Post views: counter

After State Service Pre Exam...

  •  पूर्वपरीक्षेनंतरचा 'शून्य काळ'
                                   राज्य सेवा पूर्वपरीक्षा झाली. पेपर काहींना ठीक गेला असेल, काहींना अवघड, तर काहींना बऱ्यापकी चांगला. पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तरतालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. असे होणे स्वाभाविक असते. पूर्वपरीक्षेनंतरचा हा 'शून्य काळ' अंदाज बांधण्यात खर्ची पडतो. तज्ज्ञ असे सुचवतात की, पूर्वपरीक्षेसाठी झोकून अभ्यास केला असेल तर पुढच्या तयारीला सज्ज होण्यापूर्वी दोन दिवसांचा आराम या शून्य काळात जरूर करावा. उत्तरे चूक की बरोबर हे शोधण्यात वेळ घालवू नका, असे कितीदा लिहिले-वाचले आणि ते पटले तरीही आपण स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे; पण एकदा पेपर संपला की, आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण नक्की उत्तीर्ण होऊ असा काहींचा अंदाज असेल. काहींना आपण
अपयशी ठरू असं वाटत असेल तर काही द्विधा मन:स्थितीत, संभ्रमात असतील; पण या सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकच समान योजना असेल. सर्वानी आपण मुख्य परीक्षा देणार आहोत असे गृहीत धरून पुढील अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास सुरू करायला हवा.


                                   राज्य सेवेची मुख्य परीक्षा २४,२५,२६  सप्टेंबर २०१६ या तारखांना प्रस्तावित आहे. पूर्वपरीक्षेनंतर पाच महिन्यांचा अवधी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी मिळतो. खरे तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यामधील अवधी अभ्यासासाठी नसून मुख्य परीक्षा अभ्यासाच्या उजळणीसाठी असतो. पूर्वपरीक्षेपूर्वीच मुख्य परीक्षेचा अभ्यास संपलेला असणे अपेक्षित असते. म्हणूनच या पूर्वपरीक्षेच्या निकालाची अधिक चिंता न करता सर्व उमेदवारांनी अभ्यासाला लागायला हवे. मुख्य परीक्षेच्या अभ्यासाव्यतिरिक्त काही उमेदवारांना ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेची तयारी करायची असेल. काही उमेदवार विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेच्या तयारीत असतील. आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक लेखातील स्वतंत्र रकान्यात दिले आहे. या परीक्षांच्या तारखा पाहून अभ्यासाचे नियोजन करावे. 
                                 जानेवारी २०१२ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचे नवे प्रारूप प्रकाशित केले. बदललेल्या अभ्यासक्रमाच्या आराखडय़ासोबत परीक्षा पार पडल्या. मागील दोन-तीन वर्षांतील परीक्षांचे निकाल, गुणांचे कटऑफ, यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी पाहता लक्षात येते की, या परीक्षेची काठिण्यपातळी वाढली आहे. अभ्यासक्रमाची लांबी-रुंदी पाहता अभ्यासाची खोली वाढवावी लागणार आहे. यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाशिवाय दुसरा पर्याय नाही. परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण याविषयी पुढील लेखात सर्वसाधारण चर्चा संपली की, पेपरनिहाय रणनीती कशी असावी याविषयी सविस्तर चर्चा करू.
                                राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित प्रारूपात एकूण सहा पेपर ८०० गुणांसाठी असतात. हे सर्व पेपर अनिवार्य स्वरूपाचे असतात. मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांचे वर्णनात्मक स्वरूपाचे पेपर प्रत्येकी १०० गुणांसाठी असतात. सामान्य अध्ययन विषयाचे एकूण चार अनिवार्य पेपर असून ते वस्तुनिष्ठ - बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. प्रत्येकी १५० गुणांसाठी असणाऱ्या या पेपर्सना निगेटिव्ह माìकग (३:१) लागू
आहे. मुख्य परीक्षेच्या गुण पद्धतीत पर्सेटाइल पद्धत लागू आहे. पर्सेटाइलप्रमाणे गुणवत्ता निश्चित होऊन मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातात.
सामान्य अध्ययन विषयाच्या चार प्रश्नपत्रिका खालीलप्रमाणे-
  1. सामान्य अध्ययन पेपर १ : इतिहास, भूगोल व कृषी.
  2. सामान्य अध्ययन पेपर २ : भारतीय राज्यघटना व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित) आणि विधी.
  3. सामान्य अध्ययन पेपर ३ : मानवी साधनसंपत्ती व मानवी हक्क.
  4. सामान्य अध्ययन पेपर ४ : अर्थव्यवस्था व नियोजन, विकासाचे व कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान विकास.
                             लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला एक टीप छापली आहे. ती अशी की, प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल, की एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. विविध विषयांतील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची
चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे. याचा अर्थ प्रश्नांची उत्तरे विषयाच्या विशेष प्रावीण्याशिवाय देता येणे अपेक्षित आहे. अर्थात अभ्यासक्रमात नमूद केलेल्या अभ्यास घटकातील सर्व मूलभूत संकल्पना सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पायाभूत अभ्यास आणि चालू घडामोडींचे आकलन या दोन्हींचा मेळ आवश्यक आहे.

Source : Loksatta.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा