Post views: counter

वारा

 प्रमुख भू प्रकार - वारा


                   क्षरण प्रक्रियेत वारा हे अत्‍यंत महत्त्वाचे कारक आहे. वार्‍याचे बहुतांशी कार्य शुष्‍क वाळवंटी प्रदेशात आढळून येते. वार्‍याचे कार्य प्रामुख्‍याने खनन, वहन व संचयन या प्रकारे होते.
                   वार्‍याचे खनन कार्य प्रामुख्‍याने ३ प्रकारे होते. वार्‍यामुळे एखाद्या ठिकाणची रेती थेटपणे उचलून नेण्‍याच्‍या प्रक्रियेस अपवहन असे म्‍हणतात. अपघर्षण क्रियेत वार्‍यासोबत असणारे रेतीचे कण खडकांवर घासले जाऊन खडकांची झीज होते. तर रेतीचे कण एकमेकांवर आदळून विभाजीत होण्‍याच्‍या क्रियेस सन्निघर्षण असे संबोधले जाते. वार्‍याच्‍या खनन कार्याची तीव्रता प्रामुख्‍याने वार्‍याचा वेग, रेतीच्‍या कणांचा आकार, खडकांचे स्‍वरूप व हवामान यावर अवलंबून असते.

                     वार्‍यासोबत पुढीलप्रकारे गाळाचे वहन होते. निलंबन क्रियेत बारीक रेतीचे कण पृष्‍ठभागाला न स्‍पर्श करता वार्‍यासोबत वाहून नेले जातात. उत्‍प्‍लवन क्रियेत रेतीचे कण चेंडूप्रमाणे उड्यांच्‍या अवस्‍थेत पुढे जातात तर कर्षण क्रियेत मोठ्या आकाराचे कण पृष्‍ठभागावरून घरंगळत अथवा घर्षण करत वाहून नेले जातात. वार्‍यामुळे निर्माण होणार्‍या भूरूपाचे क्षरण भूरूप व संचयन भूरूप असे प्रकार पडतात.
  • क्षरण भूरूपे-
१) अपवहन कुंड
वार्‍यामुळे एखाद्या ठिकाणची रेती उडून जाऊन निर्माण झालेल्‍या उथळ खड्यास अपवहन कुंड असे म्‍हणतात.उदा. इजिप्त वाळवंटातील कतारा हे अपवहन कुंड
२) भूछत्र खडक
जमिनीपासून अंदाजे १ मीटर उंचीवर वार्‍यासोबतच्‍या कणामुळे खडकांची जास्‍त झीज होते. परिणामी उंचीवर रूंद व जमिनीलगत अरूंद अशा भूछत्राची निर्मिती होते.
उदा. सहारा वाळवंटात अनेक भूछत्र खडक आढळतात.
३) द्विपगिरी
सपाट वाळवंटीप्रदेशात वर आलेल्‍या अलिप्त टेकड्यांना द्विपगिरी असे म्‍हणतात. त्‍यांचा उतार सरळ असून घुमटासारखा या द्विपगिरी बहुतांशी ग्रेनाइटच्‍या बनल्‍या असतात.
उदा. ऑस्‍ट्रेलिया वाळवंटातील ऐरिस द्विपगिरी
४) टोपणशीला
तुलनेने कठीण खडक वरच्‍या भागात व मृदू खडक खालच्‍या भागात असणार्‍या वाळवंटातील स्‍तंभास टोपणशील असे म्‍हणतात. कठीण व मऊ खडकांच्‍या असंगत क्षरण क्रियेमुळे यांची निर्मिती होते.
५) ज्‍यूजेन
वाळवंटात एकमेकास समांतर असे क्षितिजसमांतर कठीण व मृदू खडक आढळतात. कठीण खडकांना पडलेल्‍या भेगांची झीज होऊन मोठ्या खाचा निर्माण होतात. हळूहळू त्‍यांची खोली वाढून त्‍याखालील मृदू खडकाची देखील झीज होते. या वैशिष्‍टयपूर्ण कटक आणी खाच या भूरूपास ज्‍यूजेन असे म्‍हणतात.
उदा. कॅलोरेडो वाळवंआत वैशिष्‍टयपूर्ण ज्‍यूजेन आढळतात.
६) यारदांग
यांची रचना ज्‍यूजेन प्रमाणेच असते. परंतू ज्‍यूजेन मधील मृदू व कठीण खडकांच्‍या आडव्‍या स्‍तराऐवजी त्‍याचे उभे स्‍तर आढळतात.
७) मेसा व बुट्टे
मेसा या स्‍पॅनीश शब्‍दाच्‍या अर्थ मंचक असा होतो. वाळवंटी प्रदेशात कठीण खडकांची फारशी झीज होत नाही. परिणामी त्‍यापासून सरळ बाजू असलेल्‍या बुट्ट्यांची मेसांची निर्मिती होते.
उदा. एरिझोना वाळवंटातील मंचक. बराच काळ मेसाची झीज होऊन आकाराने छोट्या मंच निर्माण होतात.
८) वातघ्रुष्‍ट
रेतीच्‍या घर्षण क्रियेमुळे दगडगोट्यांना पैलू निर्माण होतात. या पैलूदार दगडगोट्यास वातघ्रुष्‍ट असे म्‍हणतात. ३ बाजूच्‍या वातघ्रुष्‍टास त्रैनिकतर २ बाजूच्‍या वातघ्रुष्‍टास ब्‍दैनिक असे म्‍हणतात.
९) वातखिडकी
सततच्‍या घर्षणक्रियेमंळे वाळवंटातील खडकास छिद्रे पडतात. ही छिद्र रूंद होऊन वातखिडकी निर्मिती होते.
१०) हमादा
पृष्‍ठ भागावरील रेती वाहून जाऊन उघड्या पडलेल्‍या खडकाळ पृष्‍ठभागास हमादा असे म्‍हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा