Post views: counter

Current Affairs Aug 2015 Part - 4

  • ख्रिस रॉजर्स क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर :
सलामीवीर ख्रिस रॉजर्स याने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मंगळवार जाहीर केला. इंग्लंडविरुद्ध मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यापाठोपाठ रॉजर्सनेही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने ऑस्ट्रेलिया पिछाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना गुरुवारपासून खेळविला जाणार आहे. डावखुरा ख्रिस रॉजर्स हा 38 वर्षांचा असून, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने 62.42 च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत.
  • प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे निधन :
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि रवींद्र संगीत गायिका शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांनी देशातच नव्हे तर युरोप, आशिया आणि आफ्रिकेत रवींद्र संगीत गायन आणि नृत्य, नाटकांचे प्रभावी सादरीकरण केले होते. रवींद्रनाथांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी गीतांजली संगीत समूहाची स्थापना केली होती. प्रणव मुखर्जी आणि शुभ्रा यांचा विवाह 13 जुलै 1957 रोजी झाला.
  • 'मार्शमॅलो' (6.0) अँड्रॉइडचे व्हर्जन लवकरच बाजारात दाखल :

आईसक्रीम (4.0), जेलीबीन (4.1), किटकॅट (4.4), आणि लॉलिपॉप (5.0) नंतर गुगलचे 'मार्शमॅलो' (6.0) या नावाचे अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.ज्या डेव्हलपर्सना अँड्रॉइडसाठी नवीन अप्लिकेशन्स तयार करायची आहेत किंवा अपडेट करायची आहेत ते आता सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकतात, असंही इसॉन म्हणाले. नवीन 'मार्शमॅलो'चे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर व सुधारीत पॉवर सेव्हिंग मोड असणार आहे. प्रत्येक नवीन अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना किंवा ते अपडेट करताना युजर्सना संमतीची आवश्यकता भासणार नाही, असंही गुगलतर्फे सांगण्यात आलं आहे.  




  • चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जुलै या तिमाहीमध्ये अप्रत्यक्ष कराचा महसूल ३७ टक्क्यांहून अधिक वाढून २.१ लाख कोटींवर गेला आहे. अबकारी कराच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वसुलीमुळे हीकिमया घडून आली.गेल्या वर्षी याच कालावधीदरम्यान १.५३ लाख कोटी एवढा अप्रत्यक्ष कर प्राप्त झाला होता, असे अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले. २०१५-१६ च्या जुलै महिन्यात अप्रत्यक्ष कराची वसुली पूर्वीच्या वर्षापेक्षा ३९.१ टक्क्यांनी वाढून ५६ हजार ७३९ कोटी रुपये झाली. अप्रत्यक्ष कर महसूल जुलै २०१४ च्या (४० हजार ८०२ कोटी) तुलनेत जुलै २०१५ मध्ये वाढून ५६ हजार ७३९ कोटी रुपये झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या काळात अप्रत्यक्ष करात ३९.१ टक्के

  • ताजमहाल ठरला "बेस्ट टुरिस्ट ऍट्रॅक्‍शन" :


प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा आग्रा येथील ताजमहाल केवळ देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्याही पसंतीस उतरला असून, तो जगातील "बेस्ट टुरिस्ट ऍट्रॅक्‍शन" ठरला आहे. "लोनली प्लॅनेट्‌स" या ऑनलाइन पोर्टलने केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली आहे. तसेच उत्तर कंबोडियामधील अंगकोर मंदिरे ही पर्यटकांना आकर्षित करणारी सर्वांत मोठी हॉटस्पॉट ठरली असून, या भागातील एक हजारांपेक्षाही अधिक मंदिरे, घुमट आणि अन्य वास्तू पाहण्यासाठी दरवर्षी वीस लाखांपेक्षाही अधिक पर्यटक या ठिकाणी येतात.यानंतर ऑस्ट्रेलियातील "ग्रेट बॅरिअर रिफ"चा क्रमांक लागतो. पेरूमधील माचूपिच्चू येथील "इंकासिटी" तिसऱ्या स्थानी असून, चीनमधील "ग्रेट वॉल ऑफ चायना" चौथ्या स्थानावर आहे. ब्रिटनमधील "ब्रिटिश म्युझियम‘ पर्यटकांच्या पसंतीच्या बाबतीत पंधराव्या स्थानावर आहे.
  • कनिका कपूर विजेती ठरली "मिस इंडिया" :
कोचीमध्ये मंगळवारी झालेल्या "मिस एशिया 2015" स्पर्धेमध्ये भारताची "मिस इंडिया" कनिका कपूर विजेती ठरली आहे.
 या स्पर्धेमध्ये 12 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
 त्यामध्ये या स्पर्धेत चीन, भूतान, मलेशिया, इराण, नेपाळ, श्रीलंका, तिबेट याशिवाय अन्य काही देशातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
 या सर्वांमधून "मिस इंडिया" पुरस्कार विजेती कनिका कपूर विजेती ठरली आहे.
 पुरस्काराच्या स्वरुपात तिला 50 लाख रुपये मिळाले आहेत.
 "मिस फिलिपाईन्स" असलेली अल्फे मॅरी नाथानी उपविजेती ठरली आहे.

  • तृतीयपंथी व्यक्तीची व्हाईट हाऊसमध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक :
समलैंगिक व्यक्तींना विवाहाचा अधिकार दिल्यानंतर अमेरिकेने आता लैंगिक अल्पसंख्यकांना समानतेची वागणूक देण्याच्या दिशेने आणकी एक पाऊल टाकत एका तृतीयपंथी व्यक्तीची व्हाईट हाऊसमध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक केली आहे. राफी फ्रीडमन-गुर्स्पान असे त्यांचे नाव आहे. नॅशनल सेंटर फॉर ट्रान्सजेंडर इक्वालिटी येथे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या राफी आता व्हाईट हाऊसच्या कार्यालयामध्ये भरती विभागामध्ये काम करतील.


  • अश्वनी लोहानी यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती :
मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अश्वनी लोहानी यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 तीन वर्षांच्या कालावधीसाठी लोहानी यांची निवड करण्यात आली असून ते रोहित नंदन यांची जागा घेतील.
 पहिल्यांदाच रेल्वे सेवेतील अधिकाऱ्याची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 लोहानी हे 1980 साली भारतीय रेल्वे सेवेत यांत्रिक अधिक्षक अभियंता म्हणून रूजू झाले होते.
 लोहानी सध्या मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळात भोपाळ येथे कार्यरत आहेत.

  • अवकाश मोहिमेत नागरिकांच्या सहभागासाठी "नासा"चा उपक्रम :
जगभरातील खगोलप्रेमींना अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा"ने एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. पुढील वर्षी मंगळाच्या दिशेने सोडल्या जाणाऱ्या "द इनसाइट लॅंडर" या अवकाशयानामधून तुमचे नाव मंगळावर पाठविण्याचे आवाहन "नासा"ने केले आहे. मंगळाच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठी "नासा"ने ही मोहीम आखली आहे. या मोहिमेअंतर्गत भविष्यात काही अवकाशयाने मंगळासह विविध ग्रहांकडे पाठविण्यात येणार आहेत. नागरिकांनी एका मायक्रोचिपमध्ये आपले नाव टाकून ती "नासा"कडे पाठविल्यास अशा चिप अवकाशयानात ठेवण्यात येणार आहेत. अशा प्रकारे हे नागरिक भविष्यातील अवकाश मोहिमांचा अप्रत्यक्षपणे भाग बनू शकतील. "नासा"ने हे आवाहन केल्यापासून चोवीस तासांच्या आत 67 हजार नागरिकांनी आपली नावे नोंदविली आहेत. नावे नोंदविण्यासाठी 8 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. याबाबतची अधिक माहिती "नासा"च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच नाव नोंदवून झाल्यानंतर तुम्हाला "बोर्डिंग पास"ही मिळणार आहे. या आधीही "नासा"ने अशी मोहीम राबविली होती. गेल्या वर्षी सोडलेल्या ओरायन या अवकाशयानाद्वारे सुमारे 13 लाख 80 हजार नागरिकांनी अवकाशात "प्रवास" केला होता. ओरायनमधून 2030मध्ये मानवालाच मंगळावर पाठविण्याची योजना आहे. "इनसाइट"चे प्रक्षेपण 4 मार्च 2016 ला होणार आहे. त्यानंतर 2018 मध्ये दुसऱ्या ओरायनचे प्रक्षेपण आहे. "इनसाइट" यान मंगळावर उतरणार असून, ते "क्‍युरिऑसिटी" आणि "ऑपर्च्युनिटी" या यानांबरोबर मंगळाचा पृष्ठभागावर उतरून अभ्यास करणार आहे.
 "इनसाइट"द्वारे मंगळाच्या अंतर्भागाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

  • विद्यार्थ्यांना अल्पावधीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून नवे वेब पोर्टल सुरू :
विद्यार्थ्यांना अल्पावधीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून केंद्र सरकारकडून नवे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. www.vidyalakshmi.co.in  असे या पोर्टलचे नाव असून, एसबीआय, आयडीबीआय आणि बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांकडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाची माहिती यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.  अर्थमंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वित्तीय सेवा विभाग या पोर्टलच्या अपडेट्‌सवर नजर ठेवणार असून, "एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड"ने हे पोर्टल तयार केले आहे.

  • 'आयकॉन्स ऑफ पीसीएमसी' या पुस्तकाचे प्रकाशन :
चिंचवड नगरीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या 'आयकॉन्स ऑफ पीसीएमसी' या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात होणार आहे. पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीच्या उभारणीत आणि प्रगतीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जीवनप्रवासाचा आढावा या 'कॉफीटेबल बुक'मध्ये घेण्यात आला आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील 'जे. डब्ल्यू मॅरीएट', सेनापती बापट रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

  • सायना बीडब्ल्यूएफच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर :
जकार्ता येथे नुकत्याच आटोपलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात सायनाला मारिनने पराभूत केले होते. ऑलांपिक कांस्य विजेती सायना गुरुवारी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफच्या रँकिंगमध्ये 82792 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचली. या आधी इंडियन ओपन जिंकल्यानंतर सायना एक मार्च रोजी अव्वल स्थानावर दाखल झाली होती. पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप आठव्या स्थानावर आला आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा- अश्विनी पोनप्पा यादेखील दहाव्या स्थानावर झेपावल्या आहेत. इंडियन ओपन विजेता के श्रीकांत हा एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आला आहे. दोन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकणारी पी.व्ही. सिंधू 14व्या स्थानी आहे. मिश्र दुहेरीत मात्र पहिल्या 25 खेळाडूंत एकही भारतीय नाही.


  • सार्वजनिक बँकांसाठी 'इंद्रधनुष' आराखडा सादर

भांडवलाची चणचण भासणाऱ्या देशातील सार्वजनिक बँकांना ठोस सहाय्यभूत ठरणारा आराखडा'इंद्रधनुष'नावाने मोदी सरकारने १४ ऑगस्ट रोजी सादर केला.यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी बँकांसाठी मोठय़ा पदावरील नेमणूका करण्यासाठीबँक मंडळ तसेच बँकिंग व्यवस्थेत कमी राजकीय हस्तक्षेपाची यंत्रणा घोषित केली.सार्वजनिक बँकांच्या व्यवस्थापनामध्ये कमालीचे बदल घडवून आणणारी ही सात कलमी योजना आहे.या आराखड्यानुसार बँकांना तातडीने २० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्यही उपलब्ध होत आहे.
'इंद्रधनुष'ची ठळक वैशिष्ट्ये :

  1. सार्वजनिक बँकांमध्ये वरिष्ठ पातळीवरील व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी स्वतंत्र बँक मंडळ स्थापन करणे. या बोर्डाच्या कामकाजाला १ एप्रिल २०१६पासून सुरुवात होणार आहे.
  2. चिंताजनक बनलेल्या बँकांच्या बुडित कर्जाबाबत ठोस उपाययोजनाही प्रस्तावित.
  3. देशातील बँक ऑफ बडोदा व कॅनरा बँक या दोन सार्वजनिक बँकेच्या सर्वोच्च स्थानी खासगी क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती.
  4. चालू आर्थिक वर्षांतील मंजूर झालेल्या २५ हजार कोटींपैकी २० हजार कोटी रुपये महिन्याभरात देण्याचे आश्वासनही दिले गेले आहे.
  5. बँकांवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्य कतृत्वावरील आधारावर आर्थिक लाभ देण्याचा प्रस्ताव.
  6. मालमत्ता पुनर्बाधणी कंपन्यांनाही बुडित कर्जस्थिती हाताळण्यासाठी उद्युक्त करणे.
  7. सरकारच्या वतीने जारी करणाऱ्या समभागांकरिता बँक गुंतवणूक समिती गठीत करणे.

  • 'ताजमहल' ट्विटरवर

भारताची जागतिक ओळख व जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या 'ताजमहल'च्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन केले.आग्रा येथे यमुना नदीकाठी दिमाखात उभा असलेला'ताजमहल' हा उत्तर प्रदेशसाठी अद्भुत असा ठेवाआहे. 'ताजमहल'ची भुरळ जगभरातील पर्यटकांना आहे.अशावेळी 'ट्विटर' या सोशल माध्यमाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील या नंबर वन पर्यटन स्थळाचं ट्विटर अकाउंट सुरू करण्याची कल्पना सत्यात उतरवली आहे.मुख्यमंत्री अखिलेश यांनी 'ताजमहल'च्या ट्विटर अकाउंटचं उद्घाटन करताना 'ताजमहल'च्यापार्श्वभूमीवर टिपलेला पत्नी डिंपल यादव आणि मुलासोबतचा खास फोटोही शेअर केला आहे.एखाद्या ऐतिहासिक वास्तूचं ट्विटर अकाउंट सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • 'सेबी'च्या संचालक मंडळावर अरूण साठे यांची नियुक्ती
केंद्र सरकारने 'सेबी'च्या संचालक मंडळावर ज्येष्ठ वकील अरूण साठे यांची नियुक्ती केली आहे.अरूण साठे यांची सेबीच्या संचालक मंडळावर अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.सेबीच्या संचालक मंडळावर पाच सदस्य नेमण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. त्या अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे.अरूण साठे हे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे मोठे बंधू असून, ते काहीवर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही पूर्णवेळ कार्यकर्ते होते. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभानिवडणुकीत त्यांनी वायव्य मुंबईतून सुनील दत्त यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते पराभूत झाले होते. देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्थांवर राजकारणाशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केली जात असल्यामुळे केंद्र सरकारवर आधीपासूनच टीका करण्यात येते आहे. त्यातच आताअरूण साठे यांच्या नियुक्तीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यातील 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र सिंग यांच्या केलेल्या  नियुक्तीविरोधात तेथील विद्यार्थी दोन महिन्यांपासून संपावर आहेत. त्याचवेळी अनेक नामवंत कलाकारांनीही या नियुक्तीला विरोध केला आहे. रिझर्व्ह बॅंक आणि सेबीतील अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तिथे अद्याप नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांचाही कार्यकाळ येत्या काही महिन्यांमध्य संपुष्टात येणार आहे.


  • यावेळचा एल निनो परिणाम हा सर्वात जास्त प्रभावी
सध्या प्रशांत महासागरातील एल निनो प्रवाहांमुळे केवळ भारतासह अमेरिकेतील कॅलिफोर्नियातही मान्सूनलाच फटका  बसला आहे.यावेळचा एल निनो परिणाम हा सर्वात जास्त प्रभावी असून, गेल्या ६५ वर्षांत एल निनोचा इतका गंभीर परिणाम जगाच्या हवामानावर झाला नव्हता असे मत अमेरिकेतील हवामानतज्ञांनी मांडले आहे.खाली भारताच्या मान्सूनवर परिणाम करणाऱ्या एल निनो आणिला निना या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.
एल निनो
जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते आणि प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमीकडून पूर्व दिशेस वारे वाहतात आणि ढग जमलेली पाण्याची वाफ तिकडे वाहून नेतात. तेव्हा पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती, अशा प्रकारे एल निनोचा परिणाम दिसतो.
एल निनोचे परिणाम
एल निनोमुळे जगात काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी भरपूर पाऊस असा विरोधाभास निर्माण होतो. त्याचा परिणाम अमेरिकेतील हिवाळ्यावर व भारतातील मान्सूनवर होत असतो.प्रशांत महासागरात वादळे होतात. एकूणच सगळीकडे तापमान वाढते.एल निनोमुळे कॅलिफोर्नियात हिवाळ्यात अवक्षेप तयार होऊन पाऊस होतो. पण लागोपाठ चारवर्षे कॅलिफोर्नियात दुष्काळ आहे.यंदा सर्वात प्रखर एल निनो असल्याने भारतात दुष्काळ तर आहे पण कॅलिफोर्नियात पावसाची अनिश्चितता आहे.
ला निना
जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ला निना असे संबोधले जाते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा