🔹हसन रूहानी पुन्हा ईराणच्या राष्ट्रपतीपदी
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत
घवघवीत यश मिळाल्याने हसन रूहानी यांची पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदी निवड करण्यात
आली आहे, अशी माहिती स्टेट टेलिव्हिजनने दिली.
हसन रूहानी यांनी २०१३ मध्ये निवडणूक जिंकून पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाची धुरा
सांभाळली होती. ४ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा निवडून आले आहेत.
ईराणचे इतर देशांशी संबंध दृढ
करण्यासाठी हसन रूहानी यांनी प्रयत्न केले आहेत. रूहानी यांच्या कार्यकाळातच
अमेरिका आणि ईराण यांच्यादरम्यानचा परमाणू करार करण्यात आला. दोन्ही देशांतील
संबंध मैत्रीपूर्ण करण्यासाठी हा करार खूप महत्वपूर्ण मानला जातो.
मतमोजणीच्या सुरूवातीलाच रूहानी
हे २८ लाख माताधिक्याने पुढे होते. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४ कोटी लोकांनी मतदानाचा अधिकार
बजावला. हसन रूहानी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याने ईराणची
अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. तसेच जगासोबतचे ईराणचे संबंध सुधारण्यास मदत
होईल असे बोलले जात आहे.
🔹शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णींचा जागतिक सन्मान
खगोलशास्त्र विषयातील अमूल्य
योगदानाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड
पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्रीनिवास कुलकर्णी हे
कॅलिफॉर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अॅस्ट्रोफिजिक्स अँड प्लॅनेटरी
सायन्स या विषयाचे प्राध्यापक आहेत. पालोमर ट्रान्झिएन्ट फॅक्टरीची स्थापना आणि
संचालनाच्या कामासाठी श्रीनिवास कुलकर्णी ओळखले जातात. आकाशात होणाऱ्या क्षणिक
घटनांची माहिती विस्ताराने मिळावी, या
उद्देशानं त्यांनी केलेलं सर्वेक्षण जगभरात वाखाणलं गेलंय.
दरवर्षी, 'भूत, वर्तमान आणि भविष्य' या विभागांत तीन डॅन डेव्हिड पुरस्कार दिले जातात. १० लाख डॉलर्सचा हा
पुरस्कार मोठा जागतिक सन्मान मानला जातो. इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठात या
संस्थेचं मुख्यालय आहे. कुककर्णी यांच्याआधी अमिताव घोष, संगीतकार
जुबिन मेहता आणि भारतरत्न सीएनआर राव यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
येत्या २१ मे रोजी माजी विजेत्यांच्या उपस्थितीत श्रीनिवास कुलकर्णी यांना हा
पुरस्कार प्रदान केला जाईल.
🔹धान्ये, दूध जीएसटीमुक्त!
गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स
(जीएसटी) परिषदेच्या श्रीनगर येथे सुरू असणाऱ्या बैठकीत सुमारे ८० ते ९० टक्के
वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या करदराविषयी एकमत झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण
जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या व दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीचा
गुरुवारी पहिला दिवस होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १२११ वस्तूंवरील
करनिश्चिती करण्यात आली आहे. धान्य आणि दुधाला जीएसटी कक्षेच्या बाहेर ठेवण्यात
आले आहे. या शिवाय अन्नधान्यावर सर्वांत कमी दराने कर आकारण्यालाही संमती देण्यात
आली आहे. येत्या एक जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
बैठकीनंतर जेटली यांनी
माध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीत प्रत्येक विभागातील वस्तूच्या
दराविषयी चर्चा करण्यात आली. गरज भासल्यास वस्तू आणि सेवा यांच्यावर नेमका किती कर
आकारावा या बाबत पुन्हा चर्चा करण्यात येईल, असेही
जेटली यांनी नमूद केले. मूल्यवर्धित कर विवरणपत्र (व्हॅट रिटर्न) आणि एका कराकडून
दुसऱ्या कराकडे रुपांतरीत होणे (ट्रान्झिशन रूल्स) सोडून अन्य सात नियमांवर सहमती
झाली आहे. कायदेविषयक समितीने या दोन नियमांवर चर्चामसलत करण्यासाठी आणखी थोडा वेळ
मागितल्याचेही जेटली यांनी नमूद केले.
अरुण जेटली उवाच
- जीएसटीमुळे महागाईवर कोणताही फरक
पडणार नाही
- ८१ टक्के वस्तू १८ टक्के आणि
त्यापेक्षा कमी कराच्या मर्यादेत
- चहा, कॉफी,
साखरेवर पाच टक्के कर लागणार
- १७ टक्के पदार्थ १२ टक्के कराच्या
मर्यादेत
- दरांवर सहमती न झाल्यास बैठका सुरूच
राहणार
चार करमर्यादांत विभागणी
जीएसटी कौन्सिलच्या दोन
दिवसांच्या बैठकीत वस्तू आणि सेवांचे ५, १२,
१८ आणि २८ टक्क्यांच्या करमर्यादेत विभागणी करण्यात येईल. मंजूर
होणारे दर एक जुलैपासून अंमलात येतील.
कमॉडिटीज, सेवांवर करनिश्चिती
- या बैठकीदरम्यान मिठापासून लक्झरी
कार, फोन कॉलिंगपर्यंतच्या सेवांवरील जीएसटी दराचा निर्णय
होईल. कौन्सिलची ही बैठक श्रीनगरमधील शेर-ए-कश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन
सेंटरमध्ये होत आहे.
- २९ राज्ये आणि तीन केंद्रशासित
प्रदेशांचे अर्थमंत्री, जीएसटी कौन्सिलचे अंदाजे १५० सदस्य
आणि सर्व राज्यांचे वित्त सचिव सहभागी झाले आहेत.
🔹‘गोल्ड’न बॉय!.. तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये भारताला सुवर्णपदक
शांघाय येथे सुरू असलेल्या
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरुष संघाने ‘गोल्ड’न कामगिरी केली
आहे. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग
या त्रिकुटानं जबरदस्त कामगिरी करत अंतिम लढतीत कोलंबियाच्या संघाला पराभूत केले.
चुरशीच्या झालेल्या या लढतीत भारताने कोलंबियाला २२६-२२१ अशा गुणफरकाने नमवले.
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या
पुरुष गटाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ आणि कोलंबिया संघात चुरस पाहायला मिळाली.
सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी बहारदार कामगिरी केली. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग या त्रिकुटाने अखेरच्या
क्षणी जबरदस्त कामगिरी केली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अखेर भारताने विजय
मिळवला. कोलंबियाचा २२६-२२६ अशा गुणफरकाने पराभव केला. भारतीय पुरुष संघाने
उपांत्यफेरीत अमेरिकेला २३२-२३० अशा गुणफरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला
होता. दुसरीकडे मिश्र दुहेरीच्या उपांत्यफेरीत अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा
वेन्नम या जोडीचा कोरियाने १५२-१५८ अशा गुणफरकाने पराभव केला होता. आता
कांस्यपदकासाठी ही जोडी अमेरिकेशी भिडणार आहे.
🔹विमानाप्रमाणे अत्याधुनिक सुविधा असलेली ‘तेजस’ रेल्वे २२ मेपासून ट्रॅकवर
मोठ्या प्रतिक्षेनंतर आता
भारतीय रेल्वेची नवीन ट्रेन तेजस धावण्यासाठी तयार झाली आहे. या रेल्वेचा प्रवास
२२ मे रोजी सुरू होणार आहे. पहिली रेल्वे मुंबई आणि गोवा या मार्गावरून धावणार
आहे. अनेक नवी वैशिष्ट्ये आणि सुविधायुक्त असलेल्या या रेल्वेचे तिकीट दरही
राजधानी आणि शताब्दीपेक्षा जास्त आहेत. विमानातील सोयीसुविधा या रेल्वेत पुरवण्यात
आल्या आहेत. प्रत्येक आसनामागे एलसीडी स्क्रीन, स्मार्ट
स्वच्छतागृह, वायफाय आदी सुविधा या रेल्वेत प्रवाशांना
मिळणार आहेत.
अत्याधुनिक सुविधांनीयुक्त
असलेल्या या रेल्वेची पाहणी शुक्रवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. या रेल्वेत
अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येणार असल्यामुळे याचे तिकीट दर जास्त असल्याचे ते
म्हणाले. तिकीट दराबाबत मात्र त्यांनी जास्त माहिती दिली नाही. तर रेल्वे
अधिकाऱ्यांनी या रेल्वेच्या तिकीट दराबाबत अभ्यास केला जात असून लवकरच त्याची
घोषणा केली जाईल, असे सांगितले.
नावाप्रमाणेच ही रेल्वे सुमारे
२०० किमी इतक्या वेगाने धावू शकते. परंतु, भारतीय
रेल्वे रूळ इतका वेग सहन करू शकत नसल्यामुळे ती कमाल १३० किमी इतक्या वेगाने धावू
शकेल. रेल्वे रूळांत योग्य बदल केल्यास २०० किमी वेगाने रेल्वे धावू शकते.
भारतातील ही पहिलीच अशी रेल्वे
आहे की, जिचे दरवाजे मेट्रो सारखे स्लायडिंग
पद्धतीचे असतील. याचे नियंत्रण गार्डकडे असेल. त्यामुळे प्रवाशांसाठी ही अत्यंत
सुरक्षित पद्धत ठरेल. यामुळे रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशाला चढता येणार नाही व
रेल्वे थांबल्याशिवाय उतरता येणार नाही. अशा प्रकारच्या दरवाजांमुळे रेल्वेतून
चढताना व उतरताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल.
एलसीडी आणि वायफाय
या रेल्वेचे खास वैशिष्ट्य
म्हणजे विमानांप्रमाणे रेल्वेतील प्रत्येक आसनामागे एलसीडी स्क्रीन लावण्यात आलेली
आहे. यावर प्रवाशांना मनोरजंनाचे कार्यक्रम पाहता येतील. रेल्वेत वायफाय सुविधाही
असेल. इतकंच नव्हे तर विमानात गरजेवेळी बटन दाबताच जशा एअर होस्टेस येतात.
त्याचपद्धतीने रेल्वेत अटेंडेंटला बोलावण्यासाठी कॉल बेलची सुविधा देण्यात आली
आहे.
रेल्वेच्या स्वच्छतागृहात टचलेस
नळ आणि बायो व्हॅक्यूम यंत्रणा आहे. रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरांबरोबर पॅसेंजर
इन्फर्मेशन सिस्टिम लावण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशाला पुढील स्थानक कोणते आहे, याची माहिती समजेल. रेल्वेत एलईडी लायटिंगबरोबर डेस्टिनेशन
बोर्डही लावण्यात आले आहेत.
🔹‘गोल्ड’न बॉय!.. तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये भारताला सुवर्णपदक
‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस’ने 18 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालामध्ये गेल्या २५ वर्षांत
पहिल्यांदाच भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक शेजारील देशांपेक्षा कमी असल्याचं
समोर आलं आहे. बांगलादेश, भुतान, श्रीलंका,
चीन या देशांपेक्षा भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक खालावल्याचं
दिसून येत आहे.
१९९०-२०१५ दरम्यानच्या
कालावधीचा विचार करुन १९५ देशांच्या आरोग्य दराचा आढावा या अहवालात घेण्यात आला
आहे. या कालावधीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगतीपथावर असलेल्या भारत देशाला
आरोग्याच्या बाबतीतील ध्येय गाठता न आल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या
अहवालानुसार गेल्या २५ वर्षांमध्ये भारताच्या आरोग्य दरामध्ये १४.१ टक्क्यांनी वाढ
झाली आहे. १९९० मध्ये ३०.७ टक्क्यांवर असलेला आरोग्य निर्देशांक २०१५ मध्ये ४४.८
टक्क्यांवर पोहोचला होता. पण, इतर आशियाई
देशांचा आरोग्य सेवा निर्देशांक पाहता हे भारताची कामगिरी यथायथाच असल्याचं लक्षात
येत आहे.
‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस’च्या अहवालात
नमूद केल्यानुसार श्रीलंकेचा आरोग्यसेवा निर्देशांक ७२.८%, बांग्लादेशचा
५१.७%, भुतानचा ५२.७% आणि नेपाळचा ५०.८% टक्के इतका आहे.
हृदयरोगाशी निगडीत विकारांवरील उपायांमध्ये भारत २५ व्या स्थानी आहे. तर, क्षयरोगाच्या उपचारांच्या बाबतीत भारत २६ व्या स्थानी आहे. मूत्रपिंडाशी
निगडीत विकारांवरील उपायांच्या बाबतीत भारत २० व्या स्थानी आहे. यासोबतच इतरही
विकारांवरील उपचारांच्या यादीतील भारताचं स्थान समोर आलं आहे. त्यात मधुमेह (३८ वं
स्थान), अल्सरचे विकार (३९ वं स्थान) या विकारांवरील उपचार
सेवा निर्देशांकाचाही समावेश आहे.
मुख्य म्हणजे पाकिस्तान आणि
अफगाणिस्तान ही दोनच राष्ट्र आरोग्य सेवा निर्देशांकाच्या बाबतीत भारताच्या मागे
आहेत. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस’च्या अहवालानुसार भारताचं स्थान इतक्या मागे येणं ही
चिंताजनक बाब आहे. यातून बऱ्याच मुद्द्यांवर विचार करण्याची गरज असण्याचा मुद्दाही
प्रकर्षाने समोर येत आहे.
🔹इंटरनेट होणार हायस्पीड; इस्रो करणार १८
महिन्यांत ३ उपग्रहांचं प्रक्षेपण
देशातील इंटरनेट सेवा अधिक
वेगवान करण्यासाठी इस्रोकडून तीन उपग्रह सोडले जाणार आहेत. जीसॅट-१९, जीसॅट-११ आणि जीसॅट-२० या तीन उपग्रहांचे प्रक्षेपण पुढील १८
महिन्यांमध्ये इस्रोकडून करण्यात येणार आहे. या तीन उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे
टीव्ही आणि स्मार्टफोन क्षेत्रात मोठे बदल घडणार आहेत. विशेष म्हणजे इस्रोकडून
सोडल्या जाणाऱ्या उपग्रहांचा वापर स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील संपर्क यंत्रणेसाठी
केला जाणार आहे.
‘जीसॅट-१९ चे प्रक्षेपण जूनमध्ये
करण्यात येणार आहे. जीसॅट-१९ उपग्रह दूरसंचार यंत्रणेतील सक्षमीकरणात महत्त्वाची
भूमिका बजावणार आहे. यामुळे देशातील दूरसंचार व्यवस्था अधिक वेगवान होईल,’ अशी माहिती अहमदाबादमधील स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे (एसएसी) तपन मिश्रा
यांनी दिली. ‘संपर्क क्षेत्रात व्हॉईस आणि व्हिडीओमुळे झालेला बदल सगळेच अनुभवत
आहेत. मात्र येत्या काळात तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून वायरलेस तंत्रज्ञानाने
टीव्ही पाहू शकता. इस्रोकडून करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणामुळे
भविष्यात हे सर्व शक्य होणार आहे,’ असेदेखील मिश्रा यांनी
म्हटले आहे.
येत्या १८ महिन्यांमध्ये
इस्रोकडून ३ उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठे
बदल होणार आहेत. इस्रोकडून करण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे दूरसंचार
क्षेत्रात क्रांती घडणार आहे. दूरसंचार क्षेत्रासाठी उपग्रहांचे प्रक्षेपण केले
जात असल्याने इंटरनेट सेवा वेगवान आणि स्वस्त होणार आहे. ‘जीसॅटमुळे इंटरनेटचा
सध्याचा वेग १ गिगाबाईट प्रति सेकंद इतका आहे. जीसॅट-१९ मुळे हा वेग ४ गिगाबाईट
प्रति सेकंद इतका होईल. म्हणजे जीसॅट-१९ या उपग्रहाची क्षमता सध्याच्या
उपग्रहाच्या तुलनेत चारपटीने अधिक असेल,’ अशी
माहिती अहमदाबादमधील स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरच्या तपन मिश्रा यांनी दिली आहे.
‘जीसॅट-११ इस्रोचा सर्वाधिक वजनदार
उपग्रह असणार आहे. जानेवारी २०१८ मध्ये इस्रोकडून जीसॅट-११ चे प्रक्षेपण करण्यात
येणार आहे. यामुळे इंटरनेटचा वेग १४ गिगाबाईट प्रति सेकंदावर जाऊन पोहोचणार आहे.
तर जीसॅट-२० चे प्रक्षेपण पुढील वर्षाच्या अखेरीस प्रक्षेपित करण्यात येईल. या
उपग्रहाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील इंटरनेटचे जाळे अधिकाधिक घट्ट करण्यात
येणार आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग थेट ७० गिगाबाईट प्रति सेकंदावर जाईल. यामुळे
स्मार्ट सिटीतील दूरसंचार यंत्रणा अधिक मजबूत होईल,’.
🔹केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन
सच्चे पर्यावरणवादी, नदी संवर्धक, लेखक-पत्रकार, वैमानिक, सामाजिक कार्यकत्रे, अभ्यासू
व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे केंद्रीय वने
व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल माधव दवे (वय ६०) यांचे गुरुवारी
सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने झोपेत निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार मध्य
प्रदेशातील बांद्राभान येथील नर्मदेच्या तटावर आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता
अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मंत्रिमंडळातील आपल्या
सहकाऱ्याच्या धक्कादायक निधनानंतर आदरांजलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बठक बोलावली आणि त्यांच्या कर्तृत्वाची महती
सांगणारा विशेष ठरावही संमत केला. तसेच शोक प्रगट करण्यासाठी देशभरातील सरकारी
कार्यालयांवरील राष्ट्रध्वजही अध्र्यावर आणण्यात आले. दरम्यान, वने व पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय
विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविला. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले दवे अविवाहित होते. त्यांच्यामागे इंदूरस्थित
अभय दवे हे बंधू आहेत.
दररोज दोन वेळा न चुकता
योगसाधना करणारे दवे प्रकृतीबाबत अत्यंत दक्ष मानले जायचे. मितआहार, नियमित योगाभ्यास आणि शिस्तशीर आयुष्य यांच्यासाठी ओळखल्या
जाणाऱ्या दवे यांना जानेवारीमध्ये न्यूमोनिया झाला होता. तेव्हापासून त्यांची
प्रकृती विलक्षणरीत्या ढासळली होती. मंत्रालयात फिरकणे जवळपास बंद झाले होते.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे मनुष्यबळ
विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना पर्यावरण मंत्रालयाची धुरा संसदेत सांभाळावी
लागली होती. एप्रिलपासून त्यांची प्रकृती जरा सुधारली. ते मंत्रालयात येऊ लागले.
अगदी बुधवारी दिवसभर ते बठकांमध्ये व्यस्त होते. जनुकीय अभियांत्रिकी पद्धतीच्या
(जीएम) वाणांच्या व्यावसायिक लागवडीच्या परवानगीविरोधात काढलेल्या मोच्र्याला ते
सामोरे गेले. आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. सायंकाळी ते मोदींनाही भेटले होते.
बहुधा चर्चा ’जीएम’ मोहरीच्यासंदर्भात असावी. गुरुवारी सकाळी ते कोईमतूरला जाणार
होते. पण आदल्या रात्री त्यांना एकाएकी अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांना पाचारण
करण्यात आले. भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार,
झोपेमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सकाळी अखिल भारतीय
आयुर्वज्ञिान संस्थेमध्ये (एम्स) नेईपर्यंत त्यांची जीवनज्योत मावळली होती.
६ जुल १९५६ मध्ये उज्जनजवळील
बारनगर येथे जन्मलेल्या दवेंचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. महाविद्यालयीन जीवनात
ते विद्यार्थी नेते होते, नंतर संघप्रचारक बनले. नर्मदा नदी
त्यांची जीव की प्राण. अगदी आताही न्यूमोनियाने ग्रस्त असताना ते नर्मदा अभियानात
सहभागी झाले होते. ’चरैवेती चरैवेती’ आणि ’जन अभियान परिषद’ अशा दोन नियतकालिकांचे
ते संपादन करायचे. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ते वैमानिक झाले होते. २००३ मधील
उमा भारतींच्या मध्य प्रदेशातील विजयात त्यांचा मोठा वाटा होता. २००९ मध्ये ते
प्रथम राज्यसभा खासदार झाले. २०१५ मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले. मागील
वर्षीच ते वने व पर्यावरण मंत्री झाले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या जवळ असलेले
दवे हे मोदींच्याही तितकेच निकटचे. मध्यंतरी शिवराजसिंह चौहानांना हटविण्याची
चर्चा जोरात असताना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी दवेंच्या नावाची सर्वाधिक
चर्चा होती.
‘नको स्मारक, नको
छायाचित्रे शक्य झाल्यास झाडे लावा..’
२३ जुल २०१२ रोजीच दवेंनी
केलेल्या इच्छापत्रातून त्यांच्यातील सच्चा पर्यावरणवादी आणि अवडंबर
माजविण्यापासून स्वतला दूर ठेवणारा राजकारणी दिसतो. एकीकडे राजकारण्यांमध्ये
स्मारकांसाठी चढाओढ असताना दवेंनी स्पष्टपणे आपले स्मारक कदापि न उभारण्याची इच्छा
व्यक्त केली. ’माझ्या नावाने स्मारक नको, पुरस्कार
नको. माझी छाय़ाचित्रेही नकोत. जर माझ्यासाठी काहीतरी करायचे असेल तर झाडे लावा आणि
त्यांना जगवा. मला खूप आनंद होईल. त्याशिवाय नदी संवर्धनाचेही काम करता येऊ शकेल.
पण हे ही करताना माझे नाव कोठेही नको,’ असे सांगणारया दवेंनी
स्वतचे अंत्यसंस्कार होशंगाबाद जिल्ह्णाातील बांद्राभानमधील नदी महोत्सव होत
असलेल्या नर्मदेच्या तटावर वैदिक पद्धतीने आणि अन्य कोणतेही अवडंबर न करता
करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
🔹शिक्षण, आरोग्य सेवा ‘जीएसटी’मुक्तच
अन्नधान्य तसेच नित्य वापराच्या
वस्तुंवरील करांचा भार हलका करणाऱ्या गुरुवारी घेतल्या गेलेल्या निर्णयानंतर, वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने शिक्षण व आरोग्य सेवा
करमुक्त करतानाच, उपाहारगृहांमधील खान-पान सेवा मात्र महाग
केली आहे. राज्यांचे प्रतिनिधित्व असलेल्या या परिषदेची दोन दिवसांची बैठक
शुक्रवारी श्रीनगर येथे रस्ते, रेल्वे, विमान प्रवासावरील करांचा जाच हलका करीत संपुष्टात आली. मोबाइलची देयके
तसेच विम्याच्या हप्त्यासाठी ग्राहकांच्या खिशावर मात्र सरकारने डल्ला मारला आहे.
सध्याचा १५ टक्के सेवा कर काही
क्षेत्रांसाठी थेट २८ टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवताना हॉटेलमधील वास्तव्य, सिनेगृहातील मनोरंजनासाठी ग्राहकाना करापोटी जादा पैसे मोजावे
लागतील, अशी तजवीज नव्या करप्रणालीने केली आहे. शिक्षण,
आरोग्य क्षेत्र सेवा कराच्या जाळ्याबाहेर ठेवताना सरकारने वाहने,
तंबाखूजन्य पदार्थ त्यावर सर्वाधिक २८ टक्के वस्तू करासह वाढीव
अधिभाराचीही तरतूद केली आहे.
शुक्रवारी जाहीर झालेल्या सेवा
करांच्या मात्रेने वाढत्या महागाईला आमंत्रण दिल्याचे दिसत आहे. वस्तूंप्रमाणेच
सेवेकरिताही ५, १२, १८ व २८
असे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. अनेक सेवा सध्याच्या १५ टक्क्यांवरून
वाढीव १८ ते २८ टक्के गटात अंतर्भूत केल्या गेल्या आहेत.
सेवा कराचा सध्याचा १५ टक्के दर
१८ टक्क्यांवर नेऊन ठेवतानाच दूरसंचार, वित्तीय
सेवा, आदरातिथ्य सेवा कमालीच्या महाग करण्यात आल्या आहेत. खान-पान
महाग करतानाच वाहतूक गटाचा कर किमान अशा पाचच्या घरात आणून ठेवीत रेल्वे, हवाई मार्गाने होणारा प्रवास स्वस्त करण्यात आला आहे.
विविध वस्तू व सेवांवरील कर
टप्पे निश्चित करणाऱ्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या १४ व्या बैठकीचा समारोप
शुक्रवारी श्रीनगर येथे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली
झाला. यानंतर विविध सेवांचे कर स्तर जाहीर करण्यात आले. यामुळे महागाई वाढण्याची
शक्यता सरकारतर्फे फेटाळून लावण्यात आली आहे.
रस्ते, रेल्वे, विमान प्रवास स्वस्त
किमान पाच टक्के कर टप्प्यात
रस्ते, रेल्वेसह हवाई प्रवासी वाहतुकीचा
समावेश आहे. परिणामी या माध्यमाद्वारे केला जाणारा प्रवास आता स्वस्त होणार आहे.
बिगर-वातानुकूलित रेल्वे प्रवास करातून मुक्त करण्यात आला आहे. तर वातानुकूलित
रेल्वे प्रवासाकरिता पाच टक्के कर असेल. तसेच खासगी टॅक्सीमार्फत सध्या आकारला जाणारा
सहा टक्के कर दर आता कमी होणार आहे. मेट्रो, मोनो, लोकल तसेच हज यात्रेसारख्या धार्मिक स्थळांकरिता केलेला रेल्वे प्रवासही
करमुक्त असेल. इकॉनॉमी दर्जाच्या विमान प्रवासाकरिता पाच टक्के तर बिझनेस
वर्गासाठीचा हवाई प्रवासासाठी १२ टक्के कर लागू होईल.
सिनेमा पाहणे महागणार
मनोरंजन कराचा समावेश सेवा
करामध्ये करण्यात आला असून या गटाकरिता तो तब्बल २८ टक्के असेल. असे असले तरी
चित्रपटाच्या तिकिटांवर स्थानिक कर लावण्याचा अधिकार राज्यांना असेल. लॉटरीवर
कोणताही कर लागू नसेल.
हॉटेलात खाणे- पिणे महागडे
आदरातिथ्य सेवा या कर
टप्प्याच्या विविध गटात ठेवण्यात आल्या आहेत. बिगर-वातानुकूलित रेस्तराँमधील
खान-पानावर केलेल्या खर्चावर १२ टक्के कर लागू होईल. तर वातानुकूलित आणि मद्य
परवावे असलेल्या हॉटेलमधील बिलावर १८ टक्के कर असेल. पंचतारांकित हॉटेलमध्ये २८
टक्क्यांपर्यंत शुल्क लागू होईल. सर्वात कमी पाच टक्के कर हा ५० लाख रुपयांपेक्षा
कमी उलाढाल असलेल्या हॉटेलमधील सेवेसाठी असेल.
खान-पान तसेच निवासव्यवस्था
असलेल्या हॉटेलमार्फत दिवसाला १,००० रुपये भाडे
आकारले जात असेल तर त्यांना कर लावला जाणार नाही. मात्र त्यावरील ते २,००० रुपयांपर्यंत प्रति दिन भाडय़ावर १२ टक्के तसेच २,५०० ते ५,००० रुपये दिवसाच्या भाडय़ासाठी १८ टक्के कर
असेल. यावरील भाडे रकमेवर सर्वाधिक २८ टक्के कर लागू होईल. या क्षेत्रासाठी १२,
१८ व २८ टक्के कर गट करण्यात आले आहे.
विमा हप्त्यांवर वाढीव कर भार
दूरसंचार, वित्तीय सेवा या तिसऱ्या टप्प्यातील १८ टक्के कर गटात
समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे मोबाइल तसेच विमा आदी वित्तीय उत्पादनांसाठी
ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
अनेक वस्तू व सेवा या दोन
दिवसांच्या बैठकीत विविध कर टप्प्यात निश्चित करण्याबाबत सहमती मिळाली आहे.
कराच्या जाळ्यात येणाऱ्या सर्वाधिक वस्तू व सेवा या किमान कर स्तरामध्ये समाविष्ट
आहेत. नव्या वस्तू व सेवा कर रचनेमुळे महागाई वाढेल ही भीती निर्थक आहे. उलट
शिक्षण, आरोग्यसेवांना करमुक्त करण्यात आले
आहे.
🔹पूर्णिमादेवी बर्मन आणि संजय गुब्बी याना ग्रीन ऑस्कर पुरस्कार
पर्यावरण क्षेत्रात दर वर्षी
ब्रिटनमधील ‘दी व्हिटले फंड फॉर नेचर’ या संस्थेच्या वतीने पुरस्कार दिले जातात, त्यांना ग्रीन ऑस्कर म्हटले जाते. यंदा हा पुरस्कार दोघा
भारतीयांना मिळाला आहे त्यात एक आहेत आसामच्या पक्षी संवर्धन कार्यकर्त्यां
पूर्णिमादेवी बर्मन तर दुसरे आहेत. कर्नाटकचे वन्यजीव संवर्धन कार्यकर्ते संजय
गुब्बी. एकूण ६६ देशांतील पर्यावरण कार्यकर्त्यांतून त्यांची निवड करण्यात आली
आहे.
पूर्णिमा या हार्गिला म्हणजे
ग्रेटर अॅडज्युटंट स्टॉर्क या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. त्यांनी
आसामात कामरूप जिल्ह्य़ातील दादरा, पंचारिया,
हिंगिमारी खेडय़ांमध्ये या पक्ष्यांसाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे
त्या भागात बर्मन यांना स्टॉर्क सिस्टर म्हणजे स्थानिक भाषेत हार्गिला बैदू म्हणून
ओळखले जाते. ३५ हजार पौंडांचा हा व्हिटले पुरस्कार पर्यावरण प्रकल्पास मदतीच्या
रूपात दिला जातो. विशेष म्हणजे बर्मन यांची सगळी संस्था महिलांची आहे.
आसाममधील पाणथळ जागेत आढळणारे
हार्गिला पक्षी निसर्गाचे स्वच्छता दूत असतात. वयाच्या ३७ व्या वर्षी बर्मन यांनी
पक्षी संवर्धनाचे उभे केलेले काम निश्चितच प्रशंसनीय आहे. सध्या हार्गिला स्टॉर्क
(चित्रबलाक) पक्ष्यांची जगातील संख्या १२०० असून त्यातील ७५ टक्के आसाममध्ये आहेत.
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेच्या मते या पक्ष्यांची संख्या १२०० ते १८००
असून त्यातील ८०० आसामात तर १५६ बिहारमध्ये आहेत. या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी
बर्मन यांनी २००९ पासून ‘अरण्यक’ ही संस्था चालवली असून त्यात फक्त महिलाच काम
करतात. आसामी महिलांनी स्कार्फ व साडय़ा विणून त्यांची विक्री केली व त्या निधीतून
या संस्थेसाठी पैसा उभा केला आहे. हा पुरस्कार म्हणजे जीवनात मोठा बदल घडवणारी
घटना असल्याचे पूर्णिमा सांगतात. आता त्या पुरस्काराचा निधी या पक्ष्यांच्या
संवर्धनासाठी वापरणार आहेत. बर्मन यांनी कामरूप जिल्ह्य़ात पीएच.डी. करीत असताना
पक्षी संवर्धनाचे काम हाती घेतले. पूर्णिमा यांनी वाडय़ा वस्त्यांमध्ये जाऊन
स्थानिक लोकांमध्ये या पक्ष्यांच्या संवर्धनाचा संदेश पोहोचवला आहे. त्यासाठी
त्यांनी पोस्टर्स, बॅनर्स या मार्गाचा वापर केला. हा पक्षी
म्हणजेच तुमची संपत्ती आहे त्याला वाचवणे हे तुमचे कर्तव्य आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे व तो तेथील लोकांमध्ये रुजला आहे. यापूर्वी
बर्मन यांना रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा अर्थ हिरो पुरस्कार मिळाला होता.
कर्नाटकातील वन्यजीव संरक्षक
कार्यकर्ते संजय गुब्बी यांनी वाघांचा वावर असलेल्या मार्गिकांचे संरक्षण केले.
त्यासाठी त्यांना व्हिटले पुरस्कार मिळाला आहे. गुब्बी यांनी निसर्ग व
वन्यजीवांसाठी विद्युत अभियंत्याच्या नोकरीवर पाणी सोडले. २०१२ मध्ये त्यांनी
कर्नाटक सरकारच्या मदतीने व्याघ्र संवर्धनाचे क्षेत्र वाढवले. वन्यजीव व माणूस
यांचे परस्पर संबंध सौहार्दाचे असले पाहिजेत त्यामुळेच वाघांबरोबर स्थानिक लोकांचे
रक्षणही ते कर्तव्य मानतात. कर्नाटकात सध्या सर्वाधिक बंगाल टायगर्स आहेत व २०१५
मध्ये ही संख्या १० ते १५ होती. पुढील काही वर्षांत ती १०० पर्यंत नेण्याचा
त्यांचा विचार आहे. व्याघ्र अधिवास क्षेत्रातील जंगलतोड कमी करण्यासाठी ते
प्रयत्नशील आहेत. कारण वाघांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षित अधिवास मिळाला
पाहिजे. गुब्बी यांनी नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन या म्हैसुरू येथील संस्थेच्या
माध्यमातून वन्यप्राणी संवर्धनाचे काम केले असून १९७० पासून वन्य प्राण्यांच्या
सुरक्षित अधिवासाचे क्षेत्र ३७ टक्के वाढवले आहे. त्यांनी कँटरबरी येथील केन्ट
विद्यापीठातून मास्टर्स इन कन्झर्वेटिव्ह बायॉलॉजी ही पदवी घेतली असून नंतर या
विषयातील त्यांचे सगळे ज्ञान वन्यजीवांच्या संवर्धनासाठी वापरले आहे. त्यात
त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेऊन काम केले आहे हे विशेष.
🔹अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन
हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप निर्माण
करणाऱया सशक्त अभिनेत्री रिमा लागू यांचे 18 मे 2017 रोजी पहाटे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने
निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. बुधवारी मध्यरात्री
साडेबारा वाजता रिमा लागू यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोकिलाबेन अंबानी
रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची
प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी अभिनेत्री मृण्मयी लागू आणि जावई विनय
वायकुळ असा परिवार आहे.
कोकिलाबेन रुग्णालयातून त्यांचे
पार्थिव गुरुवारी सकाळी अकरा वाजता अंधेरी येथील शास्त्राrनगरमधील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर
दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात
आले. बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यांनी ‘नामकरण’ या मालिकेसाठी चित्रीकरण केले.
महेश भट या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. हीच त्यांची शेवटची व्यक्तिरेखा ठरली.
अभिनयाच्या विविध छटा सक्षमपणे
मोठय़ा पडद्यावर साकारणाऱया रिमा लागू यांचा जन्म 25 फेब्रुवारी
1958 साली पुण्यात झाला. रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे नाव
नयन भडभडे होते. बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.
बेबी नयन या नावाने त्यांनी हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला
अशा अनेक चित्रपटातून बालकलाकार म्हणून भूमिका करून आपल्या हरहुन्नरी अभिनयामुळे
प्रसिद्ध होत्या. चित्रपटसफष्टीत एक अभिनेत्री म्हणून पदार्पण करत असतानाच त्यांनी
नाटय़ अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्या रिमा लागू या नावाने
ओळखल्या जाऊ लागल्या. परंतु, त्यांचा हा विवाह जास्त काळ
टिकला नाही. मुलगी मफण्मयीच्या जन्मानंतर त्या विवेक लागू यांच्यापासून वेगळय़ा
झाल्या. परंतु, त्या रिमा लागू याच नावाने परिचित होत्या.
शेवटी शेवटी मात्र त्यांनी आपल्याला फक्त रिमा म्हणवून घेणेच पसंत केले होते.
🔹विदेशी गुंतवणूक विक्रमी पातळीवर
देशात विदेशी गुंतवणुकीचा ओघ
कायम असून 2016-17 या आर्थिक वर्षात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारच्या विविध योजनांमुळे विदेशी गुंतवणूक 43.48
अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. 2015-16 मध्ये 40 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक आकर्षित
करण्यात यश आले होते. सरकारकडून देशाच्या विकासासाठी योग्य ती पावले उचलण्यात
आल्याने विदेशी गुंतवणुकीत वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर विदेशी
गुंतवणुकीसाठी आकर्षित करणारी भारतीय अर्थव्यवस्था ठरली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाकडून म्हणण्यात आले. उत्पन्नातून पूनर्गुंतवणूक
करण्याचा आकडा आता विक्रमी 60.08 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे,
गेल्या वर्षी तो 55.6 अब्ज डॉलर्स होता.
गेल्या तीन वर्षात 21 क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यास यश
आले आहे. बांधकाम क्षेत्र, प्रसारण, रिटेल
ट्रेडिंग, हवाई वाहतूक, विमा आणि
निवृत्ती वेतन यासारख्या क्षेत्रात बदल करण्यात आल्याने गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.
🔹न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रायोजकपदी ‘अमुल’
अमुल या सहकारी क्षेत्रातील
दुग्ध उत्पादक कंपनीने आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिरातीत पुन्हा एकदा मजल मारली
आहे. भारतातील या ख्यातनाम डेअरीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड
क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. अमुलने यापूर्वी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड
कप, फॉर्म्युला वन, लंडन ऑलिम्पिक 2012, रिओ ऑलिम्पिक 2016 बरोबर अगोदरच भागीदारी केली होती.
आशियातील सर्वात मोठा दुग्धजन्य
पदार्थांचा ब्रॅन्ड असणाऱया अमुलने इंग्लडमध्ये 1 जुनपासून
सुरू होणाऱया स्पर्धेसाठी न्यूझीलंडचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. 27 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱया अमुलची न्यूझीलंडच्या
क्रिकेटपटूंची जर्सी, सरावाच्या किट्सवर आणि क्रिकेट संघ
थांबणार असेल त्याठिकाणी जाहिरात करण्यात येणार आहे.
न्यूझीलंडच्या क्रिकेट
संघाबरोबर जोडले गेल्याचे आम्हाला अभिमान आहे आणि अमुलच्या संघांमध्ये न्यूझीलंड
क्रिकेटपटूंचे आम्ही स्वागत करतो. भक्कम कृषी आणि सामुदायिक डेअरी संस्कृतीची
पार्श्वभूमी असणाऱया आपल्या ब्रॅन्डसाठी न्यूझीलंडचा संघ परिपूर्ण असून आपली
गुणवत्ता आणि मूल्यांचे प्रतिनिधीत्त्व करतो, असे
अमुलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी म्हटले.
अमुल ब्रॅन्डची नवीन जर्सी घालत
न्यूझीलंडचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाबरोबर 28 मे रोजी सराव सामना, 30 मे रोजी श्रीलंकेबरोबर आणि 2
जूनला ऑस्टेलियाबरोबर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळेल.
🔹विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक
येथे सुरु असलेल्या विश्वचषक
तिरंदाजी स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरुष संघाने गोल्डन कामगिरी केली आहे.
अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर व अमनजीत सिंग या
त्रिकुटाने जबरदस्त कामगिरी करताना अंतिम लढतीत कोलंबियाच्या संघाला पराभूत केले.
अंत्यत चुरशीच्या झालेल्या या लढतीत भारताने कोलंबियाला 226-221 अशा फरकाने पराभूत केले. विशेष म्हणजे, रिओ
ऑलिम्पिकनंतर प्रथमच भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली
आहे.
या स्पर्धेत चौथ्या मानांकित
व्हिएतनाम, विश्व चॅम्पियन इराण व अग्रमानाकित
अमेरिकन संघाला विशेष कामगिरी करता आली नाही. शनिवारी झालेल्या या स्पर्धेच्या
अंतिम लढतीत भारत व कोलंबिया यांच्यात चांगलीच चुरस पहायला मिळाली. प्रारंभापासून
दोन्ही संघाना बहारदार खेळ केला. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू
श्रीधर व अमनजीत सिंग या त्रिकुटाने अखेरच्या क्षणी जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक
खेचून आणले. शेवटच्या क्षणांपर्यंत चुरस पहायला मिळालेल्या या सामन्यात भारताने
कोलंबियाला 226-221 अशा फरकाने पराभूत केले. भारतीय पुरुष
संघाने उपांत्य फेरीत अग्रमानांकित अमेरिकेला 232-230 अशा
गुणफरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
दुसरीकडे मिश्र दुहेरीच्या
उपांत्य फेरीत अभिषेक वर्मा व ज्योती सुरेखा या जोडीला कोरियन जोडीने 152-158 अशा फरकाने पराभूत केले. आता कांस्यपदकासाठी या जोडीची
लढत अमेरिकेशी होईल. दरम्यान, रिओ ऑलिम्पिकनंतर प्रथमच
सहभागी झालेल्या अतानु दास व दीपिका यांनी रिकर्व्ह प्रकारात निराशा केली. अटानूला
डच पदार्पणवीर स्टीव्ह व्हिल्जेरविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत तर दीपिकाला जपानच्या
हायाकावा रेनविरुद्ध शेवटच्या आठमधील लढतीत पराभव स्वीकारावे लागले.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹'कॅटलिस्ट ट्रस्टीशिप'ला 'बेस्ट ट्रस्टी'चा पुरस्कार
'इंडियन सिक्युरिटायझेशन फाउंडेशन'तर्फे दिल्या जाणाऱ्या इंडियन सिक्युरिटायझेशन अवॉर्डच्या पहिल्याच
पुरस्काराचे मानकरी म्हणून कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लि. (पूर्वीचे नाव जीडीए
ट्रस्टीशिप लि.) यांची निवड झाली आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिपला 'द बेस्ट ट्रस्टी ऑफ द इयर 2017' या पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले आहे.
इंडियन सिक्युरिटायझेशन
फाउंडेशन ही स्वायत्त संस्था असून, तिचा
उद्देश भारतीय आर्थिक क्षेत्रात 'सिक्युरिटायझेशन' ही संकल्पना जोपासणे आणि वृद्धिंगत करणे हा आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिपने
केवळ चौथ्या वर्षातच हा पुरस्कार मिळविला आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लि. ही 'सेबी'कडे डिबेंचर ट्रस्टी म्हणून नोंद असलेली
देशातील खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी आहे.
🔹'जेम्स बाँड' स्टार सर रॉजर मूर यांचे
निधन
माजी 'जेम्स बॉंड' स्टार सर रॉजर मूर यांचे
कर्करोगाने स्विर्त्झलंड येथे 22 मे रोजी निधन झाले. ते 89
वर्षांचे होते, अशी माहिती त्यांच्या
कुटुंबियांनी दिली.
मूर यांच्या कुटुंबियांनी
ट्विटरवरून सर रॉजर मूर यांच्या निधनाची माहिती दिली. सर रॉजर मूर यांचे आज निधन
झाले असून, आम्ही उद्धवस्त झालो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. हॉलिवूडमध्ये जेम्स बाँड मालिकेतील सात
चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. यामुळे जेम्स बाँड म्हणून त्यांची
ओळख झाली होती.
🔹'जीएसटी'चा राज्यातील मार्ग मोकळा
राज्यात एक जुलैपासून
अंमलबजावणी
मुंबई - कर रचना व राज्याची
अर्थव्यवस्था यामध्ये नवीन पद्धती लागू करत "एक देश, एक कर' असे धोरण असलेला ऐतिहासिक
"जीएसटी' कायदा आज विधिमंडळात मंजूर झाला. यामुळे एक
जुलैपासून राज्यात "जीएसटी' अंमलबजावणीचा मार्ग मोकळा
झाला आहे.
केंद्र सरकारने घटना दुरुस्तीने
"जीएसटी'चे विधेयक मंजूर केले असल्याने
प्रत्येक राज्याला हा कायदा मंजूर करणे बंधनकारक होते. महाराष्ट्रात स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या स्वायत्ततेचा पेच निर्माण झाला होता. शिवसेनेचा या विधेयकाला
सुरवातीला विरोध होता. जकात रद्द होणार असल्याने मुंबई महापालिकेचा 7000 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. पण सर्वच महापालिकांना पुढील पाच वर्षे
केंद्राकडून नुकसान भरपाई दिली जाणार असल्याने शिवसेनेनेही जीएसटीचे समर्थन केले.
महापालिकांना नुकसान भरपाईचे
सूत्र
- जकात, एल.बी.टी.चे
2016-17 चे उत्पन्न गृहीत धरून नुकसान भरपाईची रक्कम ठरवणार
- प्रत्येक वर्षी या रकमेवर 8 टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ दिली जाईल
- नुकसान भरपाई प्रत्येक महिन्याच्या
पाच तारखेपर्यंत अग्रीम स्वरूपात देणार
रद्द होणारे काही कर
राज्याचा ऊस खरेदी कर, केंद्रीय विक्रीकर, वाहनावरील प्रवेशकर,
वस्तूवरील प्रवेशकर, बेटिंग कर, लॉटरी कर, वन उत्पन्न कर, तसेच
जकात व एलबीटी.
जीएसटीची ठळक वैशिष्ट्ये
- या करप्रणालीत करावर कराची आकारणी
होणार नाही, त्यामुळे वस्तू स्वस्त होतील
- केंद्र आणि राज्य सरकारचे बहुतांश
अप्रत्यक्ष कर या करप्रणालीत विलीन झाल्याने करप्रणाली सोपी आणि सुटसुटीत
- व्यापारी व उद्योगधंद्यांना हिशेब
ठेवणे सोपे होणार
- केंद्र आणि राज्याचे एकूण 17 कर विलीन होतील
- मद्य, कच्चे
तेल, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू, विमानाचे इंधन यांचा "जीएसटी'त अंतर्भाव नाही
🔹स्टायरोफोमइतकी घनता असलेल्या ग्रहाचा शोध
पृथ्वीपासून ३२० प्रकाशवर्षे अंतरावर
असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या मोठय़ा ग्रहाचा शोध वैज्ञानिकांनी लावला असून
त्याची घनचा स्टायरोफोमइतकी आहे. हा ग्रह फुगलेला असून त्याचा फायदा जीवसृष्टी
असणाऱ्या ग्रहांचा अंदाज घेण्यासाठी करता येणार आहे, त्यासाठी
तेथील वातावरणाच्या चाचण्या घ्याव्या लागतील. हा ग्रह फुगलेला असून त्याचे
वस्तुमान गुरूच्या एक पंचमांश आहे पण तो ४० टक्के मोठा आहे. त्याचे वातावरण
विस्तृत आहे असे अमेरिकेतील लेहीग विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक जोशुआ पेप्पर
यांनी सांगितले.
स्टायरोफोम हे फुगवलेले
पॉलिस्टायरिन असते व ते अन्नाचे कंटेनर तयार करण्यासाठी वापरले जाते. या ग्रहाचा
मातृतारा चमकदार असून त्यामुळे या ग्रहाच्या वातावरणाचे मापन सहज शक्य आहे. इतर
ग्रहांच्या वातावरणाच्या मापनासाठी हा ग्रह म्हणजे एक सराव प्रयोगशाळा ठरणार आहे.
या ग्रहाचे नाव केइएलटी ११ बी असे असून तो ताऱ्याभोवतीच अगदी जवळच्या कक्षेतून
फिरत आहे. या कक्षेत फिरण्यास त्याला पाच दिवस लागतात. केइएलटी ११ हा तारा अणुइंधन
वापरत असून त्याचे रूपांतर लाल मोठय़ा ग्रहात होत आहे. त्यानंतर तो ग्रह ताऱ्याने
वेढला जाईल व पुढील शेकडो दशलक्ष वर्षांत तो तग धरू शकणार नाही.
केइएलटी म्हणजे किलोडिग्री लिटल
टेलिस्कोपच्या पाहणीत अॅरिझोना व दक्षिण आफ्रिका अशा दोन ठिकाणच्या दुर्बिणी
वापरण्यात आल्या आहेत. या दुर्बिणी ५० लाख ताऱ्यांची प्रकाशमानता मोजू शकतात.
प्रखर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह शोधण्यासाठी केइएलटी प्रकल्प राबवण्यात आला असून
केइएलटी ११ बी या ग्रहाचा शोध यात महत्त्वाचा आहे. केइएलटी ११ बी ग्रह फुगण्याचे
कारण अजून समजलेले नसले तरी त्यावर चर्चा सुरू आहे. ग्रहावरील रसायने व त्याची
वास्तव्ययोग्यता यावर या संशोधनातून मोठा प्रकाश पडणार आहे.
🔹शास्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर
भारतीय शास्त्रज्ञ, महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ
विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड
करण्यात आली. दहा लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असून तेल अवीव विद्यापीठातील
डॅन डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. कुलकर्णी
यांच्याअगोदर तीन भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात लेखक
अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ
सीएनआर राव यांचा समावेश आहे.
🔹सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर
वंचितांच्या न्यायासाठी
झटणाऱ्या राज्यभरातील सहा संस्थांना सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने
शाहू, फुले, आंबेडकर
पुरस्कार जाहीर केले आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या १२५ व्यक्तींना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज
उत्थान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले शिक्षण
प्रसारक मंडळ (रत्नागिरी), महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था
(पुणे), केशव स्मृती प्रतिष्ठान (जळगाव), शिवप्रभू बहुउद्देशीय क्रीडा शिक्षण सांस्कृतिक मंडळ (बुलडाणा), लॉर्ड बुद्धा मैत्रीय संघ (नागपूर) आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म
समाज संचालित डॉ. हेगडेवार रुग्णालय (गारखेडा, औरंगाबाद) अशा
सहा संस्थांची निवड समितीने शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कारांसाठी निवड केली आहे. १५ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन
या संस्थांना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक
न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
🔹१ जुलैला 'राज्य मतदार दिवस' साजरा होणार
राष्ट्रीय मतदार दिनाच्या
धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी 'राज्य
मतदार दिवस' साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भारत
निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस साजरा
करण्याचा प्रस्ताव होता.
भारत निवडणुक आयोगाकडून दरवर्षी
२५ जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर मतदार जागृतीसाठी
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
केंद्रिय निवडणुक आयोगाने
भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी या हेतूने मतदारांना जागृत करुन त्यांचा मतदान
प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतूने 'स्वीप'
हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे.
तथापि 'स्वीप' कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ 'राष्ट्रीय मतदार दिन' या पुरती मर्यादित राहु नये तर
मतदार जागृतीचे काम निरंतर सुरु राहावे या हेतून दरवर्षी राज्यस्तरावर 'राज्य मतदार दिवस' व प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा
मतदार दिवस साजरा करावा या असे निर्देश भारत निवडणुक आयोगाने दिले आहेत.
🔹अवकाश स्थानकात सापडलेल्या जीवाणूला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव
अमेरिकेच्या नासा या संस्थेने
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शोधून काढलेल्या एका नव्या जीवाणूला दिवंगत माजी
राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे.
आतापर्यंत हा जीवाणू हा फक्त आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच आढळला असून त्याचे
पृथ्वीवर अस्तित्व नाही.
सोलिबॅसिलस कलामी हा जीवाणू
पृथ्वीवर आढळलेला नाही, त्यामुळे तो बाहेरील ग्रहावरचा असावा
असे मानले जाते. हा जीवाणू अवकाश स्थानकातील प्रतिकूल स्थितीत टिकून आहे.
आंतरग्रहीय पातळीवर फिरणाऱ्या
एका अवकाशयानात म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात फिल्टरमध्ये हा जीवाणू
सापडला होता. त्याचे नाव सोलिबॅसिलस कलामी असे ठेवण्यात आले आहे. त्यात भारतीय
वैज्ञानिक कलाम यांच्या स्मृती जागत्या ठेवण्यात आल्या आहेत. सॉलिबॅसिलस हे
प्रजाती नाव असून हा स्पोअर निर्माण करणारा जीवाणू आहे.
कलाम यांनी केरळात थुंबा येथे
अग्निबाण प्रक्षेपण केंद्र सुरू करण्याच्या कामात सहभागी होण्याच्या आधी नासात
१९६३ मध्ये प्रशिक्षण घेतले होते.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे
फुटबॉलच्या मदानाच्या आकाराचे असून ते १९९८ मध्ये सोडण्यात आले. ते मानवनिर्मित
सर्वात मोठी वस्तू मानले जाते. त्याचे वजन ४१९ टन असून तेथे एका वेळी सहा अवकाशवीर
वास्तव्यास असतात. त्यासाठी १५० अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. आतापर्यंत २२७
अवकाशवीरांनी या अवकाशस्थानकात वास्तव्य केले असून त्यामुळे तेथे अस्वच्छताही
होते. तेथे पाणी व हवा यांचे फेरचक्रीकरण करून वापर केला जातो.
🔹देशभरात मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मंजूरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात "मातृत्व लाभ कार्यक्रम (Maternity Benefit Programme)" च्या अंमलबजावणीला
कार्योत्तर मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये
विस्तारित केला गेला आहे. १ जानेवारी २०१७ पासून देशातील सर्व जिल्ह्यात
"मातृत्व लाभ कार्यक्रम" विस्तारीत केला गेला आहे.
गरोदर व स्तनदा महिलांना रोख
प्रोत्साहन भत्ता देऊन महिलांचे या काळात होणारे वेतन नुकसानाची भरपाई करणे, जेणेकरून बाळाच्या जन्माआधी व जन्मानंतर पुरेशी विश्रांती घेऊ
शकता येणार.
शिवाय गर्भधारणा आणि स्तनपान
करवण्याच्या काळात तिला आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी मदत होण्यासाठी आणि
प्रसूतीनंतर बाळाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचे असलेले स्तनपान पहिल्या सहा
महिन्यात व्हावे यासाठी ही मदत दिली जात आहे.
रुपये ६००० (३०००+१५००+१५००) चे
रोख अनुदान पहिल्या दोन मुलांसाठी तीन हप्त्यांमध्ये देय केले जाते.थेट लाभ
हस्तांतरण (DBT) पद्धतीने आधार क्रमांक जोडलेल्या
वैयक्तिक बँक/ टपाल खात्यात रोख रक्कम जमा केली जाईल.
ही एक केंद्र शासन पुरस्कृत
योजना आहे. यामागील खर्च सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (विधीमंडळ सह) यासाठी
केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये ६०:४० याप्रमाणे वाटून घेतली जाईल, तर NER आणि हिमालयीन राज्यांसाठी ९०:१०
प्रमाणात आणि केंद्रशासित प्रदेश (विधीमंडळ नसलेले) यांच्यासाठी १००% या प्रमाणे
असणार आहे.
एकूण खर्च हा सन २०१६-१७ चा
शिल्लक कालावधी आणि सन २०१७-१८ पासून ते सन २०१९-२० पर्यंत १२६६१ कोटी रुपये इतका
होणे अपेक्षित आहे. एकूण खर्चापैकी भारत सरकारचा वाटा शिल्लक सन हा ७९३२ कोटी
रुपये होणे अपेक्षित आहे.
बाळांना योग्य स्तनपान आणि
महिलांना प्रसुतीच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी महिला व बाल
विकास मंत्रालयाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 4(b) च्या उपबंधानुसार "मातृत्व लाभ कार्यक्रम"
नावाने गरोदर व स्तनदा मातांसाठी योजना तयार केलेली आहे.
🔹मुंबई इंडियन्स आयपीएलच्या १० व्या पर्वाचे विजेते
आयपीएलच्या अंतिम लढतीत अखेर
मुंबईकर पुण्याला भारी पडले. माफक धावसंख्येचा बचाव करताना गोलंदाजी केलेल्या भेदक
माऱ्याच्या जोरावर मुंबईने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत पुण्याच्या
संघाला एका रणाने पराभूत केले. तसेच या विजयाबरोबर मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये ३
विजेतेपद पटकाविणारा संघ ठरला.
मुंबईने विजयासाठी २० षटकात ८
बाद १२९ धावांवर रोखले. आणि पुण्याला एका धावेने पराभूत केले.
▪️यापूर्वीचे आयपीएल
विजेते संघ
२०१७ मुबई × पुणे
२०१६ - हैद्राबाद × बंगलोर
२०१५ - मुंबई × चेन्नई
२०१४ - कोलकाता × पंजाब
२०१३ - मुबई × चेन्नई
२०१२ - कोलकाता × चेन्नई
२०११ - चेन्नई × बंगलोर
२०१० - चेन्नई × मुंबई
२००९ - डेक्कन × बंगलोर
२००८ - राजस्थान × चेन्नई
🔹रेल्वेची सौरउर्जेला पसंती
रेल्वे मंत्रालयाने पारंपरिक विजेसाठी सौरउर्जेचा पर्याय निवडत त्याच्या वापरासाठी
प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेच्या अवाढव्य विस्तारात अनेक विभागांमध्ये
सौरउर्जेच्या वापरावर भर देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहेत. त्याचाच भाग म्हणून
सोमवारी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलेल्या विविध सुविधांच्या उद्घाटनात
सौरउर्जेच्या प्रकल्पांचाही समावेश होता. त्यात सीएसएमटी येथील मध्य रेल्वेच्या
मुख्यालयातील अनेकविध कार्यालयांमध्ये सौरउर्जेच्या वापरास सुरुवात करण्यात आली
आहे. त्यातून रेल्वेची वर्षाला लाखो रुपयांची बचत होणार आहे.
सीएसएमटीच्या अॅनेक्स इमारतीत
निरनिराळ्या विभागात प्रतिदिन ६४० युनिट्स इतक्या सौरउर्जेचा वापर केला जाणार आहे.
इथल्या विभागाच्या छतांवर सार्वजिनक उपक्रम असणाऱ्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्सच्या
सहाय्याने सौरउर्जेचे पॅनेल्स बसविण्यात आले आहे. या पॅनेल्सची क्षमता सुमारे १००
किलोवॅट इतकी आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ८४ लाख रुपये असून
त्यातून पारंपरिक उर्जेचा विचार
करता वार्षिक १७ लाख रुपयांची बचत होण्याचा दावा करण्यात येत आहे. पारंपरिक
विजेसाठी प्रती युनिट १० ते १२ रुपये इतका खर्च येतो. त्याऐवजी सौरउर्जेसाठी
करण्यात आलेला खर्च ४ ते ५ वर्षांत वसूल होईल, असेही
स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेनेही चर्चगेट
स्थानकावर सौरउर्जेचे पॅनेल बसवून १०० किलोवॅट इतकी उर्जा तयार केली जात आहे. काही
महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेल्या या यंत्रणेसाठी सुमारे वार्षिक १ लाख १२ हजार
रुपयांची बचत होणार आहे.
🔹अपारंपरिक ऊर्जेसाठी मोठी गुंतवणूक
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील
गुंतवणुकीत भारताने अमेरिकेला पिछाडीवर टाकून दुसरा क्रमांक मिळवला आहे. या
क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे चीनने पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.
ब्रिटनमधील ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे.
अहवाल काय म्हणतो?
- अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील वार्षिक
क्रमवारीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने अमेरिकेला मागे टाकून दुसरे स्थान
पटकावले आहे. गेल्या वर्षी अमेरिका पहिल्या स्थानावर होता.
- अहवालानुसार २०१५नंतर प्रथमच अमेरिका
४० देशांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
- गेल्या वर्षी ‘रिन्युएबल एनर्जी
कंट्री अॅट्रॅक्टिव्हनेस इंडेक्स’ अर्थात ‘आरईसीएआय’मध्ये भारत तिसऱ्या स्थानी
होता.
सरकारी पाठिंबा कारणीभूत
‘अर्न्स्ट अँड यंग’च्या अहवालानुसार
भारतात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला केंद्र सरकारने चांगलाच पाठिंबा देऊ केला आहे.
त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राची उत्पादन क्षमता २०२२पर्यंत वाढवून १,७५,००० मेगावॉटपर्यंत नेण्याचे धोरण आखण्यात आले
आहे.
उत्पादनात मोठी वाढ
अहवालानुसार देशातील सौरऊर्जा
क्षेत्रातील उत्पादन क्षमतेत वाढ होत आहे. २०१४मध्ये सौरउर्जेचे उत्पादन २६००
मेगावॉट होते. गेल्या तीन वर्षांमध्ये त्यामध्ये १०,०००
मेगावॉटची भर पडली आहे. या शिवाय पवनऊर्जा क्षेत्रात २०१६-१७मध्ये ५,४०० मेगावॉट विजेची निर्मिती करण्यात आली. आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात १२,५०० मेगावॉटची भर पडली. तर,
परंपरागत स्त्रोतांच्या माध्यमातून १०,२००
मेगावॉट ऊर्जेची निर्मिती झाली.
किमतीत घसरण
- देशात सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या
उत्पादनांच्या किमती सातत्याने घटत आहेत. मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्पांची
उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे उपकरणांची किंमत घटत आहे. देशातील औष्मिक ऊर्जा
केंद्रांद्वारे निर्मित उर्जेच्या तुलनेत सौरउर्जेद्वारा निर्मिती ऊर्जा अतिशय
स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.
🔹रोजगारांत भारत राहणार अव्वल
प्रोजेक्ट मॅनेजमेंट
इन्स्टिट्यूटने (पीएमआय) तयार केलेल्या नव्या अँडरसन इकॉनॉमिक ग्रुप (एईजी)
अहवालानुसार पुढच्या दशकात जगभरातील रोजगारनिर्मितीवर व्यवस्थापन क्षेत्राचे
वर्चस्व राहाणार असून भारतात चांगल्या वेतनाच्या लाखो नोकऱ्यांची निर्मिती होईल.
पीएमआयच्या सोमवारी प्रसिद्ध
झालेल्या ‘प्रकल्प व्यवस्थापन रोजगार विकास आणि गुणवत्तेचा अभाव २०१७- २०१७’
अहवालानुसार २०२७ पर्यंत भारत प्रकल्प व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराच्या बाबतीत
सर्वाधिक वेगाने विकसित होणारा देश म्हणून उदयास येणार आहे.
अहवालानुसार, प्रकल्प व्यवस्थापनाशी संबंधित व्यवसाय विस्ताराच्या
उंबरठ्यालवर असतील व त्यात उत्पादन व बांधकाम, माहिती सेवा,
तंत्रज्ञान आणि प्रकाशन तसेच वित्त, विमा अशा
महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असेल. फक्त भारतात पुढच्या दशकभरात प्रकल्पांशी
संबंधित क्षेत्रांत ७० लाख प्रकल्प व्यवस्थापन नोकऱ्यांची निर्मिती होईल. हा दर
अहवालासाठी अभ्यासण्यात आलेल्या ११ देशांच्या तुलनेत सर्वाधिक (४८ टक्के) आहे.
त्याशिवाय, २०२७ पर्यंत भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा
सर्वाधिक प्रकल्प व्यवस्थापनाशी संबंधित रोजगार (२१८ लाख) तयार होईल, तर पहिल्या क्रमांकावर चीनमधील रोजगारनिर्मिती (४६० लाख) असेल.
🔹रेमंड-खादी एकत्र
वस्त्रोद्योगातील बडी कंपनी
असलेल्या रेमंडने खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनसमवेत (केव्हीआयसी) करार करून
खादीची वस्त्रप्रावरणे बाजारात आणली आहेत. यायोगे खादीचा प्रसार रेमंड जागतिक
स्तरावर करणार आहे. केव्हीआयसीने खादीचे वितरण, विपणन
व प्रसार करण्याची रेमंडला अनुमती दिली आहे. अशा प्रकारे खासगी-सरकारी भागीदारीतून
खादीचा प्रसार करण्याची पद्धत केव्हीआयसी राबवणार आहे.
🔹कोचीत देशातील सर्वात मोठं सोलार कार पार्किग
देशातील सर्वात मोठं सोलार कार
पार्किग कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ येथं उभारण्यात आलं आहे. या भव्य अशा पार्किग
जागेत एकाच वेळी तब्बल १४०० गाड्या पार्क होऊ शकतात. तर या सोलार कार पार्किंग
जागेची इन्स्टॉलेशन कॅपेसिटी २.७ मेगावॉट पीक आहे.
जवळ जवळ सव्वा दोन लाख चौरस
फुटात पसरलेल्या या पार्किग जागेत ८ हजार ५०० सौर पॅनल लावण्यात आले आहेत . या
ठिकाणी गाडी पार्क करायची असल्यास एका तासासाठी ६० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
तर १० मिनीटांच्या कार पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
🔹लठ्ठपणामुळे जगात सर्वाधिक मृत्यू
अत्याधिक वजनाची समस्या : उच्च
रक्तदाब, कोलेस्ट्रॉलपेक्षाही धोकादायक
जागतिक आरोग्य संघटनेच्या
अहवालात धूम्रपानाला जगात होणाऱया सर्वाधिक मृत्यूंचे कारण ठरविण्यात आले होते.
परंतु न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनात लठ्ठपणाला जगात
होणाऱया सर्वाधिक मृत्यूंसाठी जबाबदार मानण्यात आले आहे. संशोधकांनी 2014 मध्ये जमा केलेल्या आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास केला. या
अभ्यासात लठ्ठपणामुळे हृदयसंबंधित आजार आणि बेन हॅमरेज होण्याची शक्यता वाढत
असल्याचे आढळले. सध्याच्या स्थितीत लठ्ठपणाला धूम्रपानापेक्षाही अधिक धोकादायक
म्हणता येईल असे तज्ञांचे मानणे आहे.
▪️47 टक्के घटते
आर्युमान
अत्याधिक वजनाचा शिकार ठरणाऱया
व्यक्तीचे जीवन धूम्रपान करणाऱया व्यक्तीच्या तुलनेत 47 टक्के घटते. मधूमेह, तंबाखू सेवन,
उच्च रक्तदाब आणि अत्याधिक कोलेस्ट्रॉलपेक्षा अधिक घातक असणारी ही
एकमात्र समस्या आहे.
▪️मोहिमांना चांगले
यश
15 वर्षांपूर्वी तंबाखू अशा
मृत्यूंसाठी जबाबदार असायचा, जे रोखले जाऊ शकत होते. परंतु
अलिकडच्या काही काळात चालविण्यात आलेल्या तंबाखू विरोधी मोहिमांचे चांगले परिणाम
समोर आले आहेत. यामुळे लोकांमध्ये जागरुकता वाढली असून धूम्रपानामुळे होणाऱया
मत्=यूंमध्ये घट झाली आहे.
▪️11 प्रकारच्या
कर्करोगांचा धोका
लठ्ठपणामुळे कोणत्याही
व्यक्तीला टाइप टू मधूमेह, 11 प्रकारचे कर्करोग, बेन हॅमरेज आणि हृदयसंबंधित आजारांचा धोका वाढतो असे मुख्य संशोधक ग्लेन
टकस्लेर यांनी सांगितले.
▪️ब्रिटनमध्ये
लठ्ठपणाची समस्या
लठ्ठपणावर आळा घालून एकटय़ा
ब्रिटनमध्ये कर्करोगाच्या 25 हजार प्रकरणांना टाळता आले असते असे
जागतिक कर्करोग संशोधन निधीचे म्हणणे आहे. 2015 मध्ये
हृदयसंबंधित आजार सर्वाधिक मृत्यूंसाठी जबाबदार ठरला होता. यानंतर मेंदूचा आजार
सर्वात मोठे कारण होते, ज्यामुळे जगात दीड कोटी लोकांचा
मृत्यू होत होता. हृदयविकार आणि पक्षाघातामुळे जगात होणाऱया मृत्यूंची दोन प्रमुख
कारणे धूम्रपान आणि लठ्ठपणा ही आहेत.
▪️भारतात देखील विळखा
25 कोटी मुले भारतात सध्या लठ्ठपणाने
त्रस्त. 2025 पर्यंत लठ्ठपणात दुसरे स्थान असेल.
8 कोटी लोक देशात लठ्ठपणाचे शिकार.
अडीच कोटी लोक अत्याधिक लठ्ठपणाने त्रस्त.
2014 च्या आकडेवारीनुसार भारतात 98
लाख पुरुष, 2 कोटी महिला लठ्ठपणाने ग्रस्त.
5 व्या स्थानी पुरुषांच्या
प्रमाणाप्रकरणी तर महिलांप्रकरणी तिसऱया स्थानावर आहे भारत.
🔹भारतात मिळणार अतिजलद इंटरनेट सेवा
इस्रोच्या नव्या उपग्रहांद्वारे
वाढणार सेवेचा वेग
मागील वर्षी अमेरिकेला मागे
टाकत भारत चीन मागोमाग जगाचा दुसरा सर्वात मोठा इंटरनेट वापरणार देश ठरला होता, परंतु इंटरनेट वेगाप्रकरणी भारत अजूनही अनेक आशियाई देशांमागे
खूप मागे आहे. पुढील 18 महिन्यांमध्ये ही स्थिती बदलण्याची
तयारी सुरू आहे. 3 नवे दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करून
इस्रो देशाला अतिजलद इंटरनेटच्या जगात प्रवेश मिळवून देण्याची योजना आखत आहे.
इस्रो 3 दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करणार असून जूनमध्ये जीसॅट-19,
त्यानंतर जीसॅट-11 आणि नंतर जीसॅट-20 हे उपग्रह अंतराळात पाठविले जातील. जीसॅट-19 उपग्रह
भारताच्या नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकलद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे. यात
क्रायोजेनिक इंजिन बसविण्यात आले असून 4 टन वजनापर्यंतच्या
उपग्रहाला जियोसिंक्रोनस ट्रान्सफर कक्षेत स्थापित करण्याची क्षमता त्याच्यात आहे.
हा उपग्रह मल्टीपल स्पॉट बीम (एका विशेषप्रकारच्या हायफ्रीक्वेंसीवर काम करू
शकणारा ट्रान्सपाँडर) चा वापर करेल, यामुळे इंटरनेट वेग आणि
संपर्कव्यवस्था जलद होऊ शकेल. मल्टीपल बीमद्वारे पूर्ण देशाला व्यापले जाईल अशी
माहिती इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी दिली.
एकप्रकारे स्पॉट बीम (उपग्रहावर
लावण्यात आलेल्या हायगेन अँटेनाद्वारे सिग्नल पाठवितो) एक उपग्रह सिग्नल आहे, जो पृथ्वीच्या एका मर्यादित क्षेत्रालाच व्यापू शकतो. 3
उपग्रहांद्वारे बीम (सिग्नल) छोटय़ा क्षेत्रांमध्ये अनेकवेळा टाकला
जाईल. तर सिंगल बीम एकाचवेण एका मोठय़ा क्षेत्रात टाकला जातो. यामुळे याचा सिग्नल
अतिजलद इंटरनेट सुविधा देण्यास असमर्थ ठरते.
तिन्ही उपग्रह कार्यान्वित
झाल्यास अधिक गुणवत्तायुक्त इंटरनेट वेगासह फोन आणि व्हिडिओ सेवा उपलब्ध करविण्यास
देखील सक्षम होतील असे अहमदाबाद स्थित स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा
यांनी सांगितले.
🔹पेटीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु
मोबाईलचा वापर करून खरेदी
विनिमयाचे माध्यम पेटीएमने आपल्या पेमेंट्स बँकेची सुरुवात 23 मे 2017 पासून सुरू केली. ऑनलाईन
व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून ग्राहकाला अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स
ठेवण्याचीही आवश्यकता नसलेली ही भारतातील पहिली बँक आहे. पेटीएमच्या पेमेंट बँकेचे
डिझाईन देशात आर्थिक समावेशन साध्य करण्यात मदत करण्यासह अर्ध्या अब्ज भारतीयांना
अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या पेटीएमच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
कंपनीचे हेतू ग्राहकांना रोख व्यवहारांकडून डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टममध्ये
आणण्याचा आहे.
पेटीएम पेमेंट्स बँक खाते
सुरूवातीस केवळ-आमंत्रण तत्त्वावर उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यात, कंपनी आपल्या कर्मचा-यांसाठी आणि सहकारिंसाठी बीटा बँकिंग
ऍप्लकेशन तयार करेल. पेटीएम ग्राहक ऍप्लकेशनवर जाऊन आमंत्रणाकरिता विनंती करू
शकतात.
याबाबत पेटीएम पेमेंट्स बँकेचे
अध्यक्ष विजय शेखर शर्मा म्हणाले, आरबीआयने
आम्हाला जगात एक नवीन मॉडेल बनविण्याची संधी दिली आहे. ग्राहकांचे पैसे सरकारी
बाँडमध्ये सुरक्षित पद्धतीने राहणार आहेत आणि देशाच्या प्रगतीसाठी हे अतिशय
फायद्याचे ठरणार आहे. या ठेवींना सुरक्षेचा कोणताही धोका नसेल.’
पेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी रेणू सत्ती यांनी सांगितले की, ’आम्ही
पेटीएम पेमेंट बँक दाखल करताना अतिशय आनंदित आहोत आणि बँक सुविधेरहित
ग्राहकांकरिता आर्थिक सेवा घेऊन आलो आहोत. आमची महत्वाकांक्षा भारतातील सर्वात
विश्वसनीय आणि ग्राहक-अनुकूल बँक बनण्याची आहे. तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर
करीत आम्हाला 2020 पर्यंत 50 कोटी
भारतीयांची आवडीची बँक बनायचे आहे.’
कॅशबॅक मिळवा…
पेटीएम बँकेत निधी ठेवल्यास 4 टक्के व्याज देण्यात येईल. याचप्रमाणे बँक खात्यात 35 हजारापर्यंत रक्कम जमा केल्यास 250 रुपये कॅशबॅक
मिळेल. ऑनलाईन व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही.
🔹ला लिगा स्पर्धेत रोनाल्डोच्या माद्रिदला जेतेपद
5 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात, रोनाल्डो व करिम बेन्झेमाचे प्रत्येकी एक गोल
स्टार खेळाडू ख्रिस्तियानो
रोनाल्डो व करीम बेन्झेमा यांनी प्रत्येकी एक गोल केल्यानंतर रियल माद्रिदने
मॅलागाला 2-0 असे नमवत रविवारी ला लिगा
स्पर्धेच्या जेतेपदावर थाटात शिक्कामोर्तब केले. जेतेपदावर आपली मोहोर
उमटवण्यासाठी माद्रिदला फक्त एका गुणाची गरज होती. ती त्यांनी येथे वसूल केली.
माद्रिदसाठी हे 33 वे लीग जेतेपद ठरले आहे.
पोर्तुगालचा आक्रमक आघाडीवर
रोनाल्डोने अवघ्या दुसऱयाच मिनिटाला गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेत एकच खळबळ उडवून
दिली. त्यानंतर जवळपास पूर्ण सामन्यावर माद्रिदचे वर्चस्व राहिले. रोनाल्डोसाठी
हंगामातील हा 40 वा गोल ठरला. बेन्झेमाने दुसऱया
सत्रात 10 मिनिटांचा खेळ बाकी असताना संघाचा दुसरा गोल केला.
या विजयासह माद्रिदने 93 गुणांवर झेप घेत जेतेपद निश्चित
केले. या स्पर्धेत त्यांचा हा सलग सहावा विजय ठरला.
माद्रिदला एप्रिलमध्ये
बार्सिलोनाविरुद्ध 3-2 फरकाने स्वीकारावा लागला. त्यानंतर
त्यांनी विजयात सातत्य राखले आहे. गतवर्षातील जेत्या बार्सिलोना संघाने घरच्या
भूमीत खेळताना ऐबरला 4-2 अशा मोठय़ा फरकाने नमवले आणि 90
गुणांपर्यंत मजल मारली. स्पर्धेत ते दुसऱया स्थानी असतील, हे यावेळी निश्चित झाले. माद्रिदचे बॉस व माजी दिग्गज फुटबॉलपटू झिनेदिन
झिदान यांनी आपल्या व्यावसायिक जीवनातील हा सर्वात आनंदाचा क्षण असल्याची
प्रतिक्रिया दिली. अगदी ख्रिस्तियानो रोनाल्डोने देखील हा हंगाम आपल्यासाठी विशेष
फलदायी ठरला असल्याचे नमूद केले.
🔹चीन, जपानने सागरातून केले ‘ज्वालाग्राही
बर्फा’चे उत्खनन
चीन आणि जपानने खोल सागराच्या
तळातून ‘ज्वालाग्राही बर्फा’चे (कम्बस्टिबल आइस) यशस्वीपणे उत्खनन केल्याने
पृथ्वीतलावर गोठलेल्या स्वरूपात प्रचंड प्रमाणावर उपलब्ध असलेल्या या नव्या
जीवाश्म इंधनाचे (फॉसिल फ्यूल) व्यापारी उत्पादन करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल
टाकले गेले आहे.
सुमारे दोन दशकांच्या अथक
संशोधन व प्रयोगांनंतर दक्षिण चीन समुद्रातील शेनहू भागात १,२६६ मीटर खोल सागरतळातून ‘ज्वालाग्राही बर्फ’ विलग करून बाहेर
काढण्यात वैज्ञानिकांना यश आल्याचे वृत्त शिनहुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने
दिले.
गेल्या आठवडाभरात या ठिकाणाहून
१.२० लाख घनफूट ‘ज्वालाग्राही बर्फ’ बाहेर काढण्यात आले. चीनचे भूसंपदामंत्री
जिआंग दामिंग यांनी याबद्दल वैज्ञानिकांचे व तंत्रज्ञांचे अभिनंदन करताना ही घटना
जगात नव्या इंधन क्रांतीचा श्रीगणेशा करणारी ठरू असू शकेल, असे नमूद केले.
दोन आठवड्यांपूर्वी जपाननेही
शिमा द्विपकल्पाच्या किनाऱ्यावरील समुद्रातून अशाच प्रकारे ‘ज्वालाग्राही बर्फा’चे
यशस्वी उत्खनन केल्याचे जाहीर केले होते. अमेरिका आणि भरताचेही असे प्रयोग सुरू
आहेत; पण त्यांना यश आलेले नाही.
जपान व चीनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर
हे उत्खनन यशस्वी झाले असले तरी मोठ्या प्रमाणावर व्यापारी उत्पादन किमान २०३०
पर्यंत तरी शक्य होईल, असे तज्ज्ञांना वाटत नाही. याची
प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे यासाठी येणारा मोठा खर्च.
सध्याच्या तंत्रज्ञानानुसार खोल सागराच्या तळाशी ‘ज्वालाग्राही बर्फा’चे साठे विलग
करून पृष्ठभागावर आणण्यासाठी त्यात प्रचंड दाबाने पाणी किंवा कार्बन डायआॅक्साईड
पंपाने भरला जातो. हे खूप खर्चिक आहे. दुसरे कारण आहे सुरक्षेचे.
‘ज्वालाग्राही बर्फ’ म्हणजे बव्हंशी
गोठलेला मिथेन वायू असतो. काढताना व वाहतूक करताना त्याची हवेत गळती झाली तर ती
हवामान बदलास कारणीभूत ठेरणाऱ्या अन्य वायूंहून दसपटीने अधिक हानीकारक ठरू शकते.
या धोक्याचे शंभर टक्के निर्मूलन करून या इंधनाचे मोठ्या प्रमाणावर निर्धोक उत्खनन
करण्याचे तंत्र सध्या तरी उपलब्ध नाही.
‘ज्वालाग्राही बर्फा’ला वैज्ञानिक
परिभाषेत ‘मिथेन हायड्रेट’ असे म्हटले जाते. ते पाण्याचे आणि संपृक्त नैसर्गिक
वायूचे गोठलेले मिश्रण असते. त्यात मिथेनचे प्रमाण ९९.५ टक्के असते. ते गोठलेल्या
स्थितीतच पेट घेते. ‘मिथेन हायड्रेट’चे भूगर्भातील अस्तित्व सन १९६०च्या दशकापासून
वैज्ञानिकांना माहीत आहे. ते सागराच्या तळाशी आणि आर्क्टिक व अंटार्क्टिक
प्रदेशातील हिमस्तरांच्या खाली आढळते.
🔹डॉ. हर्षवर्धन यांनी पर्यावरण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला
केंद्रीय विज्ञान आणि
तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पर्यावरण, वने
आणि हवामानबदल मंत्रालयाचा आज पदभार स्वीकारला. पर्यावरण मंत्रालयाचा स्वतंत्र
कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री अनिल दवे यांचं निधन झाल्यामुळे या खात्याचा
कार्यभार डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
नद्या आणि पर्यावरण जतनासाठी
दवे यांनी दिलेल्या योगदानाचं हर्षवर्धन यांनी स्मरण केले. नद्या, वने आणि परिरक्षण संस्था यांच्या संरक्षणासाठी दवे यांनी
सच्चा पर्यावरणवादी म्हणून निष्ठेने मोठे कार्य केल्याचे हर्षवर्धन म्हणाले.
डॉ. हर्षवर्धन यांनी
महत्त्वाच्या विभागांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. पर्यावरण, वने आणि हवामानबदल यांच्यासंदर्भात काही तातडीचे आणि जटील
मुद्दे असून, त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी
व्यक्त केली.
🔹वर्ष 2016-17 या वर्षात अन्नधान्याचे विक्रमी
उत्पादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षात कृषी क्षेत्र आणि शेतकरी कल्याणासाठी केलेल्या
प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह
यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. केंद्रातल्या रालोआ
सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त कृषी मंत्रालयाच्या कामगिरीचा लेखाजोखा
त्यांनी सादर केला. या सरकारने शेतकरी हितासाठी उचललेल्या पावलांमुळे
शेतकऱ्यांच्या जीवनमानात गुणात्मक सुधारणा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
ठेवले आहे, ते साध्य करण्यासाठी कृषी मंत्रालय सातत्याने काम
करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मृदा आरोग्य पत्रिका, सिंचन सुविधांचा विस्तार, जैविक शेती,
राष्ट्रीय कृषी बाजार, मधमाशा पालन, याबरोबरच कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तारावर विशेष भर देण्यात आला असून,
डाळींबाबत स्वयंपूर्णता येण्यासाठी नव्या उपक्रमांची सुरुवात या तीन
वर्षात करण्यात आली आहे. सर्वात कमी हप्ता आणि विविध जोखीमांचा समावेश करुन
पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना अभूतपूर्व सुरक्षा कवच प्रदान करण्यात
आले.
2016-17 या वर्षात अन्नधान्य
उत्पादनाचे विक्रमी उत्पादन झाले असून, यावर्षी कृषी आणि
संबंधित क्षेत्रांचा विकास दर सुमारे 4.4 टक्के राहिला आहे. 2016-17
या वर्षात डाळींचे उत्पादन 22.40 दशलक्ष टन
अपेक्षित असून, आतापर्यंतचे हे विक्रमी उत्पादन असेल. 16
मे 2017 पर्यंत शेतकऱ्यांना 725 लाख मृदा आरोग्य पत्रिका, वितरित करण्यात आल्या आहेत,
येत्या तीन महिन्यात उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड
वितरित करण्यात येईल. राष्ट्रीय कृषी बाजाराशी 417 बाजार
जोडले गेले आहेत. 15 मे 2017 पर्यंत 20000
कोटी रुपयांचा 84 लाख टन कृषी उत्पादनाचा ‘ई
नाम’चा व्यवहार झाला आहे. 2014-17 याकाळात दुध उत्पादनात वाढ
होऊन ते 465.5 दशलक्ष टन झाले आहे. याच काळात मत्स्य
उत्पादनात वाढ झाली आहे. यासह कृषीविषयक इतर कामगिरीही त्यांनी विषद केली.
🔹राज्यराणी आता ‘तुतारी एक्सप्रेस’ या नावाने ओळखली जाणार
मराठीचे महान आधुनिक कवी
केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांना श्रद्धांजली म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू यांनी दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्सप्रेस (गाडी क्र. 11003/11004) या गाडीचे नामांतर करून आता ही गाडी तुतारी
एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणार असल्याचे घोषित केले. हे नाव केशवसुतांच्या
क्रांतिकारी कविता ‘तुतारी’वरुन देण्यात आले आहे.
नामांतर कार्यक्रम दादर येथील
कोहिनूर हॉलमध्ये दि. 22 मे 2017 रोजी
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून या कार्यक्रमापूर्वी
केशवसुतांच्या कवितांचे वाचन होणार आहे.
🔹एम. एस. स्वामीनाथन यांच्यावरच्या दोन भागातल्या पुस्तक मालिकेचे प्रकाशन
प्रसिद्ध कृषी वैज्ञानिक डॉक्टर
एम.एस. स्वामीनाथन यांच्यावरील दोन भागातल्या पुस्तक मालिकेचे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले. एम. एस. स्वामीनाथन : "द क्वेस्ट फॉर
वर्ल्ड विदाऊट हंगर", असे या पुस्तक मालिकेचे नाव आहे.
अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून
आपण काम करत असतांना प्रोफेसर स्वामीनाथन यांच्याशी सल्ला मसलत करून मृदा आरोग्य
पत्रिका उपक्रम कसा सुरू केला होता, याचे
स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले.
स्वामीनाथन यांच्या निष्ठेची
प्रशंसा करतांना ते केवळ कृषी वैज्ञानिक नव्हे, तर
किसान वैज्ञानिक अर्थात शेतकऱ्यांचे वैज्ञानिक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्वामीनाथन
यांच्या साधेपणाची त्यांनी प्रशंसा केली.
कृषी क्षेत्रातल्या सध्याच्या
आव्हानांविषयी बोलतांना, कृषी क्षेत्रातील यश भारताच्या पूर्व
भागापर्यंत पोहचण्याची तसेच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक मदत घेण्याची गरज
त्यांनी व्यक्त केली.
आधुनिक वैज्ञानिक पद्धत आणि
पारंपरिक कृषी ज्ञान यांची सांगड घातल्यास उत्तम परिणाम मिळू शकतात, यासंदर्भात त्यांनी काही राज्यांची उदाहरणे दिली. भारतातल्या
प्रत्येक जिल्ह्याला स्वतःची कृषी ओळख असायला हवी, असे
पंतप्रधान म्हणाले. यामुळे विपण प्रक्रियेला चालना मिळण्याबरोबरच औद्योगिक संकुलाच्या
धर्तीवर कृषी संकुल विकसित व्हायला मदत होईल.
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे
उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाबाबतीत बोलतांना,
यासाठी अनेक महत्वाच्या विभागात
नेमका दृष्टीकोन बाळगणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आधीच्या कृषी विमा
योजनांपेक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजनेला शेतकऱ्यांची जास्त पसंती लाभत
असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यामुळे शेतकऱ्यांची जोखीम घेण्याची क्षमता
वाढण्याबरोबरच संशोधन प्रयोगशाळेतून जमिनीपर्यंत पोहचवण्यासाठी मदत होईल.
डॉक्टर एम. एस. स्वामिनाथन
यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि त्यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली.
तंत्रज्ञान आणि जनधोरण यातील समन्वयाच्या महत्वावर त्यांनी भर दिला.
🔹दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेमध्ये गावांच्या विद्युतीकरणामध्ये पाचपट
वाढ
केंद्रीय ऊर्जा, कोळसा, नवीकरणीय ऊर्जा आणि खाण
राज्यमंत्री पियूष गोयल यांनी आज पं. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना या विषयी
माध्यमांना संबोधित केले. गोयल यांनी सांगितले की, देशातील
प्रत्येक राज्य हे ‘ऊर्जा- सर्व करारांसाठी’ या योजनेशी संलग्न असून या
योजनेंतर्गत, प्रत्येक राज्यांनी त्यांच्या प्रत्येक गावात 24X7
परवडणारी आणि दर्जात्मक ऊर्जा विद्युतीकरण प्रक्रियेला प्रोत्साहन
द्यायचे आहे.
मंत्र्यांनी आज 12 राज्यांच्या राजधानींमधून व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे विभागीय
माध्यमांशी संवाद साधला. आणि पं. दीनदयाळ ग्रामज्योती योजनेसंदर्भात प्रत्येक
राज्याने केलेल्या कामगिरीची माहिती दिली.
यावेळी गोयल यांनी जीएआरव्ही
अर्थात गर्व हा नवीन डॅशबोर्ड तसेच ग्रामीण विद्युतीकरणावरील एका पुस्तकाचे विमोचन
केले.
ग्रामीण विद्युतीकरणामधील
उत्कृष्ट प्रशासनचे परिणाम या संदर्भात बोलतांना गोयल म्हणाले की, कौशल्य, वेग, मापन
आणि सेवा या चार (4S-Skill, Speed, Scale & Service) एसचा
वापर , ग्रामीण विद्युतीकरण कार्यात करण्यात येत असून यामुळे
ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावेल यासाठी आम्ही कायद्यामध्ये बदल केला असून
खेड्यातील 10 टक्के कुटुंबाची गणना विद्युतीकरण प्रक्रिया
पूर्ण करण्यासाठी केली जायची ती आता प्रत्येक खेड्यातील प्रत्येक कुटुंबाला विजेची
तरतूद अशी ठरवण्यातआली असून यामुळे अंत्योदय या शब्दाचा अर्थ अधोरेखित झाला आहे.
यानुसार केंद्र सरकारने 20 नोव्हेंबर 2014 रोजी पं. दीनदयाळ
उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विजेचे खांब
उभे करणे, ऊर्जा वितरण आणि आतापर्यंत ज्या गावात वीज
पोहोचलीच नाही अशा गावांचे विद्युतीकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली.
आतापर्यंत 18,452 गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. त्यापैकी 15 मे 2017 पर्यंत रालोआ सरकारने 13, 469 गावांचे विद्युतीकरण पूर्ण केले. सन 2013-14 मध्ये 1,197
गावांचे विद्युतीकरण झाले होते. तर 2016-17 मध्ये
यापेक्षा पाच पट म्हणजे 6,015 गावांमध्ये वीज पोहोचली.
दारिद्रय रेषेखालील 9.62 लाख कुटुंबांना मोफत वीज जोडणी
देण्यात आली. तर 2016-17 मध्ये या योजनेचा 22.42 लाख कुटुंबांना लाभ झाला. विद्युतीकरणासाठी केंद्र सरकारने 2013-14
मध्ये 2938.52 कोटी रुपयांचा निधी राज्यांना
दिला. तर याचसाठी 2016-17 मध्ये 7965.87 कोटी रुपयांचा निधी राज्यांना वितरित करण्यात आला आहे.
2017-18 यावर्षात 40 लाख दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट निश्चित
करण्यात आले आहे. तसेच पुढच्यावर्षी 4814 कोटींचे अनुदान
विद्युतीकरणासाठी राज्यांना देण्यात येणार आहे.
▪️पार्श्वभूमी
पं. दीनदयाळ उपाध्याय
योजनेअंतर्गत सर्वांना वीज मिळावी यासाठी विविध उपाययोजना ऊर्जा मंत्रालयाने
केल्या आहेत. विद्युतीकरणाच्या कामाच्या प्रगतीकडे लक्ष देण्यासाठी ग्रामीण भागात 350 ग्राम विद्युत अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच
कामाची माहिती सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी एक मोबाईल ॲप सुरू करण्यात आले.
विद्युत वितरणात कमालीची
सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक
परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. कृषी क्षेत्राची उत्पादन क्षमता वाढली आहे. तसेच
आरोग्य, शिक्षण, दूरसंचार या
क्षेत्रातही प्रगती झाली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर वीज उपलब्ध झाल्यानं चोरी आणि
इतर गुन्हे कमी झाले आहेत.
🔹वस्तू आणि सेवा कर परिषदेची 14 वी बैठक
संपन्न
केंद्रीय वित्तमंत्री अरूण
जेटली यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेची 14 वी बैठक जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या श्रीनगर येथे काल
संपन्न झली. यामध्ये वस्तू आणि सेवाकरांचे दर आणि नुकसान भरपाई किती द्यावयाची
याविषयी निर्णय घेण्यात आला. वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांसाठी परिषदेने 5 टक्के, 12, 18 आणि 28 टक्के कर
निश्चिती यावेळी करण्यात आली. तसेच जीएसटी परिषदेने नुकसान भरपाई देण्याविषयी
विस्तृत चर्चा करून त्याची टक्केवारी या बैठकीत निश्चित करण्यात आली.
जीएसटी परिषदेच्या या बैठकीचा
तपशील तसेच यावेळी घेतलेले निर्णय केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क विभागाच्या
अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
संकेतस्थळ - http://www.cbec.gov.in/ .
🔹स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टरचे १० संच तयार करायला
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
भारताच्या स्थानिक अणुऊर्जा
कार्यक्रमाला गती देण्यासाठी आणि देशाच्या परमाणू उद्योगाला चालना देण्यासाठी,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर
रिऍक्टरचे १० संच तयार करायला मंजुरी दिली. त्यांची एकूण स्थापित क्षमता ७हजार
मेगावॅट इतकी असेल. या प्रकल्पामुळे अणुऊर्जा निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.
भारताची सध्याची स्थापित क्षमता
६७८० मेगावॅट इतकी आहे. सध्या निर्मिती सुरु असलेल्या प्रकल्पांमधून २०२१-२२
पर्यंत आणखी ६७०० मेगावॅट अणुऊर्जा उपलब्ध होईल. या क्षेत्रात 'मेक इन इंडिया'
उपक्रमांमधील हा महत्वपूर्ण
उपक्रम असेल.
शाश्वत विकास, ऊर्जेतील स्वयंपूर्णता आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी
जागतिक प्रयत्नांना गती देण्याच्या भारताच्या कटिबद्धतेला यामुळे मदत मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा