Post views: counter

अर्थव्यवस्थांचे प्रकार


                              अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते.

                          अॅडम स्मिथ यांच्या मते – ‘अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपतीच्या स्वभाववैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय.’


1)  मुक्त अर्थव्यवस्था (Market Economy) :                       या अर्थव्यवस्थेला Laissez Faire किंवा Self-managed economy असेही म्हणतात. शासन देशातील उत्पादन, किंमत निर्धारण, गुंतवणुकीचे निर्णयांवर कुठलाही ताबा ठेवत नाही. उद्योग मुक्तपणे बाजारात ज्या वस्तुंची मागणी असेल किंवा ज्या वस्तुंपासून
जास्त नफा मिळेल अशा वस्तू तयार करतात. भांडवलशाही देशांमध्ये अशा प्रकारची मुक्त अर्थव्यवस्था राबविली जाते. उत्पादनाबाबत कुठलेही नियोजन नसल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला अनियोजित (Unplanned economy) असेही म्हणतात.
2) नियोजित अर्थव्यवस्था (Planned Economy) :                     हि अर्थव्यवस्था असणाऱ्या  देशात एखादी मजबूत केंद्रीय संस्था असते. उदा.नियोजन आयोग. ही संस्था त्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या व गुंतवणुकीच्या संबंधित एखादी योजना तयार करते. या योजनेला अनुसरून सर्व निर्णय घेतले जातात.समाजवादी अर्थव्यवस्थेत नियोजित अर्थव्यवस्थेचे सूत्र वापरले जाते. वस्तूंची मागणी किंवा नफा लक्षात न घेता जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष दिले जाते.
 नियोजित अर्थव्यवस्थेचे दोन प्रकार पडतात.
 i) आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था (Command economy) : 
नियोजित अर्थव्यवस्थेचे कडक-अतिकेंद्रीत स्वरूप म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था. अशा अर्थव्यवस्थेत केंद्रसंस्था किंवा शासनाच्या हातात सर्व आर्थिक अधिकार दिले जातात.
 ii) सूचनात्मक नियोजित अर्थव्यवस्था (Indicative economy) :
हे नियोजित अर्थव्यवस्थेचे थोडे ढिले स्वरूप असते. म्हणजे एखाद्या विशिष्ठ क्षेत्रातील गुंतवणूक किंवा उत्पादन वाढविण्यासाठी आदेश न देता सूचना दिली जाते. अनुदाने, सबसिडी, करमुक्तता अशी आमिषे दाखविली जातात. याला Planned Market economy असे म्हणतात.
 3) मिश्र अर्थव्यवस्था (Mixed economy) : 
                   नियोजित अर्थव्यवस्था समाजवादाचे लक्षण असून मुक्त अर्थव्यवस्था भांडवलवादाचे लक्षण आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत दोन्ही नियोजित तसेच मुक्त अर्थव्यवस्थांचे सहअस्तित्व असते.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा