' चालू केल्या आहेत. या सर्व संस्था स्वायत्त आहेत. त्यांच्यामुळे स्थानिक पातळीवर सोयी व अभ्यासाचे वातावरण तयार झाले. मुंबईच्या 'एसआयएसी'ची प्रवेश क्षमता १०० विद्यार्थी आहे. तिच्यामध्ये सगळ्यांनाच प्रवेश मिळू शकत नव्हता. इतर केंद्रे आल्यामुळे अनेकांना तयारीची संधी व सुविधा मिळू शकल्या. विशेषतः मुलींची खूप सोय झाली. कारण हॉस्टेलची सोय केल्याने शहरात येऊन तयारी करणे शक्य झाले. इतर काही महत्त्वाचे प्रयत्न म्हणजे, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे प्रामुख्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्रशिक्षण देणारे केंद्र काढण्यात आले. (डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र) तेही आता पूर्ण भरात आले असून, उमेदवारांना राहण्यापासून, पुस्तकापर्यंत उत्तम सोयी तेथे पुरवल्या जातात.


और कारवा बनता गया

'एसआयएसी' व यशदाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर विविध विद्यापीठांनीही आपल्या आवारात अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्रे काढली. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या बाहेर जाण्याची गरज राहिली नाही. त्यांना आतच (इन हाऊस) मार्गदर्शन उपलब्ध होऊ लागले. काही उदाहरणे म्हणजे पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व इतर कृषी विद्यापीठे, नागपूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आदी. ही सर्वच केंद्रे कमी अधिक उत्साहाने कार्यरत आहेत. याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) जे कॉलेज स्पर्धा परीक्षा केंद्र चालवेल त्यांना अनुदान द्यायला सुरुवात केली. या प्रोत्साहाने प्रेरित होऊन आता राज्यातील अनेक कॉलेजांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेणारी केंद्रे चालवली जातात. राज्याच्या समाज कल्याण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (BARTI) या नावाने स्पर्धा परीक्षांची केंद्रे मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणी सुरू केली आहेत. ठाणे महापलिकेने चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्था सुरू करून नवाच पायंडा पाडला. महापालिका चालवत असलेले असे हे कदाचित एकमेव केंद्र असावे. याशिवाय थेट सरकारी नसली तरी एनजीओ पद्धतीने चालवली जाणारी काही केंद्रेही आहेत.

खासगी प्रयत्नांचा जमाखर्च

राज्यात खासगी क्लासेसनेही आपले पाय रोवले आहेत. ऐकेकाळी तयारीसाठी दिल्लीतच गेले पाहिजे असा समज होता. तो आता पुसला गेला आहे. राज्यातील बहुसंख्य उमेदवार येथूनच मार्गदर्शन घेऊन यश मिळवतात. बऱ्याचदा उमेदवारांकडे एकदाच फी भरण्याची ऐपत असते. त्यामुळे घाईघाईने कोणत्याही मार्गदर्शन संस्थेत प्रवेश घेणे टाळावे. केवळ जाहिरातींच्या आकर्षकतेला भुलून प्रेवेश घेऊ नये. सर्वात चांगली पद्धत म्हणजे स्वतः विविध संस्थांची माहिती घेणे, त्यात अभ्यासक्रम पूर्ण होतो की नाही, प्रत्येक विषयासाठी विशेतज्ज्ञ असतात की एकच नामवंत फॅकल्टी सर्व विषय शिकवते, पूर्णवेळ तज्ज्ञ शिकवतात की आदल्या वर्षीचे यशवंत नामवत शिकवतात, एकदा फी भरल्यानंतर यश मिळेपर्यंत मदत केली जाते की नाही, तासिका वेळेवर होतात की नाही, जाहिरातीतील दावे खरे आहेत की नाही, प्रत्यक्ष शिकवले जाते की फक्त 'स्व'चा विकास शिकवला जातो, एका वर्गात किती मुले असतात, या सर्व बाबींची सखोल चौकशी करणे चांगले. संस्थेच्या जुन्या विद्यार्थ्यांच्या भेटीतून यातील बरीचशी माहिती मिळू शकते. शेवटी अभ्यास स्वतःलाच करायचा असला, तरी योग्य ठिकाणी प्रवेश घेतला की प्रवासात खाचाखळगे कमी लागतात.

अंतिम निर्णय

यापैकी कोणत्या संस्थेतून मार्गदर्शन घ्यायचे ते ज्याचे त्यांनी ठरवावे. साधारणपणे यशस्वी विद्यार्थी सगळ्यांचीच लागेल तशी मदत घेतात असे दिसते. त्यात चुकीचे काहीही नाही. कारण ही मोठी परीक्षा फक्त कोणाच्या एकच आधारावर पार होत नाही. मात्र, एक निश्चित की एकट्याने अभ्यास करण्यापेक्षा कुठेतरी अन्य ठिकाणी जोडलेले असणे कधीही चांगले.