एकदा एका यशवंताला विचारले की, आपल्या यशाचे रहस्य काय? तेव्हा त्याने उत्तर दिले, 'जितके यशवंत, तितकी सूत्रे असतात' प्रत्येकात समान धागा म्हणजे सातत्य, जिद्द, चिकाटी आणि 'स्मार्ट वर्क'. तरी या स्पर्धेची काही सूत्रे या तिन्ही परीक्षांना लागू आहेत. आज त्यांचा आपण विचार करूया.
स्पर्धापरीक्षा द्यायची म्हणजे सुरुवात कशी करायची हा अनेकांना भेडसावणारा प्रश्न असतो. अनेक जण एका मोठा ठोकळा घेऊन भारंभार वाचयला सुरुवात करतात. असे न करता एकदा परीक्षा द्यायची ठरवली की, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम शब्दशः पाठ करा. याचा फायदा असा होतो की, आपण २४ तास अॅलर्ट असतो आणि एखादी महत्त्वाची घटना घडली की, त्याची नोंद ठेवू शकतो. तसेच पुस्तके खरेदी करतानाही त्याचा फायदा होतो. पीएसआय (PSI), एसटीआय (STI) आणि
एएसएसटी (ASST) या परीक्षांचा फायदा असा आहे की, अभ्यासक्रमाचा बराचसा भाग तिन्ही परीक्षांसाठी समान आहे. यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. यानंतर २०१३पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे (पूर्व आणि मुख्य) अवलोकन करावे. यावरून अभ्यासाची दिशा निश्चित होण्यास मदत होईल. सध्या विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपावर एक नजर टाकूया.